कल आज और कल
| तारीख: 7/5/2012 3:55:15 PM |
जिओ फुलऑन
‘काही विचार तेव्हा का केले?’ पासून ते ‘उगाच राग केला!’ इथपर्यंत सर्व काही मनात येऊन गेले. कदाचित असेच काहीतरी आयुष्यातील प्रसंगांचेही असणार ना! काल घडलेल्या गोष्टींकडे नव्याने पाहता येते हे हल्लीच आमच्या पेपरवाल्यामुळे मला कळले.
जुनी भांडणे, जुने राग, जुने रुसवे हे नव्याने रोज छळत राहतात. मनात रुतलेले प्रसंग उलटून कितीही वर्षे गेली तरीही क्षणाक्षणाला ते टोचून यातना देतात. आपण हे जुने त्रास नव्याने भोगतो. कालच्या गोंधळाने आजही गोंधळून जातो. एका सवयीमुळे या सर्वांचा एक नवा शोध लागलाय मला. पेपरवाल्याने काही कारणास्तव पेपर नाही टाकला तरीही मी पेपर वाचतेच. कधी कालचे, कधी परवाचे, कधी आठवड्यापूर्वीचे सुद्धा. सवय माणसाला सोडत नाही हेच खरे.
पण या सवयीने मला शिकवले ते ‘जुने नव्याने पहाणे.’ जुन्या माहिती असलेल्या बातम्याही मी नव्याने वाचून त्यावर विचार करते. तेव्हा जो आक्रोश किंवा भावना त्या बातमीवर जाणवली तीच आता नाही वाटत हे कळले. काही गोष्टींवर हसूदेखील आले. ‘काही विचार तेव्हा का केले?’ पासून ते ‘उगाच राग केला!’ इथपर्यंत सर्व काही मनात येऊन गेले. कदाचित असेच काहीतरी आयुष्यातील प्रसंगांचेही असणार ना! काल घडलेल्या गोष्टींकडे नव्याने पाहता येते हे हल्लीच आमच्या पेपरवाल्यामुळे मला कळले. काही जुने न आवडणारे प्रसंग आठवून पहा. खूप त्रास दिला असेल त्या प्रसंगांनी तुम्हाला. त्यांना कालच्या वर्तमानपत्राच्या बातम्या असे समजून पहा. त्या फार त्रासदायक वाटणार नाहीत. कारण आजचे वर्तमानपत्र तुम्हाला जास्त महत्त्वाचे वाटेल. नीट विचार करा. आज असलेला आज उद्या नसेल. तो घालवण्यात काहीच अर्थ नाही. माणसं आणि आपल्या हाती असलेली आजची वेळ हे सर्वात महत्त्वाचे. कडू आठवणींनी आजचे जगणे कडू करू नका.
एक लक्षात ठेवा, आयुष्यात घडलेल्या जुन्या घटनांना पेपरमधील शिळ्या बातम्यांसारखे नव्या नजरेने पाहिले तर येणार्या काही प्रसंगांना हसत सामोरे जाता येईल. आजच्या ठळक बातम्या लक्षपूर्वक वाचा. हेच तुमचे उद्याचे जगणे ठरवतील. पण कालच्या शिळ्या बातम्यांचेही गोड हसून स्वागत करा. वाचत रहा व हसत रहा : कालच्या शिळ्या बातम्या.
टिम क्रिएटर