Tarun Bharat   Like Minded

Updated at: 19/05/2013 12:27:58
     
तुमचे शहर निवडा

पाऊस मनामनातला

तारीख: 7/5/2012 3:53:14 PM

 

लव्ह फ्रेंड ऍण्ड मोअर

 

उबदार दुलईत गुरफटल्यावर खिडकीतून दिसणारा सर्द ओला की, छत्री घरीच विसरल्यावर चिंब चिंब भिजवणारा मिस्कील शिरवा? सांजवेळेला पिंपळपानांतून सळसळणारा की, पहाटेच्या जांभूळ मेघांतून रिमझिमणारा?

 

हॅलो गाईज. लव्ह, फ्रेण्ड्‌स ऍण्ड मोअरच्या नव्याकोर्‍या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. फ्रेण्ड्‌स, खर्‍या अर्थाने प्रेममयी ऋतू कोणता असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर पावसाळाच असायला हवं.

 

‘मिलनाच्या ओढीने धरतीकडे झेपावणारा पर्जन्यराजा’ ही कल्पनाच मुळात किती रोमँटिक आहे. या आषाढी जलधारांवर आपण शाळेत असताना अनेक निबंध लिहिलेत, अनेक गाणी गायिलीत. ‘तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही’ अशा अनेक पावसाळी कविता थेट आपल्या मनाला भिडतात. पण आपण पाऊस कधी खर्‍या अर्थाने जगलो का? पाऊस नेमका कसा ते आपल्याला कळलं का? मला तर नाही कळलं बुवा.

 

 

 

पाऊस पाऊस म्हणतात तो नक्की कसा?

 

बालपणी गारा वेचताना अन् नावा करताना वाटलेला सवंगडी की, शाळेभोवती तळे साचवून सुट्टी मिळवून देणारा जिगरी दोस्त. सरी अंगावर झेलताना अंगभर पालवी फुलविणारा सृजन की, धरणीला कवेत घ्यायला आवेगाने झेपावणारा आतुर प्रियकर? आपले अश्रू लपविण्यासाठी स्वत:चं अंत:करण धो धो रितं करणारा हळवा की, हुलकावण्या देऊन बेजार करणारा अन् मग स्वच्छंद बरसणारा मनस्वी? उबदार दुलईत गुरफटल्यावर खिडकीतून दिसणारा सर्द ओला की, छत्री घरीच विसरल्यावर चिंब चिंब भिजवणारा मिस्कील शिरवा? सांजवेळेला पिंपळपानांतून सळसळणारा की, पहाटेच्या जांभूळ मेघांतून रिमझिमणारा?

 

पहिल्या पावसासवे हुंदडल्यावर आईकडून डोकं पुसून घेतानाचा पाऊस, ताईने केलेली किंचित खारट भजीही चवीने खातानाचा पाऊस, चिखलातला फुटबॉलचा सामना रंगतदार होतानाचा पाऊस, तिच्या ओल्या केसांतून खट्याळ थेंब चमकतानाचा पाऊस, त्याला झिंगून ओलावणारा पाऊस, मित्र-मैत्रिणींच्या सोबतचा कट्ट्यावरचा पाऊस, कधी नुसताच खुर्चीत रेलून गाणी ऐकताना डोळ्यात साठवलेला पाऊस.

 

छे छे, एका पावसाची सर काही दुसर्‍याला येत नाही. प्रत्येक पाऊस वेगळाच, स्वत:चं वेगळं अस्तित्व घेऊन मनात ठाण मांडून बसलाय्. प्रत्येकाची वेगळी रंगछटा जणू इंद्रधनूच गुंफून बसलीये. पण एक समान धागा म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सखासोयरा होऊन भेटतो हा पाऊस. पाऊस अंत:करणाच्या ओल्या मातीतला. पाऊस आठवणींच्या ओंजळीतला. नृत्यानंदात दंग झालेल्या मोराच्या पिसार्‍यातला. पाऊस मनामनातला.

 

टिम क्रिएटर