फुललेल्या आशा
| तारीख: 7/5/2012 4:14:47 PM |
कॉमन वूमन
मायेनं विचारपूस करणारं कुणी नाही. एकटेपणामुळे येणारी निराशा आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर डोळ्यांत पाणी आणून झुलणारी मनं... असंच काहीसं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. पण बंगळूरुतला ‘आशा जीवन’ हा वृद्धाश्रम याला अपवाद ठरावा. इथे अल्झायमर, स्किझोफ्रेनिया, पार्किन्सन, स्मृतिभ्रंश अशा कित्येक आजारांनी ग्रासलेले ज्येष्ठ आढळतात. पण तुम्ही कधीही येथे डोकवा, तारुण्यालाही लाजवेल असा उत्साह तुम्हाला जाणवेल.
स्नेहलता दुभाष... जवळपास पंच्याहत्तरीतल्या. तासाभरापूर्वी त्यांनी नाश्त्याला काय खाल्लं, त्यांच्या लक्षात नाही. त्यांना त्यांच्या नवर्याचं नावही आठवत नाही. त्यांना किती मुलं आहेत, हे विचारल्यावर तर त्या गोंधळूनच जातात. अल्झायमरची ही प्राथमिक स्टेज. त्यांच्या कुटुंबीयांना अशा स्थितीत त्यांच्याशी कसं वागावं, कसं बोलावं काही कळत नव्हतं. त्यांच्या सुनेसाठी तर त्या नकोशाच झाल्या होत्या. उठता-बसता त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ असणार? त्यांच्या मुलाने आणि सुनेने सरळ वृद्धाश्रमाची वाट धरली. पण कोणत्याच वृद्धश्रमात एखाद्या आजाराने ग्रासलेल्या ज्येष्ठांना आश्रय दिला जात नव्हता. बंगळूरुमधले अनेक वृद्धाश्रम पालथे घातल्यानंतर शेवटी नव्यानेच सुरू झालेल्या ‘आशा जीवन’ वृद्धाश्रमामध्ये ते गेले. या वृद्धाश्रमातल्या स्नेहलता या पहिल्याच आश्रित होत्या.
वृद्धाश्रम म्हटला की लहान लहान खोल्यांत दाटीवाटीने राहणारे केविलवाणे वृद्ध. नाश्ता, जेवण सारं काही वेळेत असलं तरी इतर वेळी काय हवं-नको ते पाहणारं रक्ताच्या नात्याचं कोणीच जवळ नसतं. आजारात उपचार होतात, पण मायेनं विचारपूस करणारं कुणी नाही. एकटेपणामुळे येणारी निराशा आणि आठवणींच्या हिंदोळ्यावर डोळ्यांत पाणी आणून झुलणारी मनं... असंच काहीसं चित्र आपल्यासमोर उभं राहतं. पण बंगळूरुतला ‘आशा जीवन’ हा वृद्धाश्रम याला अपवाद ठरावा. इथे अल्झायमर, स्किझोफ्रेनिया, पार्किन्सन, स्मृतिभ्रंश अशा कित्येक आजारांनी ग्रासलेले ज्येष्ठ आढळतात. पण तुम्ही कधीही येथे डोकवा, तारुण्यालाही लाजवेल असा उत्साह तुम्हाला जाणवेल. निराधार वृद्धांना आश्रय आणि सर्वोत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, या उद्देशाने हा वृद्धाश्रम मार्च २००० मध्ये सुरू करण्यात आला. सुजाता भट आणि कल्पना मल्ल्या या दोन मैत्रिणींच्या कल्पनेतनं साकारलेला हा वृद्धाश्रम आज बंगळूरुमधील सर्वोत्कृष्ट वृद्धाश्रमांपैकी एक आहे.
सुजाता आणि कल्पनाने बिल्कल्ली येथे एक तीन खोल्यांचा फ्लॅट भाड्याने घेऊन तिथे ‘आशा जीवन’ सुरू केला. या वृद्धाश्रमामध्ये कोणाला ठेवायचं, त्यांना कशाप्रकारे सोयी उपलब्ध करून द्यायच्या असतात याबाबत दोघीही अनभिज्ञ होत्या. परंतु त्यांच्याकडे आश्रयासाठी आलेल्या पहिल्याच व्यक्तीमुळे आपल्या संस्थेत येणार्या ज्येष्ठांना सर्वोत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, हे त्यांनी ठरवूनच टाकलं. सुजाता सांगते, आईवडील नकोसे झालेली किंवा त्यांचा सांभाळ करणं, त्यांच्याकडे लक्ष पुरवणं शक्य नसलेली मुलं, कुटुंबातील वृद्धांना वृद्धाश्रमात दाखल करतात. त्यावेळी त्यांच्या मनात एकच भावना असते, की आपल्या मुलांनी आपल्याला ‘टाकलं.’ त्यांना आपला सहवास नकोय्. ही जाणीव थोड्या दिवसांतच इतकी टोकदार होते की त्यांना एकटं वाटू लागतं. त्यांच्यामधील एकाकीपणाची भावना इतकी वाढीस लागते की, त्यांच्यात चिडचिड, सारखं रागावणं असे बदल दिसून येतात. ही स्थिती हाताळता येणं आवश्यक असतं. त्यांच्या मुलांनी संस्थेला पैसे दिलेत म्हणून केवळ कर्तव्यापोटी नाहीतर आपुलकीने, आस्थेने आपण त्यांची देखभाल करत आहोत, याची त्यांना जाणीव करून द्यावी लागते.
हळूहळू ‘आशा किरण’मध्ये येणार्या ज्येष्ठांची संख्या वाढत गेली तसा ‘सेंच्युरी ग्रुप्स’च्या दयानंद पै यांच्या मदतीने त्यांनी मोठ्या जागेत आपल्या वृध्दाश्रमाचा व्याप हलवला. तिथे अत्यावश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी कॅनरा बँकेकडून कर्ज काढण्यात आलं. त्यामधून प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली असून तिथे असलेलं कॉटेज हे इंग्रजी ‘एल’ आकारातलं आहे. या कॉटेजमध्ये एखाद्या घरात असलेल्या टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, फर्निचर आदी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय लॉंड्री, प्रार्थनागृह, ग्रंथालयदेखील येथे आहे. तसेच सुप्रा साऊथ सिटी हॉस्पिटल, वोकहार्ट हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटलच्या साहाय्याने नियमित आणि २४ तास वैद्यकीय सेवाही पुरवली जाते. ३२ जणांचा स्टाफ येथे कार्यरत आहे.
या संस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे येथे रांगोळी, कॅरम, बास्केट बॉल, संगीत खुर्ची, सीड सेप्रेटिंग, स्मरणशक्ती असे विविध खेळ रोज खेळले जातात. त्यांच्या स्पर्धाही होतात. एकांकिका, संगीत स्पर्धा, काव्यलेखन असे अनेक उपक्रम येथे राबवले जातात. तसेच जुन्या वृत्तपत्रांपासून पिशव्या आणि शोभेच्या वस्तू बनवण्याच्या प्रशिक्षणाबरोबरच या संस्थेने त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना मार्केटही उपलब्ध करून दिलं आहे. सुजाता आणि कल्पना म्हणतात, इथे असणार्या ‘नानी’ आणि ‘आंटीं’च्या चेहर्यावर दिसणार्या समाधानातच आम्हाला आमच्या कामाची पावती मिळते. भविष्यात अनाथाश्रम आणि निराधार मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
टिम क्रिएटर