Tarun Bharat   Like Minded

Updated at: 19/05/2013 12:27:58
     
तुमचे शहर निवडा

आठवड्याची गोष्ट

तारीख: 7/6/2012 6:24:41 PM

साधू विरुद्ध पेंद्या

एका गावात पेंद्या व गणेश नावाचे दोन मित्र होते. ते दोघेही शाळेत शिकत होते. गणेश हा अभ्यासात खूप हुशार होता. तो वर्गात नेहमी पहिलाच यायचा; परंतु पेंद्या हा अतिशय मठ्ठ व खोडकर होता. त्याची आई त्याच्या या खोडकरपणावर खूप कंटाळायची. ती नेहमी गणेशचे गोडवे गात असे. ती पेंद्याला नेहमी टोमणे मारायची, गणेशकडून काहीतरी शिक. त्याच्याकडून काहीतरी धडा घे; परंतु या सर्व गोष्टी पेंद्याच्या डोक्यावरून जात असत. ‘नळी फुंकली सोनारे...’ या म्हणीप्रमाणे त्याची गत होती. परंतु, कोणते ना कोणते भन्नाट विचार नेहमी त्यांच्या डोक्यात चालत असत. एके दिवशी आपण काहीतरी वेगळं करूनच दाखवू हा त्याचा पवित्रा होता. फक्त त्याला एका संधीची गरज होती.

दरम्यान, एक साधू त्या गावात अधून-मधून यायचा. अंगार भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कपाळावर भस्म आणि खूप मोठी झोळी असा त्याचा एकंदरीत वेष होता. तो गावोगाव भिक्षा मागत फिरत असे. सोबतच गावातील भोळ्या-भाबड्या लोकांची थोडेफार भविष्य सांगून फसवणूकदेखील करीत असे. गावातील लोकांचा त्याच्यावर खूप विश्‍वास बसला होता. गावातील कोणतेही महत्त्वाचे काम त्या साधूला विचारल्याशिवाय करीत नसत. लग्न, मुंज, नामकरणविधी आदी कार्यक्रम त्या साधूच्याच हस्ते करून घेत असत. त्या मोबदल्यात हा साधू एकही पैसा घेत नसे. त्याच्या या चांगुलपणामुळे तो गावातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनला. त्याची ही ख्याती पंचक्रोशीत पसरली.

एकेदिवशी त्याने तर चक्क कमालचं केली. त्या रात्री त्याने गावातील रघूकाकांचे बैल दूरच्या एका गावी चोरून नेले. सकाळी गोठ्यात बैल नाहीत म्हणून सर्वत्र गोंधळ झाला. हा-हा म्हणता सर्व गावभर ही बातमी पसरली. कोणीही बैलाचा पत्ता सांगत नव्हता. रघूकाका हतबल झाले होते. अनेक काळजींचे सावट त्यांच्या मनावर पसरू लागले.

शेती कशाने करायची? दोन मुलींचे लग्न कसे करायचे? अशी अनेक संकटे रघूकाकांपुढे आ वासून उभी राहिली. शेवटी गाववाल्यांना हे ढोंगी साधुबुवा आठवले. त्यांच्या मठामधून त्यांना बोलावण्यात आले. सर्व विचाराअंती साधुबुवाने सांगितले की, रघूचे बैल संग्रामपूरला एका जंगलात आहेत. त्याच्या सांगण्यावरून रघूकाका संग्रामपूरला गेले. खरोखरंच बैलं त्या जंगलात झाडाला बांधलेले होते. साधुबुवांच्या या चमत्कारानंतर संपूर्ण गाव त्या साधूच्या चमत्काराच्या सापळ्यात अडकले. गाववाल्यांचा त्या साधूवर दृढविश्‍वास बसला. ‘बुडता हे जन न देखवे डोळा म्हणोनी कळवळा येत असे’ या काव्यपंक्तीचा साक्षात्कार गावकर्‍यांना त्या ढोंगी साधूच्या रूपात झाला. हा साधू असे चमत्कार गावोगावी करीत असे व तेथील लोकांना आपल्या मोहजाळ्यात अडकवीत असे. या सर्व प्रकारामागे त्याचा शैतानी बेत लपलेला होता. लोक या साधूवर एवढा विश्‍वासच का ठेवतात? असा प्रश्‍न पेंद्याला नेहमी भेडसवायचा. चाणाक्ष वृत्तीच्या पेंद्याला त्या साधूच्या वर्तनावर शंका देखील येत असे. परंतु, त्या शंकेचा गाजावाजा नको म्हणून तो शांत बसायचा.

एकेदिवशी तो साधू गावाच्या आडरस्त्याने जाताना पेंद्याला दिसला. पेंद्या व गणेश त्या साधूचा पाठलाग करत होते. कारण, त्याची चाल नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती. त्याच्या चालीत एकप्रकारचा दबकेपणा होता. त्याच्या चेहर्‍यावरील भावदेखील वेगळेच दिसत होते. पेंद्या व गणेश शेताच्या रस्त्याने फुलपाखरे पकडायला गेले होते. पेंद्याला साधूजवळील झोळी थोडी जडच दिसली व त्या झोळीतून एक लहान मुलाचा पाय बाहेर पडलेला पेंद्याला दिसला होता. पेंद्या व गणेश त्या साधूचा पाठलाग करत होते. पेंद्याने गणेशला पोलिसांना बोलावून आणण्यास सांगितले. गणेश पोलिसांना आणण्यासाठी गेला इकडे पेंद्या चोरपावलांनी त्या साधूचा मागोवा घेत होता. साधू आता घनदाट अरण्यात शिरला होता. त्या मागोमाग पेंद्यादेखील नीडरतेने त्या अरण्यात शिरला. परंतु, अचानकपणे त्या साधूला कुणीतरी पाठलाग करीत आहे याची शंका आली. शंकेची पाल त्याच्या मनात अखेर चुकचुकली.

साधूदेखील खूप चाणाक्ष होता. त्याने जाणले की, आपला पाठलाग करणारा दुसरा-तिसरा कुणी नसून पेंद्याच आहे. या पेंद्याला अडविण्यासाठी त्या मुलांची तस्करी करणार्‍या साधूने अनेक प्रयत्न केले. साधू दाट जंगलातून, कडीकपार्‍यातून, नदीनाल्यातून जात होता. पेंद्यादेखील हे सर्व अडथळे तेवढ्याच दिमतीने, नीडरतेने पार करीत होता. शेवटचा उपाय म्हणून त्या साधूने आपल्याजवळील पाळलेला, दात नसलेला नाग पेंद्याच्या दिशेने सोडला. परंतु, पेंद्याने त्या सापाला गरगर फिरवत दूर जंगलात फेकून दिले. साधूला वाटले की, पेंद्या सापाला पाहून पळून गेला म्हणून साधू आपल्या ठरावीक जागी पोहोचला. परंतु, पेंद्याने त्याचा डाव उलटा पाडत शेरास-सव्वाशेर या बाण्याने पोलिसांसह त्या जागी पोहोचला. पोलिसांनी त्या साधूला ताबडतोब आपल्या ताब्यात घेतले. या भोंदू साधूने अनेक लहान-लहान, निष्पाप बालकांची तस्करी करून खूप सारा पैशाचा खजिना जमविला होता. तो खजिनादेखील पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला. सोबतच पोलिसांनी पेंद्याचे देखील आभार मानले.

पेंद्याचे हे कर्तृत्व सार्‍या गावभर पसरले. गाववाल्यांनी सोबतच सरकारनेही त्याच्या कार्याची दखल घेतली. सरकारने पेंद्याचा यथोचित सत्कार करून त्याला पारितोषिक दिले. हे सर्व पाहून पेंद्याच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पेंद्या मात्र गणेशसमवेत आपल्या स्वागत समारंभात दंग होता. आज जो-तो पेंद्याच्या खोडकरपणाऐवजी त्याचे गुणगान गात होता. पेंद्याला आज आकाश ठेंगणे झाले होते. पेंद्याच्या पराक्रमावर पावसांच्या सरींना लाजवतील अशा कडकडीत टाळ्या पडत होत्या. संपूर्ण जनसमुदाय त्याच्या कर्तृत्वावर ऊतू जाणार्‍या दुधासारखा क्षणाक्षणाला आत्यंतिक उत्सुकतेने फुगत होता.

ग्रहाचे साह्य शूराला

| यशश्री पायाची दासी

प्रयत्ना असे जो राजी

| तो बने निश्‍चये गाजी॥

जणू या पंक्तीचाच साक्षात्कार पेंद्याला आला होता. त्या वेळी या काव्यपंक्तीच आपल्या अक्षरनिरंजनाने पेंद्याचे यथेच्छ स्वागत करीत होत्या.

सचिन बबनराव गवई, शेलुबाजार