Tarun Bharat   Like Minded

Updated at: 19/05/2013 09:54:50
     
तुमचे शहर निवडा

शाळेचा पहिला दिवस

तारीख: 7/6/2012 6:34:33 PM

$img_titleशाळेचा पहिला दिवस... थोडी एक्साईटमेंट, थोडी भीती. नवी स्कूलबॅग, नवी पुस्तकं, नवा युनिफॉर्म यामुळे उत्साहात आणखी भर... त्यातच पहिल्या दिवशी शाळेत सोडायला आई-बाबाही बरोबर. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस तसा खास.

माणसाच्या जीवनात ‘पहिला’ या शब्दाला फार महत्त्व आहे, मग तो ‘पहिला पाऊस’ असो, पहिला नंबर, ऋतूतील पहिले फळ, काहीही असो हे सर्व मिळविण्यासाठी आपली धडपड चालूच असते. याचप्रमाणे ‘शाळेचा पहिला दिवस’ हासुद्धा प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा असतो.

तसे तर उन्हाळी दीर्घ सुटी संपवून दरवर्षीच शाळा सुरू होतात आणि दरवर्षीच शाळेचा पहिला दिवस येत असतो पण प्रत्येक वर्षी उत्साह नवी दिशा घेऊन येतो. या शाळेच्या पहिल्या दिवसात किती नावीन्य असते नाही. एक-एक वर्ष आपण शाळेच्या वर्गाची एक-एक पायरी चढत असतो आणि कळत-नकळत याच पायरीवर आपलं जीवन समृद्ध होत असतं. शाळेच्या पहिल्या दिवसाची इतकी उत्सुकता आणि एवढा आपलेपणा का? या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक वर्षी वयानुसार बदलत जातात.

ज्यावेळी आपण प्राथमिक स्तरावर असतो तेव्हा या पहिल्या दिवशी ‘नवीन दप्तर, नवीन ड्रेस, नवीन डबा आणि डब्यात मिळणारा नवीन खाऊ’ याचं आकर्षण असतं तर माध्यमिक स्तरावर नवीन वर्ग, नवे मित्र-मैत्रिणी, नवे वह्या-पुस्तके, त्यांचा दरवळणारा नवाकोरा गंध हे अधिक हवेहवेसे वाटतात. वेगळ्या वळणावर आलेली ही दोन वर्षे जीवनातील महत्त्वाची समजली जातात. यामुळे ‘पहिल्या दिवसा’ ला शालेय जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

असं म्हणतात की, शालेय जीवनाच्या पायावर आपली जीवनरूपी इमारत उभी राहते. शाळा आपल्याला लळा लावते. तिची ओढ निराळीच असते. शाळेतील काही गोष्टी त्रासदायक वाटत असल्या तरी ज्या शाळेत आपले बालपण गेले तिला आपण कधीच विसरू शकत नाही. शाळेतच जिवाभावाचे सोबती जोडले जातात, मित्रांच्या संगतीत नाना मनोराज्ये रंगवली जातात. वेगवेगळे साहसी प्रयोग याच वयात केले जातात. या वयात मिळालेली खरी मैत्री परत अनुभवता येत नाही. आपली शाळा आणि शाळकरी मित्र हेच आपले विश्‍व असते.

शाळेतील स्नेहसंमेलने, त्यात रंगवलेली नाटके, शाळेत केलेली धमाल, पटकवलेली बक्षिसे, केलेल्या खोड्या, सर्वात महत्त्वाच्या मित्रासोबत केलेला अभ्यास, एखाद्या गुणाने हुकलेला नंबर असे एक नव्हे असंख्य प्रसंग शाळेमुळे आपल्या जीवनात येत असतात. शाळा हे विद्यार्थ्यांचे दुसरे घर असते. आपले प्रेमाचे, स्नेहाचे धागे शाळेशी जोडले गेलेले असतात. कितीतरी कडू-गोड आठवणी आपण शालेय जीवनात जमा केलेल्या असतात. शाळेतील संस्कार अत्यंत मोलाचे असतात. माणूस पुढे कितीही मोठा झाला तरी आपल्या शाळेला, गुरुजनांना, शालेय परिसराला विसरू शकत नाही. शालेय संस्कार मनावर खोल रुजले जातात. यातूनच आपण घडतो. शाळेत मिळालेली शिदोरी जीवनभर उपयोगी पडते. ही शिदोरी ज्या शाळेतून मिळते ती शाळा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनते.

शाळेचा पहिला दिवस आणि रडणे हे ठरलेलेच असते. फार कमी मुलं असतात जी न रडता शाळेत जातात. खरं सांगायचं तर या रडण्यातही एक वेगळीच मजा असते. मला अजुनही आठवतं शाळेचा माझा पहिला दिवस होता. जवळपास सर्वच मुलं रडत होती. ते पाहून मी सुद्धा रडायला लागलो. आजही तो क्षण आठवला की, हसु आवरत नाही. शाळेचा पहिला दिवस हा सर्वच नवागतांसाठी वेगळ्या जगाचा अनुभव देणारा असतो. कुणी पहिल्याच दिवशी शिक्षकांची धास्ती घेऊन दुसर्‍या दिवशी शाळेत न जाण्याचा मनोमन संकल्प करून टाकतात. तर कुणाला शाळा इतकी आवडते की, ते पहिल्याच दिवशी बरेचसे मित्र बनवून टाकतात. शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येकासाठी काही तरी नवीन घेवून आलेला असतो हे नक्की.

अशा शाळेचा पहिला दिवस जरी आपण लहानपणी रडत-रडत काढला असला तरीही त्या रडण्यातही आनंद असतो, असे वाटते. म्हणून कधी रडत सामोरे गेले असू पण प्रत्येक वर्षी हा पहिला दिवस मात्र नवी नवलाई, नवा उत्साह घेऊन नवीन जीवनाची सुरुवात करून देतो. म्हणूनच दरवर्षी येणारा शाळेचा पहिला दिवस नवा आणि महत्त्वपूर्ण वाटतो.

अर्णव