जना-मनातले
| तारीख: 7/7/2012 7:38:24 PM |
जळणं? नव्हे उजळणं!
‘फॅशन शो’ आयोजित केला होता. स्थळ होतं- दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचं खुलं प्रांगण. फॅशन शो म्हटलं की, रॅम्पवर चालणार्या, कॅटवॉक करणार्या सुंदर तरुणी डोळ्यापुढे उभ्या राहतात. दिव्यांचा झगमगाट, इंग्रजी पद्धतीचं संगीत, खोटं खोटं हसणं असं काहीसं चित्र असतं. पण, हा फॅशन शो वेगळाच होता. कॅन्सरशी लढणार्या जिगरबाज महिला चक्क रॅम्पवर उतरल्या होत्या आणि त्यांचे पेहराव म्हणजे भारतीय संस्कृतीचा सुंदर आविष्कार होता.
इतर फॅशन शोप्रमाणे इथेही बक्षिसं होती. पहिलं ‘मिस फायटर’, दुसरं ‘मिस करेजिअस’ आणि तिसरं ‘मिस फिअरलेस!’ नुसतंच रॅम्पवर चालणं नव्हतं, तर त्यांना प्रश्न विचारून बोलतंही करायचं होतं. प्रश्न कॅन्सरशी निगडित होते. जसे, कॅन्सर आहे हे कळल्यावर पहिली प्रतिक्रिया काय होती? कुटुंबाचा आधार कसा मिळाला? उपचारांना सुरुवात करताना मनाची कशी तयारी केली? सहभागी झालेल्या प्रत्येकीनं अगदी आत्मविश्वासाने भाग घेतला. सूत्रसंचालनाचं एक वेगळंच दडपण माझ्यावर आलं होतं आणि ‘ती’ स्टेजवर आली... तिच्याबद्दल आधीही मी खूप ऐकून होते. ती... साधना चॅरिटेबल ट्रस्टची को-ऑर्डिनेटर, ती... स्वत: कॅन्सरशी लढा देणारी, ती... असंख्य कॅन्सरग्रस्त रुग्णांना मायेचा हात देऊन समजावणारी, ती... त्यांना कुठलीही मदत करायला तयार असणारी, ती... दिसायला सुंदर, ती... मनानेही तितकीच सुंदर- अर्चना केमकर!
तरुण वयात इतर सर्वसामान्य मुलींसारखंच कॉलेज आणि मग लग्न झालं. थोडी वर्षं सुखात गेली आणि अचानक स्तनांमध्ये गाठ आहे, अशी शंका आली. त्याच्या सहा महिने आधी मिस्टरांची ऍन्जिओप्लास्टी झाली होती. अजून तो तणाव बाकी होताच, तर ही शंका आली आणि ती एकटीच तपासणी करवून घ्यायला डॉक्टरांकडे गेली. अर्चनाने समाजसेवेचं व्रत कधीचंच घेतलं होतं. माधव नेत्रपेढीमध्ये ती अजूनही काम करते. डॉक्टरांकडे सॅम्पल देऊन कामावर गेली आणि परतताना रिपोर्टस् घेतले. हो! कॅन्सरचीच ती गाठ! सगळं एकटीनं केलं. घरी कसं सांगायचं, हा प्रश्न घेऊन घरी आली. लगेच दुसर्या दिवशी ऍडमिट होऊन ऑपरेशनही झाले. पुढच्या सगळ्या जीवघेण्या यातना सहन केल्या. सोबतीसाठी काही दिवस आईला आणावं म्हणून आणलं. पण, संकटं हातात हात घालून येतात तसं आईलाही कॅन्सर असल्याचं निदान झालं. कुणी कुणाचा आधार बनावा? पण, अर्चना धीरोदात्तपणे उभी राहिली. स्वत:च्या आणि आईच्या कॅन्सरशी लढा दिला. पण, आई हे सहन करू शकली नाही आणि ६-७ महिन्यात तिला देवाज्ञा झाली. नेत्रपेढीचं काम दिवस-रात्र करणार्या अर्चनाने आईचे डोळे दान केले.
पुढे काही महिन्यातच यजमानांना ‘हार्टअटॅक’चे निमित्त होऊन देवाज्ञा झाली. पुन्हा एकदा स्वत:च्या भीषण रोगाशी लढा देत, अर्चनाने त्यांचेही नेत्रदान केले. संकटांची मालिका, आघात सहन करणारी अर्चना केमोथेअरपीने जळून न जाता खंबीरपणे त्याला तोंड देत उजळून निघाली. सोनं असंच असतं. अर्चना सोन्यासारखीच आहे. अस्सल! बानवकशी! आज ती ‘साधना चॅरिटेबल ट्रस्ट’मध्ये कौन्सिलर म्हणून काम करतेय्. त्या दिवशी ‘मिस फिअरलेस!’ म्हणून पुरस्कार पटकावणार्या अर्चनाने कॅन्सरवर मात केली. तो हरला. आज शांतनू दास या तरुणाने तिच्याशी विवाह केला आणि तिला आयुष्याचा सूर नव्याने गवसला. साधना चॅरिटेबल ट्रस्ट, डॉ. सुचित्रा मेहता, अर्चनाचे कुटुंबीय, अविनाश संगवई, डॉ. डांगरे आणि सगळ्यात महत्त्वाचे दास कुटुंबीय यांनी एक नवा आदर्श अर्चनाच्या रूपात आपल्यापुढे ठेवला.
त्या दिवशी कार्यक्रमाचं समापन ‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ या गाण्याने करणारी ‘अर्चना’ माझी मैत्रीण आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.
रेणुका देशकर