Tarun Bharat   Like Minded

Updated at: 22/05/2013 01:58:56
     
तुमचे शहर निवडा

अग्रलेख

तारीख: 7/9/2012 11:07:33 PM

घोंगावणारे भुंगे

 लखनौमध्ये भाजपाचे दिनेश शर्मा यांनी सव्वा लाखाच्या मताधिक्क्याने जो विजय संपादन केला, तो उत्तरप्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील इतिहास म्हणून नोंदला गेला आहे. याचाच अर्थ, भाजपाने केवळ आणखी महापालिका आपल्या ताब्यात घेतल्या नाहीत,तर त्यांच्या मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

सत्तेच्या लढाईतील नेते घोंघावणार्‍या भुंग्यासारखे असतात. फूल दिसले की परागकण घेण्यासाठी ते त्यावर बसतात आणि फूल नसेल तर जोवर फूल दिसत नाही, तोवर पुढे पळत सुटतात... उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली गेली होती. दिल्लीतून अनेक भुंगे ऊठसूठ उत्तरप्रदेशात जात होते. राज्यातून अचानक फुले नाहीशी झाली की काय, हे भुंगे उडण्याचे थांबूनच गेले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाची सत्ता आली असताना खरे तर उत्तरप्रदेशात महापालिका निवडणुकांत सत्तेचा लाभ त्यांना मिळाला असता. पण, महानगरांमधील जनतेने भाजपाला दिलेला कौल हा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक चांगला संकेत देणारा ठरणार आहे. लोकसभा गाठायची असेल, तर विधानसभा केंद्रित करावी लागते. तशी भाजपाने उत्तरप्रदेश विधानसभेची तयारी आधीच केली होती. त्याचे फार चांगले परिणाम विधानसभेत दिसू शकले नसले तरी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत मात्र भाजपाला अनुकूल प्रतिसाद मिळाला आहे. प्रचंड वाढलेली महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधात कॉंग्रेसबद्दल लोकांच्या मनात असलेला विरोध यांचा मेळ साधून, बारापैकी दहा महापालिका जिंकून भाजपाने घवघवीत यश संपादन केले. यापैकी आठ महापालिका यापूर्वीही भाजपाच्याच ताब्यात होत्या. त्यात आणखी दोनची भर पक्षाला घालता आली. या निकालाला एकतर्फी म्हटले तरी ते गैर ठरणार नाही. दोन ठिकाणी बसपा आणि सपासमर्थित उमेदवार विजयी झाले. यातून २०१४ च्या लोकसभेचे निकाल एकतर्फी लागतील, असे राजकीय निरीक्षक का म्हणतात, याचा अंदाज यावा. नेहरू आणि गांधी घराण्याने ज्या अमेठी आणि रायबरेलीला आपला परंपरागत मतदारसंघ म्हणून वापरला, तेथेही नगरपालिका आणि जिल्हा पंचायतीत कॉंग्रेस पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. लखनौ, वाराणसी, आग्रा या भागात मुस्लिम मतदारसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. असे असताना भाजपाने तेथे आपला झेंडा रोवणे, ही बाब निश्‍चितच २०१४ च्या तयारीत लागलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणारी आहे.

या निवडणुकीतील आणखी एक गमतीशीर बाब म्हणजे, केवळ कॉंग्रेस आणि भाजपा हे दोनच पक्ष, पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढले होते. सपा आणि बसपाने उमेदवारांची निवड कार्यकर्त्यांवर सोडून दिली होती. लखनौमध्ये भाजपाचे दिनेश शर्मा यांनी सव्वा लाखाच्या मताधिक्क्याने जो विजय संपादन केला, तो उत्तरप्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील इतिहास म्हणून नोंदला गेला आहे. याचाच अर्थ, भाजपाने केवळ आणखी महापालिका आपल्या ताब्यात घेतल्या नाहीत, तर त्यांच्या मतदारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. वाचकांना स्मरत असेलच, या राज्यातील विधानसभा निवडणूक राहुल गांधींनी अशी काही डोक्यावर घेतली होती की, उत्तरप्रदेशात पक्षाचे सरकार बनणार आणि लगेच पंतप्रधान म्हणून आपली वर्णी लागणार! पण, यापैकी काहीही झाले नाही. जी परिपक्वता नेत्याच्या अंगी असावी लागते, निदान चेहर्‍यावर दिसावी लागते, ती राहुल गांधी यांच्यात नाही. केवळ आजी आणि वडिलांच्या पुण्याईने सत्ता पदरी पाडून घेण्याचा पोरकट प्रयत्न त्यांनी करून पाहिला. भावनिक आधारावर काही काळ जनतेशी खेळता येऊ शकते. पण, कोणताही भावनिक आधार हा दीर्घकालीन नसतो. त्याचे परिणाम फार काळ टिकत नसतात. अचानक उत्तरप्रदेशच्या जनतेबद्दल कळवळा आलेले राहुल गांधी, या पालिका निवडणुकांमध्ये तर उत्तरप्रदेशात दिसलेसुद्धा नाहीत! एकाही झोपडीत जाऊन ते जेवले नाहीत किंवा कुणाच्या खांद्यावरचे ओझे उचलले नाही. एकाही खड्ड्यावरून त्यांनी उडी मारली नाही. अचानक या राज्यातील जनतेने त्यांना शत्रूंच्या यादीत नेऊन बसविले की काय, इतके ते राजकारणापासून दूर झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत प्रचारात उतरले म्हणून, कॉंग्रेसच्या पराभवाला राहुल गांधी जबाबदार होते आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पराभवालाही तेच जबाबदार ठरताहेत. ते प्रचारात उतरले नाही, म्हणून जनतेने आम्हाला मतदान केले नाही, असे कॉंग्रेसचेच नेते खुलेआमपणे सांगताहेत. पुन्हा राज्यात परत येण्याचे वचन त्यांनी पाळले नाही. नेहरू-गांधी घराण्याच्या नावावर किती काळ राज्य करायचे, याचे भान कॉंग्रेसच्या नेत्यांनाही राहिलेले नाही. खरे तर पी. व्ही. नरसिंह राव, राजेश पायलट, माधवराव शिंदे यांच्यासारखे नेतेच आता या पक्षात राहिलेले नाहीत. कॉंग्रेस केवळ सत्तेची भुकेली आहे, या विधानाला राहुल गांधी यांनी पुन्हा प्रचारात न येण्याने पुष्टीच मिळते. एक विधानसभा निवडणूक गमावली, म्हणून प्रचारापासून फारकत घेणारे नेते, केवळ स्वार्थीच असू शकतात. याउलट भाजपाची स्थिती आहे. भाजपाचा इतिहास तपासून पाहिला, तर केवळ दोन खासदार असतानापासून केवळ प्रचार करण्यातच भाजपाने धन्यता मानली. भाजपाची ती लढाई विचारांची होती. पराभूत होण्यासाठी उमेदवार शोधला जात असे. विचारांच्या लढाईत विजयाचा नाही, तर प्रतिनिधित्वाचा प्रश्‍न असतो. पोकळ दावे करायचे नसतात. राजकारणात तर यशाने कधीही हुरळून जायचे नसते आणि पराभवाने कधीही खचून जायचे नसते. समाजकारण म्हणून जे राजकारणाचा उंबरठा चढतात, त्यांना याचे भान नेमकेपणाने असते. राजकारणाला जे सत्तेची पायरी समजतात, त्यांच्यात निराशा लवकर येते. कॉंग्रेस पक्ष हे मान्य करणार नाही. पण, उत्तरप्रदेश निवडणुकीनंतर अचानकपणे राहुल गांधींचे बेपत्ता होणे याला दुसरा कोणता अर्थ नाही.

खरेतर आज केंद्रात सत्ता असल्याने कॉंग्रेस पक्ष राष्ट्रीय राजकारणात गणला जातो. पण, या पक्षाचीही वाटचाल हळूहळू प्रादेशिक पक्षाकडे होते की काय, अशी स्थिती आहे. याच पक्षाची चुकीची धोरणे आणि जनतेच्या शोषणाची नीती यामुळे ही स्थिती आली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता चालवायची, हा एककलमी कार्यक्रम हाती घेऊन या पक्षाने आपली वाटचाल अखंड चालू ठेवली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज हा पक्ष लयाला जातो की काय, अशी अवस्था आहे. म्हणूनच अलिगढ, मोरादाबाद, झांशी, गोरखपूर, अलाहाबाद या भागातही भाजपाला दणदणीत यश संपादन करता आले. मोरादाबाद हा धार्मिकदृष्ट्या अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. खरे तर विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर आणखी मेहनत करून सत्तेत येण्याची कॉंग्रेससाठी ही शेवटची संधी होती. आता २०१४ च्या निवडणुकांपूर्वी अन्य कोणत्याही निवडणुका या राज्यात होणार नाहीत. पण, पूर्णत: विभाजित झालेल्या कॉंग्रेसला एकसंध होताच आले नाही. कार्यकर्ते तरी कुठून हिंमत आणणार? महागाई, रुपयाचे अवमूल्यन, घोटाळे हे विषय घेऊन ते मतदारांना सांगणार तरी काय? केंद्रातील नेत्यांनी हात वर केले आणि कार्यकर्त्यांना लढायला सोडून दिले. केंद्रात मनसोक्तपणे सत्तेचा आस्वाद घेताना कार्यकर्त्यांशी त्यांचा कोणता संबंधच जणू राहिलेला नाही. पुन्हा सत्तेत येणार नाहीच, या थाटात त्यांनी सरकारी तिजोरीची जणू लूटच चालविली आहे. निवडणुका आल्या की, विणकरांना पॅकेज जाहीर करायचे, आरक्षणाच्या सवलती जाहीर करायच्या. पुढे पैसेही द्यायचे नाही आणि आरक्षणही न्यायालयातून रद्द होणारच, हे सारे काही कसे एका सुनियोजित षडयंत्रासारखे सुरू असते. सामान्य जनता त्यात फसते आणि सर्वस्व गमावून बसते. उत्तरप्रदेशातील निकाल भाजपाचे मनोबल उंचावणारे आहेत. त्याच वेळी कॉंग्रेसलाही चिंतन करायला लावणारे आहेत. उद्या भाजपा सत्तेत आली, तरी देशाला एका विरोधी पक्षाची गरज राहणारच आहे. त्यादृष्टीने तरी कॉंग्रेसने काळाची पावले ओळखायला हवी. राहुल गांधी यांनी खजील न होता, या लढाईत उडी घेतली पाहिजे. अजून बराच मोठा किल्ला त्यांना सर करायचा आहे. एस. एम. जोशी म्हणायचे- ‘‘राजकारणात पडू नका, राजकारणात शिरा!’’