Tarun Bharat   Like Minded

Updated at: 20/05/2013 01:28:20
     
तुमचे शहर निवडा

प्रासंगिक

तारीख: 7/9/2012 11:25:39 PM

अक्षर मानव समाज संमेलन

 संमेलन येत्या २७ ते २९ जुलै दरम्यान सातारा जिल्ह्यातील, खिंगर (पाचगणी), येथे होत आहे.

 पाचगणीजवळ खिंगर नावाचं खेडं आहे. त्या खेड्याच्याही शेजारी एका शांत, निवांत रानघरात ‘अक्षर मानव’ संघटनेकडून दरवर्षी माणसांचं एक संमेलन भरवलं जातं. दरवर्षीच्या संमेलनाला एक विषय किंवा एक नाव दिलं जातं. किंवा असं म्हणू या की, माणसाच्या जगण्यातली एक संकल्पना दिली जाते आणि त्या संकल्पनेच्या भोवती पूर्ण तीन दिवस गप्पा मारत, चर्चा करत, त्या संकल्पनेचा आनंददायी आणि तेवढाच गंभीर, समाजाला उपयुक्त उलगडा करत हे संमेलन चालतं.

अक्षर मानवनं पहिल्या वर्षी ‘मी संमेलन’ भरवलं होतं, दुसर्‍या वर्षी ‘मी-तू संमेलन’ भरवलं होतं, तिसर्‍या वर्षी ‘आपण संमेलन’ भरवलं होतं. ठिकाण तेच, खिंगर.

या वर्षीच्या संमेलनाची तयारी सुरू झाली आहे आणि संकल्पना आहे, ‘समाज.’ संमेलनाचं नाव आहे ‘समाज संमेलन.’

संमेलनाचा मुख्य उद्देश आहे, माणसाशी माणसाला जोडणं. त्यामुळं कसला भेदाभेद न करता, सर्व क्षेत्रांतली, सर्व भागांमधली, सर्व गटातटांची माणसं इथं बोलावली जातात. या संमेलनात सहभागी होणारी सर्वच्या सर्व माणसं तीन दिवस आणि चार रात्री एकत्र राहतात आणि एकमेकांशी सतत बोलत एकमेकांना जाणून घेत असतात.

या संमेलनाचा कसलाही गाजावाजा केला जात नाही, पण हस्ते-परहस्ते महाराष्ट्रभर निरोप दिले जातात व माणसं जमतात. (हे असं संमेलनाबद्दलचं पत्र मी पहिल्यांदाच लिहितो आहे. संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून हा पत्रप्रयोग.) कुणालाही कसलंही निमंत्रण दिलं जात नाही. मानापानाच्या कसल्याही कल्पना राबवल्या जात नाहीत. सगळी माणसं समान आहेत आणि माणसं माणसाकडं जातातच या विश्‍वासावर माणसं जमतात.

प्रत्यक्ष संमेलनातही फारशा औपचारिकता नसतात. उद्घाटन, अध्यक्ष, दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, हारतुरे काही नसतात. जमलेल्या सर्व लोकांमधून ऐन वेळी कसलीही नियोजित कार्यक्रमपत्रिका तयार न करता एका व्यक्तीला बोलावलं जातं आणि एका खुर्चीत बसवून, तिला हव्या त्या विचारावर, विषयावर बोलू दिलं जातं. त्या व्यक्तीशी समोर बसलेले लोक मुक्तपणे संवाद करतात आणि असं सलग तीन दिवस चालतं. औपचारिक समारोपही होत नाही.

कसलीही औपचारिकता नसली संमेलनात, तरीही या संमेलनात भांडणं होत नाहीत, वाद होत नाहीत. त्यासाठी मुळात हे संमेलन नाही, तर माणसांनी एकमेकांना आस्थेनं समजून घेण्यासाठी, माणूस घडवण्यासाठी आणि माणसांमध्ये सर्व मतांच्या भेदांच्या पल्याड जाऊन आत्मीयता निर्माण होण्यासाठी हे संमेलन आहे, हे पथ्य पाळलं जातंच. आणि दरवर्षी मानवी आयुष्यातल्या नवनव्या संकल्पना घेऊन हे संमेलन होत राहणार आहे. वर्षभर आपण सगळे राबत असतो. आपण निरनिराळ्या उपद्व्यापात अडकलेले असतो. अपेक्षित असं असतं की, वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी पाच दिवस या संमेलनाच्या निमित्तानं माणसांनी सुट्टीचे म्हणून आणि सर्वांबरोबर आनंदानं एकत्र राहण्याचे म्हणून वेगळे काढावेत आणि खिंगरमध्ये निवांत राहायला यावं.

संमेलन तीनच दिवसांचं असतं. त्या तीन दिवसांच्या आदला दिवस महाराष्ट्रभरातल्या संमेलनाला येणार्‍या लोकांनी येण्याचा प्रवास करावा आणि संमेलनाच्या आदल्या रात्रीच खिंगरला पोहोचावं, म्हणजे संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून सर्वांना एकमेकांना साक्षी राहता येतं. संमेलनाच्या तिसर्‍या रात्री दहा वाजता (किंवा उशिराही) समारोप झाला की, त्यानंतरच्या सकाळी सर्वांनी आपापल्या गावाकडचा परतीचा प्रवास सुरू करावा, असं अपेक्षित असतं. म्हणजे सर्वांनी एकून चार रात्री आणि तीन दिवस एकत्र राहावं असं अभिप्रेत असतं. हे एकत्र राहणं म्हणजेच संमेलन. हे संमेलन काही बाबतीत आग्रही आहे. म्हणजे असं की, संमेलनाला येताना प्रत्येकानं आदल्या रात्रीच खिंगरला पोहोचावं, पूर्णपणे तीन दिवस संमेलनातच राहावं आणि सगळे तीन दिवस संपल्यावर पुढच्या सकाळी तिथून निघावं. ‘मला खूप कामं आहे, माझं बोलून झाल्यावर मी जातो’ असं कुणीही म्हणू नये. तशा खूप क्रांतिकार्य करणार्‍या लोकांनी संमेलनात येऊच नये अशीच अपेक्षा आहे. येण्याचा एक दिवस, संमेलनाचे तीन दिवस आणि जाण्याचा एक दिवस एवढा वेळ देऊ शकणार्‍या लोकांनी आणि तीनही दिवस संमेलनातच, लोकांमध्ये रमणार्‍या लोकांनीच खिंगरला यावं अशी अपेक्षा आहे. त्या अर्थानं या संमेलनात कुणीही ‘पाहुणा’ नसतो.

संमेलनात येणार्‍या कुठल्याही व्यक्तीला येण्याजाण्याचा खर्च, मानधन असं काही दिलं जात नाही. राहण्याचीही स्वतंत्र व्यवस्था नसते. पण सर्वांना चार रात्री, तीन दिवस जेवाखावायला चांगलं घातलं जातं. चहा-नाश्ता मिळतो. या राहण्याखाण्याचे कुणाकहूनही कसलेही पैसे घेतले जात नाहीत. (एखाद्या गावातून अनेक जण येणार असतील तर ‘अक्षर मानव’ यंत्रणेकडून त्यांना एकमेकांशी जोडून दिलं जातं आणि ते लोक एकमेकांबरोबर येताना-जाताना खर्चाचं आणि आनंदाचं वाटप करत येऊ-जाऊ शकतात.) राहण्याची व्यवस्था स्वच्छ आणि ऊबदार असते. अंघोळीला गरम पाणीही असतं. भारतीय आणि विदेशी अशी प्रसाधनाची सोय असते. लागलंसवरलं तर देखभाल करायला माणसंही असतात. सोबतीला निकोप, निरोगी पाऊसही असतो. महिलांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाते आणि मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात दारूला बंदी असते. त्यामुळं दारूशिवाय जगूच न शकणार्‍यांनी या संमेलनाकडे फिरकू नये, अशी अपेक्षा असते.

या संमेलनामुळं सामाजिक संस्कार घडतात, हा विश्‍वास आहे आणि तो अनुभव गेली तीन वर्षे येतो आहे. इथली मतमतांतरं सर्वदूर पोहोचतात आणि पुढच्या काळात ती सर्वत्र नांदत, निनादत असतात. आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या आणि दिशादर्शक गोष्टी या संमेलनामध्ये बोलल्या-ऐकल्या जातात. त्या अर्थानं ही संमेलनं खूप अर्थपूर्ण आणि खोल चिंतन-मननाची होतात. या वर्षीच्या संमेलनासाठी आपण यावं म्हणून हे खुलं निमंत्रण. आपणास यायला जमणार असेल तर कृपया ०२०-३०४२६६७९ वर जरूर कळवा.

राजन खान, अध्यक्ष, अक्षर मानव