शिक्षण
| तारीख: 7/9/2012 12:05:39 AM |
विवेकानंदांचे शिक्षणविषयक विचार
स्वामी विवेकानंदांच्या दिव्यदृष्टीला भारत हा केवळ भूखंड दिसत नव्हता, तर भारताच्या ऋषी-मुनींनी, थोर विचारवंतांनी, लोकोत्तर संत-महात्म्यांनी, सती-साध्वींनी निर्माण केलेली प्राचीन आध्यात्मिक परंपरा दिसत होती. भारताचे पुनरुत्थान स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे अनुसरण केल्यानेच होऊ शकेल. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी वेदान्त व पाश्चिमात्य विज्ञान यांचा समन्वय साधून, श्रद्धा व आत्मविश्वास अंत:करणात बाळगून, स्वतंत्रबुद्धीने आपल्या प्राचीन ज्ञानशाखांचा अभ्यास करण्याची व ते आदर्श जीवनात उतरविण्याची स्वामीजींनी आवश्यकता प्रतिपादिली आहे.
स्वामी विवेकानंदांचे शिक्षणाविषयक विचार मोठे मार्मिक आहेत. स्वामीजी म्हणतात- शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रगटीकरण. शिक्षण म्हणजे भाराभर माहितीने मन भरणे नव्हे. साधन निर्दोष करणे आणि स्वत:च्या मनावर पूर्ण प्रभुत्व मिळविणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. आयुष्यभर आत्मसात न झालेला व मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला असा ज्ञानाचा भारा म्हणजे काही शिक्षण नव्हे! आपल्याला जीवन घडविणारे, माणूस निर्माण करणारे, चारित्र्य घडविणारे व चांगले विचार आत्मसात करविणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही जर चार-पाच विचार चांगले आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरविलेत, तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणार्या व्यक्तीपेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल. शिक्षण व निव्वळ माहिती ही एकच मानली, तर ग्रंथालयांना थोर महात्मे व ज्ञानकोशांंना ऋषी म्हणावे लागेल!
चारित्र्य घडविणारे, मानसिक बळ वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण पाहिजे. जे शिक्षण लाभल्याने सामान्य जनता जीवनसंग्रामाला लायक होऊ शकत नाही त्याला काय शिक्षण म्हणायचे? ज्या शिक्षणाने माणूस जीवनात आपल्या पायावर उभा राहू शकतो तेच खरे शिक्षण. वेदान्त असे म्हणतो की, मनुष्याच्या आतच- मग तो लहान मुलगा का असेना- सर्व ज्ञान साठविलेले आहे. फक्त ते जागृत करावे लागते आणि एवढेच शिक्षणाचे कार्य असते. मुलांना शिक्षण द्यायचे म्हणजे एवढेच करायचे की, बुद्धी कशी वापरावी हे त्यांना दाखवायचे. हात-पाय, कान-डोळे यांचा उत्तम उपयोग कसा करायचा हे त्यांना स्वतंत्रपणे सुचले की, सगळे काम अगदी सोपे झाले असे समजा. मुलांनी अगदी किशोरावस्थेपासून उज्ज्वल चारित्र्यसंपन्न व्यक्तीजवळ राहिले पाहिजे. सर्वोच्च शिक्षणाचे जिवंत उदाहरण नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. खोटे बोलणे हे पाप आहे, असे नुसते वाचून उपयोग नाही. त्यांनी पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करायला शिकले पाहिजे. केवळ त्यानंतरच श्रद्धा आणि विश्वास निर्माण होतील. ज्याच्या ठायी श्रद्धा व विश्वास नाही तो खोटे बोलणारच. आपल्या देशात नेहमी त्यागी पुरुषच ज्ञानदानाचे कार्य करीत आले आहेत. ज्ञानदानाचे कार्य जोपर्यंत त्यागी लोकांकडून होत होते तोपर्यंत भारताचे भविष्य उज्ज्वल होते. स्वामीजींचा धर्मकेंद्रित शिक्षण-योजनेवरदेखील भर होता. त्यांच्या मते आपले एखादे मंदिर असले पाहिजे, कारण हिंदूंना सर्व गोष्टींच्या आधी धर्म हवा असतो. सर्व संप्रदायांचे सर्वोच्च प्रतीक जे ॐ तेच केवळ या मंदिरात राहील. येथे जर असा एखादा संप्रदाय असेल की, ज्याला ॐ हे प्रतीक असू नये असे वाटत असेल, तर त्याला स्वत:स हिंदू म्हणविण्याचा अधिकार नाही. या ठिकाणी सर्व संप्रदायांना आपापली तत्त्वे या मंदिरात येऊन मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असावे. त्यांना फक्त एक पथ्य पाळावे लागेल; आणि ते म्हणजे अन्य पंथांशी कलह करावयाचा नाही.
स्वामीजींना नकारात्मक नव्हे, तर सकारात्मक शिक्षण हवे होते. त्यांच्या मते जी श्रद्धा वेद-वेदान्ताचा मूलमंत्र आहे; ज्या श्रद्धेने नचिकेत्याचे ठायी साक्षात यमाला तोंड देऊन त्याला प्रश्न विचारण्याचे साहस निर्माण केले होते; ज्या श्रद्धेच्या बळाने हे जग चालते त्या श्रद्धेचा लोप! म्हणूनच आपण विनाशाच्या इतके जवळ येऊन ठेपलो आहोत. आता तरणोपाय म्हणजे शिक्षणाचा फैलाव, विद्येचा प्रसार.
यापूर्वी कामगारवर्ग दीर्घकाळ दुर्लक्षित राहिला आहे. कामगारवर्गाने शिक्षणाकडे येण्याऐवजी शिक्षण त्यांच्याकडे पोहोचले पाहिजे. स्वामीजींनी अचूक निदान केले होते की, केवळ शिक्षण मोफत करणे पुरेसे नाही. त्यांना अधिक उत्तेजन देण्याची गरज आहे. शिक्षण त्यांच्या दरवाजापाशी उपलब्ध असले पाहिजे. भारत ज्या दुर्धर रोगांनी गांजला आहे त्यावर शिक्षण हे रामबाण औषध आहे, असे त्यांचे पक्के मत होते. लोकांसमोर विभिन्न देशांचे व विभिन्न जातींच्या लोकांचे वर्णन गोष्टीच्या रूपाने केले, तर समस्त जीवनात केवळ पुस्तकं वाचून जे ज्ञान होईल त्यापेक्षा शेकडोपट अधिक ज्ञान अशा रीतीने तोंडी शिक्षण दिल्याने त्यांना प्राप्त होईल. जरी निसर्गात विषमता असली, तरी सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. अगर काहींना अधिक आणि काहींना कमी संधी मिळणार असेल, तर दुबळ्यांना बळवंतांपेक्षा अधिक संधी दिली गेली पाहिजे.
स्वामीजींनी स्त्रीशिक्षणाबद्दलदेखील विचार मांडले आहेत. धर्म, कला, विज्ञान, गृहविज्ञान, पाकशास्त्र, शिवणकला, आरोग्यशास्त्र वगैरेंसारख्या विषयांची मूलतत्त्वे तरी त्यांना (स्त्रियांना) शिकवावयास हवीत. शिक्षणाने सार्याच बाबतीत डोळसपणा यायला हवा. आदर्शभूत स्त्रियांची चरित्रे सतत विद्यार्थिनींसमोर ठेवून त्यागाच्या उच्च व्रताबद्दल, ध्येयनिष्ठेबद्दल व धैर्यवान होण्यास त्यांच्या मनात अभिरुची उत्पन्न करावयास हवी. सीता, सावित्री, दमयंती, लीलावती, मीरा वगैरेंची चरित्रे स्त्रियांना समजावून देऊन त्याच आदर्शानुसार तुमची जीवने तुम्ही घडवा, हे त्यांच्या मनावर ठसावयास हवे. धर्मशिक्षण, शीलसंवर्धन, ब्रह्मचर्यव्रतपालन यांकडे लक्ष द्यायला हवे- शिक्षणाने हेच साधावयाचे असते.
माणसांच्या बोलीभाषेतून शिक्षण असावे, असा स्वामीजींचा कटाक्ष असे. बुद्धांपासून तो चैतन्य-रामकृष्णांपर्यंत जे जे ‘लोकहिताय’ आले होते, त्या सार्यांनी साधारण लोकांच्या भाषेतच त्या लोकांना शिकविले. ज्या भाषेतून राग, दु:ख, प्रेम वगैरे प्रगट करीत असतो; तिच्यापेक्षा शिक्षणासाठी अधिक योग्य भाषा असूच शकत नाही. स्वत:चे मनोभाव व्यक्तविण्याच्या त्याच शैलीला आपण चिकटून राहिले पाहिजे. तीच सदैव उपयोगात आणीत राहिले पाहिजे. भाषेच्या साधेपणातच शिक्षणाचा मोठेपणा सामावलेला असतो.
विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षणाबाबतदेखील स्वामीजींचा डोळस दृष्टिकोन होता. दारिद्र्याचा प्रश्न कसा सोडवता येईल? त्यांच्या ध्यानात आले की, या प्रश्नाचे उत्तर विज्ञान व तंत्रज्ञानात सामावलेले आहे. पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग भारताने विस्तृत प्रमाणावर देशात औद्योगिक क्रांती घडवून आणण्यासाठी करावा. पाश्चिमात्य जगाने विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून दारिद्र्याविरुद्धची लढाई कशी जिंकली, हे त्यांनी पाहिले होते. हाच चमत्कार शेजारच्या जपाननेदेखील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने घडवून आणला होता. दारिद्र्याशी झगडण्यासाठी भारताने पाश्चिमात्य जगाच्या पावलावर पाऊल ठेवत अग्रेसर व्हावे. मात्र, इतर कुठल्याही बाबतीत त्यांचे अनुकरण करू नये, असे स्वामीजींचे मत होते.
स्वामी विवेकांदांचा शिक्षणाद्वारे चारित्र्याच्या घडणांवर भर असे. त्यांच्या मते, पुस्तकीज्ञान संपादन करणे, परीक्षा उत्तीर्ण होणे, पदव्या व प्रमाणपत्रे मिळविणारे शिक्षण खचीतच नाही! त्यांच्या दृष्टीने शिक्षण हे केवळ माहितीचे भांडार असू नये, तर ते अधिक अर्थपूर्ण ज्ञान असावे. शिक्षणाने माणूस घडला पाहिजे, जीवन प्रगल्भ झाले पाहिजे आणि चारित्र्याची बांधणी झाली पाहिजे. शिक्षणाने विचार आत्मसात करण्याचे सामर्थ्य आले पाहिजे. शिवाय विविध कौशल्ये संपादित करण्याचाही त्यात समावेश असला पाहिजे, जेणेकरून शिक्षण उत्पादकही ठरू शकेल. सध्या अस्तित्वात असलेली शिक्षण पद्धती माणसाला स्वत:च्या पायावर उभे राहण्यास समर्थ करत नाही, ही दुर्दैवाची बाब असून, ते शिकणार्याचा आत्मसन्मान व आत्मविश्वासही जागृत करत नाही. स्वामीजींना भारतासाठी असे शिक्षण पाहिजे होते की, जे भारताचा आदर्शवाद व पाश्चिमात्यांची कार्यक्षमता यांची सांगड घालू शकेल. भारताने उच्च विचारांची निर्मिती तर केली आहे; परंतु त्यांपैकी थोड्याच विचारांना प्रत्यक्षात अमलात आणले गेले आहे. ही पोकळी भारतातील सर्व वाईट सामाजिक गोष्टींना जन्म देणारी आहे, असे स्वामीजींचे मत होते. याचे एक उदाहरण म्हणून ते जातिसंस्थेकडे बोट दाखवतात. श्रमविभागणीच्या तत्त्वावर आधारलेली खरे तर ती एक आदर्श प्रथा होती. वास्तविक तिचा उद्देश प्रत्येकाला काही अलौकिक करण्याच्या त्यांच्या शक्तीला संधी व चालना प्राप्त करून देणे हा होता. परंतु, ही जातिसंस्था जेव्हा निरनिराळ्या स्तरांत विभागली जाऊन आनुवांशिक बनली तेव्हा ती तिच्या करणीनेच स्वत:चे कार्य बिघडविणारी व म्हणून स्वपराभूत झाली. जातिवाचक व्यवहाराचा धिक्कार अतिशय कडक शब्दांत स्वामीजींशिवाय इतर कुणीही केला नाही. परंतु, यावर उपाय काय? पुन्हा स्वामीजींचे उत्तर असेल- शिक्षण! योग्य व चांगले शिक्षण दिले गेले, तर आज जे मागासलेले आहेत ते आपले हक्क पुन्हा परत मिळवू शकतील.
- अनंत ताम्हणे
०७१२-२२४८२७१