मालूम क्या बँड एड
| तारीख: 8/10/2012 12:51:40 PM |
गंमत म्हणजे, ‘बँड एड’ हे एक ब्रँडनेम आहे. या प्रकारच्या पट्टीला खरं तर स्टिकिंग प्लास्टर म्हणतात. जखमेच्या ठिकाणी चिकटेल अशी औषधी पट्टी पहिल्यांदा बनली १९२१ मध्ये. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या अर्ले डिकीन्सन नामक कर्मचार्याने ही पट्टी तयार केली. आणि ‘जॉन्सन अँड जॉन्सन ऍडेसिव्ह बँडेज’असे नाव दिले.
खेळताना तुम्हाला कुठे खरटचलं किंवा कापलं तर त्याच्यावर कसलं तरी मलम लावावं लागतं, हे तुम्हाला ठावूकच आहे. पण कधी औषध चटकन हाताशी लागलं नाही तर एक छोटीशी पट्टी लावली जाते. तिला ‘बँड एड’ असं म्हणतात. नावाप्रमाणेच ही औषधी पट्टी लागलेल्या ठिकाणी अगदी घट्ट चिकटून बसते. त्यामुळे अनेक जण नेहमी बँड एडची पट्टी घरात किंवा स्वत:जवळ बाळगतात.
या इवल्याशा पट्टीची उपयुक्तता खरंच खूप मोठी आहे. कारण जखम झाल्यावर औषध लावायचं तर त्यावर पट्टी वगैरे बांधावी लागते. ती अनेकदा निघते. मग जखम उघडी पडते. इकडे-तिकडे स्पर्श झाल्यानं त्यावर लावलेलं औषध निघून जातं. याउलट खरचटलेल्या, लागलेल्या ठिकाणी बँड एड पट्टी लावली की, झालं काम. तिथं आणखी काही लावायला नको. सारखं औषध लावायची गरज नाही की, पट्टी बदलायची. दोन दिवसांनी पट्टी काढली तरी हरकत नसते. बहुतेकदा तोपर्यंत जखम सुकलेली असते. बँड एड पट्टी लावली असेल तर फार जपावंही लागत नाही. म्हणजे हाताला बँड एड लावलं असल्यास तुम्ही पाण्यात हात घालू शकता आणि आपलं कामंही करू शकता.
गंमत म्हणजे, ‘बँड एड’ हे एक ब्रँडनेम आहे. या प्रकारच्या पट्टीला खरं तर स्टिकिंग प्लास्टर म्हणतात. जखमेच्या ठिकाणी चिकटेल अशी औषधी पट्टी पहिल्यांदा बनली १९२१ मध्ये. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या कंपनीनं ‘जॉन्सन अँड जॉन्सन ऍडेसिव्ह बँडेज’ या नावानं ती तयार केली. ही कंपनी ड्रेसिंग मटेरियल, सर्जिकल टेप आणि मलमपट्टीसाठी लागणार्या इतर गोष्टींचं उत्पादन करत असे. विशेष म्हणजे, स्टिकिंग प्लास्टरचा शोध खूप संशोधन करून वगैरे लागला नव्हता, तर डिकिन्सनला सतावणार्या एका समस्येवर उपाय म्हणून लागला होता. डिकिन्सनची बायको जोसेफिन अतिशय धडपडी होती. म्हणजे ती सारखी कुठे ना कुठे पडत, ठेचकाळत असायची. त्यामुळे तिला सतत लागायचं, खरचटायचं. तिच्या जखमांना मलमपट्टी करताना डिकिन्सन वैतागून जायचा. कारण, यामध्ये त्याचा बराच वेळ जायचा.
एकदा त्याने ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीच्या तेव्हा बाजारात उपलब्ध असलेल्या मलमपट्टीतून एक रेडी-टू-युज म्हणजे थेट वापरता येईल, अशी पट्टी तयार करण्याचं ठरवलं. त्यानं सर्जिकल टेप घेतली आणि तिच्यावर अँटिसेप्टिक मलम लावलं. त्याच्यावर मग ती पट्टी स्वत:लाच चिकटू नये यासाठी क्रिनोलिनचं आवरणं दिलं व त्याची एक रीळ तयार केली. या रीळातून हवी तेवढी पट्टी कापून जखमेवर लावायची. सुरुवातीला डिकिन्सनचा शोध फार लोकप्रिय झाला नाही. परंतु १९२४ मध्ये ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीनं या औषधी चिकटपट्ट्या छोट्या आकारात विकायला सुरूवात केली. त्यानंतर बँड एड घराघरात बाळगलं जाऊ लागलं. त्यावेळी पंधरा बँड एड पट्ट्यांची किंमत दोन सेंट इतकी होती. बँड एडमुळे मलमपट्टी करण्याचं काम एकदम सोपं झालं आणि मलमपट्टी करण्यातला वेळही वाचू लागला. हाय हिल म्हणजे महिलांच्या उंच टाचांमुळे पायांना होणारा त्रासही बँड एड पट्टीमुळे दूर झाला.
अमेरिकेत ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीची बँड एड लोकप्रियता मिळवत असतानाच १९२८ मध्ये ब्रिटन येथे स्टिकिंग प्लास्टरचा आणखी एक प्रकार ‘इलॅस्टोप्लास्ट’ या नावानं बाजारात आला. ‘स्मिथ अँड नेफ्यु’ कंपनीनं तो शोधला होता. मुळात तो व्हेरिकोज अल्सरच्या पेशंटसाठी वापरला जात असे. सुरुवातीला त्यालाही फार प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु एका डॉक्टरनं लेख लिहून हा ड्रेसिंगचा नवा प्रकार व्हेरिकोज अल्सरच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं, तेव्हा त्याचा खप वाढू लागला. बराच काळ इलॅस्टोप्लास्ट हा ‘स्मिथ अँड नेफ्यु’ कंपनीचं सगळ्यात जास्त चालणारं उत्पादन होतं. स्टिकिंग प्लास्टरचा सर्वाधिक वापर दुसर्या महायुद्धाच्या वेळी झाला.
सुरुवातीला स्टिकिंग प्लास्टरच्या पट्ट्या कापडी असत. त्यानंतर त्या प्लॅस्टिक, लॅटेक्स रबरच्याही बनू लागल्या. त्यामुळे त्या वॉटरप्रूफही बनल्या. तसंच त्या आकर्षक करण्यासाठी सुपरमॅन, बॅटमॅन, स्माइली आणि बार्बी अशा वेगवेगळ्या आणि रंगबेरंगी थीममध्ये स्टिकिंग प्लास्टर बाजारात आले. स्टिकिंग प्लास्टरची मर्यादा अशी की, जखम लहान असेल आणि फारशी गंभीर नसेल तरच त्यांचा वापर करता येतो. लहानसहान जखमांसाठी आजही स्टिकिंग प्लास्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अर्थात, स्टिकिंग प्लास्टरचं ‘बँड एड’ हे एक निव्वळ नाव आहे, हे अनेकांना आजही ठावूक नसेल.
शर्वरीताई