Tarun Bharat   Like Minded

Updated at: 19/05/2013 12:27:58
     
तुमचे शहर निवडा

अंधश्रद्धेचे ग्रहण

तारीख: 8/2/2012 2:50:11 PM

 

 

ग्रहणाबद्दलच्या भ्रामक समजुती आणि चुकीच्या रूढी, रीतिरिवाजांमुळे ग्रहणकाळात अनेक बंधनं पाळली जातात आणि पाळायला लावली जातात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना असं का, असं विचारलं तर विचारणार्‍यांचीच अक्कल काढली जाते. घरातल्या वडीलधार्‍यांचं ऐकलं नाही तर त्यांची नाराजी ओढवायची आणि हट्टाने आपलं म्हणणं पुढे रेटलं तर आणि त्यातून योगायोगाने काही वाईट घडलं तर त्याचं खापर आपल्याच माथी फुटायचं. मग विषाची परीक्षा कशाला, असा विचार केला जातो आणि निमूटपणे मनाविरुद्ध वडीलधार्‍यांचं म्हणणं ऐकलं जातं.

 

नयना उद्या ग्रहण आहे. उद्या कुठंही घराबाहेर पडायचं नाही. आणि हो सकाळी आठच्या आतच काय खायचं ते खाऊन घे नंतर दुपारी तीनपर्यंत काहीही खाता येणार नाही. ललिताबाई त्यांच्या सुनेला, नयनाला सांगत होत्या. खरं तर जानेवारी महिना उजाडल्यापासूनच ललिताबाईंच्या आतापर्यंत किमान शंभर वेळा तरी या सूचना देऊन झाल्या होत्या. नयनालाही या सगळ्या सूचनांची टेप तोंडपाठ झाली होती. नयनाला खरं तर पहिल्यापासून खगोलशास्त्राची आवड होती. लग्न होण्याआधी खगोलप्रेमी मंडळाच्या अनेक उपक्रमांत ती सहभागी झाली होती. त्यामुळे हे सूर्यग्रहण पाहण्याची संधी नयनाला दवडायची नव्हती. पण हे सूर्यग्रहण पाहण्याची इच्छा जेव्हा तिने व्यक्त केली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला चक्क वेड्यात काढलं. याचं कारण तिने विचारलं असता तिला दिवस गेल्यामुळे तिने हे ग्रहण पाहणं, हे तिच्या होणार्‍या बाळासाठी हानीकारक असल्याचं सांगण्यात आलं. हे कारण ऐकल्यावर नयनाला कशी प्रतिक्रिया द्यावी, हेच कळेना. तिने याबाबत घरच्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते कुणीही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. शेवटी वाद नको म्हणून तिने आपला हट्ट सोडून दिला आणि घरच्यांच्या म्हणण्यानुसार तिने घरातच बसण्याचा निर्णय घेतला.

 

अशा अनेक नयना आपल्या आजूबाजूला असतात. ग्रहणाबद्दलच्या भ्रामक समजुती आणि त्याच्याशी संबंधित चुकीच्या रूढी, रीतिरिवाजांमुळे ग्रहणकाळात अनेक बंधनं पाळली जातात आणि पाळायला लावली जातात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना असं का, असं विचारलं तर त्याचं योग्य ते उत्तर ते देऊ शकत नसल्याने विचारण्याचीच अक्कल काढली जाते आणि आम्ही नाही हो असे प्रश्न कधी आमच्या वडीलधार्‍यांना विचारले, हल्लीच्या पिढीला काही रितीरिवाज पाळायचे असतात याचं भानच नाही, वगैरे मत सर्रास व्यक्त केलं जातं. मग अशा वेळी नेमकं काय करायचं, असा प्रश्न मनात येतो. बरं, घरातील वडीलधार्‍यांचं ऐकलं नाही तर त्यांची नाराजी ओढवायची आणि हट्टाने आपलं म्हणणं पुढे रेटलं तर आणि त्यातून योगायोगाने काही वाईट घडलं तर त्याचं खापर आपल्याच माथी फुटायचं. मग विषाची परीक्षा कशाला, असा विचार केला जातो आणि निमूटपणे मनाविरुद्ध वडीलधार्‍यांचं म्हणणं ऐकलं जातं.

 

खगोलशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक दा. कृ. सोमण यांना लोकांच्या मनातील अंधश्रद्धेच्या या ग्रहणाविषयी विचारलं असता त्यांनी सांगितलं, पूर्वापारपासून अशा प्रथा आपल्याकडे पाळल्या जात आहेत. पूर्वीच्या काळी खगोलशास्त्राचा फारसा अभ्यास केला जात नसल्याने अशा प्रथा पाळल्या जात होत्या. मग यामध्ये गर्भवती महिलांनी ग्रहणकाळात घराबाहेर पडू नये, नाही तर त्याचा बाळावर विपरीत परिणाम होतो, ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी भाज्या चिरू नयेत, नाही तर होणार्‍या बाळात व्यंग निर्माण होतं किंवा ग्रहणकाळात गर्भवती महिलांबरोबरच इतरांनीही काहीही खाऊ-पिऊ नये, असे सल्ले वडीलधार्‍यांकडून दिले जातात. पूर्वीच्या काळी खगोलशास्त्राचा अभ्यास फारसा केला जात नसल्याने या प्रथा अगदी कसोशीने पाळल्या जाताते. पण आता खगोलशास्त्राचा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासानुसार असल्या गोष्टींमध्ये फारसं तथ्य नाही, असं आता आपण ठामपणे म्हणू शकतो.

 

खरं तर सूर्य किंवा चंद्रग्रहणासारखी खगोलीय घटना पाहणं आणि अनुभवण्यातील आनंद काही औरच आहे. या ग्रहणाच्या माध्यमातून अवकाशाचा अभ्यास करण्याची संधी मिळत असते. पण गैरसमजुतींमुळे हा आनंद हिरावून घेतला जातो. ग्रहणकाळात विशेषकरून संपूर्ण सूर्यग्रहण काळातील वातावरणाचा गर्भवती महिलांच्या गर्भावर काही परिणाम होतो का, यावर संशोधन सुरू असल्याचं मत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गीतांजली शहा यांनी व्यक्त केलं. पण म्हणून ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये किंवा त्यांनी त्यांचे दैनंदिन व्यवहार करू नयेत, असं सांगणं सर्वस्वी चुकीचं आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार ग्रहणकाळातील वातावरणाचा परिणाम गर्भावर होतो, ही समजूतही सर्वस्वी चुकीची असून उलट ग्रहणकाळात गर्भवतीने न खातापिता राहणं अयोग्य आहे व अशा रूढी अमानवीयच असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

जुन्या काळातील प्रथा पाळण्याच्या नादात आपण किती तरी चुका करतो, हे सांगताना दा. कृ. सोमण म्हणाले, ‘ग्रहणकाळात हवा प्रदूषित होते असा समज असल्याने ग्रहण संपल्यावर घरातील पाणी चक्क ओतून दिलं जातं. आताच्या या पाणीटंचाईच्या काळात असं पाणी ओतून देणं, हे तर घोर पाप आहे. इतकंच नाही तर ग्रहण संपल्यावर ‘दे दान सुटे गिर्‍हाण...’ असं मागत येणार्‍यांना घरातील जुने कपडे देऊन पुण्य मिळवण्याचा प्रकार केला जातो. वास्तविक तुम्हाला कुणा गरिबाला कपडेच देऊन त्याला मदत करायची असेल तर नवीन कपडे का द्यायचे नाहीत?’

 

विज्ञानाच्या मदतीने माणसाने सृष्टीतील अनेक रहस्यं उलगडली आहेत. खगोलशास्त्राचा सखोल अभ्यास केला जात असल्यामुळे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण का होतं, हेही आता रहस्य राहिलेलं नाही. यामुळे राहूने सूर्याला गिळल्यामुळे सूर्यग्रहण होतं किंवा केतूने चंद्राला गिळल्यामुळे चंद्रग्रहण होतं, या समजुतींना आता तरी फाटा द्यायाला हवा. पण ग्रहणाशी संबंधित जुने रितीरिवाज, संकल्पना मात्र अद्याप बदललेल्या नाहीत. या संकल्पनांमध्ये बदल घडवण्याची नितांत गरज आहे. हे बदल घडले तर खर्‍या अर्थाने आपण सुशिक्षित झालो, असं म्हणता येईल.

 

टिम क्रिएटर