Tarun Bharat   Like Minded

Updated at: 22/05/2013 08:16:26
     
तुमचे शहर निवडा

गर्भसंस्कार

तारीख: 8/2/2012 2:47:12 PM

 

 

‘शुद्ध बिजाचिंये पोटी फळे रसाळ गोमटी’ ही तुकाराम महाराजांनी सांगितलेली उक्ती तंतोतंत खरी आहे. ‘बी’ जर चांगले असेल, तर त्याला येणारी फळेही निश्‍चितच चांगली असतात. तद्वतच माता जर सशक्त व सुदृढ असेल, तर तिच्या कुशीतून जन्माला येणारे बाळ हेसुद्धा निश्‍चितच चांगले निपजेल, यात शंकाच नाही आणि म्हणूनच आजकाल बाळ जन्माला येण्यापूर्वीच गर्भावस्थेत असतानाच बाळावर ‘गर्भसंस्कार’ हे अतिशय महत्त्वाचे असतात. मोठ्या शहरांमधून तर असे गर्भसंस्कार केंद्र सुरू आहेत व लहान गावांमध्येसुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बरेच ठिकाणी ही केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. पण, खरंच आज या केंद्राची गरज आहे का? आईने आपल्याच बाळावर संस्कार करण्यासाठी दुसर्‍यांकडून शिकून नंतर संस्कार करावेत, हे कितपत योग्य आहे? आपल्या मनाला जरी पटत नसले, तरी आज या गोष्टींची गरज निर्माण झाली आहे, त्याची अनेक कारणे आहेत.

 

आज व्यवसायानिमित्त विभक्त कुटुंब पद्धती आहेत. घरातील मोठ्या व्यक्ती नसल्यामुळे आजच्या मातांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नाही. गरोदर मातेने चांगले बोलावे, चांगले वागावे, चांगले वाचावे, चांगले पाहावे हे कुठेतरी लोप पावले आहे. आज चांगल्या वाचनाची, पाहण्याची जागा ही घरोघरी टीव्हीने घेतली आहे. घरातील प्रत्येक महिला ही संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून नमस्कार करण्याऐवजी टीव्हीवरील सीरियल्स पाहण्यात मग्न असते. घरात पौष्टिक अन्न तयार करून खाण्यापेक्षा बाहेरची पाणी-पुरी जास्त आवडते.

 

घरातील छोट्या-मोठ्या कामांमुळे व्यायाम होतो, शरीर हलके राहते, प्रसूती सुलभ होते, पण असे असताना मात्र आजच्या काळात फक्त बेडरेस्ट घेतली जाते आणि त्यामुळेच आज सिझरियनचे प्रमाण वाढले आहे. या धकाधकीच्या काळात मातांना स्वत:वरच वेळ खर्च करण्यासाठी वेळ नसतो. चांगले साहित्य वाचले जात नाही आणि अशा सर्व कारणांमुळे आज गर्भसंस्कार कसे करावे, हे बाहेर जाऊन शिकण्याची गरज निर्माण झाली आहे. बाळाच्या विकासाची सुरुवात ही जन्माला येण्यापूर्वीच सुरू झालेली असते, हे सर्वांनाच माहिती आहे.

 

गर्भावस्थेत काय खावे? कसे वागावे? आनंदी कसे राहावे? व्यायाम कसा करावा? कोणत्या महिन्यात कोणते साहित्य वाचावे? कोणता व्यायाम करावा? कोणता आहार घ्यावा? बाळाच्या आगमनाची पूर्वतयारी कशी करावी...? हे सर्व या संस्कार केंद्रात शिकविले जाते.

 

माझ्या मते तर आपल्या बाळावर आपण कसे संस्कार करावेत, हे दुसर्‍यांकडून शिकणे मला योग्य वाटत नाही. पण, वरील सर्व कारणांमुळे आज ही गरज निर्माण झाली आहे. काहीही असो, पण आज त्यामुळे भावी पिढीही सशक्त निर्माण होईल, हे महत्त्वाचे आहे. आईही सुदृढ होईल व तिच्या पोटी जन्माला येणारे बाळही निश्‍चित चांगले होईल. त्यामुळे साहजिकच बालमृत्यू, कुपोषण, अपंगत्व, कमी वजनाची बाळे जन्माला येणे यालाही आळा बसण्यास मदत होईल. एकंदरीत देशाची भावी पिढी ही सुदृढ होईल व देशाची उन्नती होईल, यात शंकाच नाही.

 

शहरी, सुशिक्षित महिलांना याची जरी जास्त गरज नसली, तरी ग्रामीण भागात मात्र माता बर्‍याच गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत. त्यांना हे गर्भसंस्कार केंद्र उपयुक्त ठरतील, यात शंकाच नाही. बाळाच्या ‘सुदृढ व्यक्तिमत्त्वाचे गमक’ यात दडलेले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

 

देवश्री कुळकर्णी, अकोला