मनोगत
| तारीख: 8/2/2012 11:28:11 PM |
प्रतिभा आणि प्रतिमा, एकेकाची !
माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभा पाटील आणि त्यांच्या आधीचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम या दोन व्यक्तिमत्वांमध्ये या देशात नेहमीच, विशेषत: गेली पाच वर्षे तुलना होत राहिली. त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांवर, पैलूंवर तुलना, चर्चा आणखी काही वर्षे चालणारच आहे. ही तुलना फक्त या देशातच होत आहे असे नाही. ‘गूगल’ सारख्यांचाही या तुलनेत नकळतपणे का होईना कसा सहभाग आहे पहा.
‘गूगल’ सर्च करून फक्त ‘प्रतिभा पाटील’ असे शब्द टाकल्यास त्यावर ‘प्रतिभा पाटील यांचा मुलगा, पती, परदेश दौरे, प्रवास खर्च’ असे पर्याय (ऑप्शन्स) येतात. याचवेळी ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ यांच्याबद्दल विचारणा केल्यास गूगलवर ‘डॉ. कलाम यांची पुस्तके, विधाने, भाषणे, व्हिजन २०२०’ असे पर्याय येतात. एकाच पदावर राहिलेल्या दोघांची ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ कशी वेगवेगळी असू शकते याचे हे बोलके उदाहरण आणि छायाचित्र.
अनिरुद्ध पांडे, यवतमाळ
राज-भेट
घडू नये ते घडलं आणि शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना हृदय व्यथेने अकस्मात ग्रासलं. ही बातमी मनसेचे अध्यक्ष आणि उद्धव ठाकरे यांचे बंधू राज यांना कळताच ते इतके भावनावश व संवेदनाशील झाले की, अलीबागचा दौरा मध्येच सोडून मागल्या पावली ते लीलावती दवाखान्यात दाखल झाले. उद्धवची आपुलकीने, जिव्हाळ्याने विचारपूस केली. डॉक्टरांशी सुसंवाद साधून उद्धवांच्या आजारपणाचं गांभीर्य जाणून घेतलं आणि स्वत: उद्धवांना मातोश्रीवर पोहोचवून आगळ्या वेगळ्या बंधुप्रेमाचा, कौटुंबिक जबाबदारीचा एक आदर्श समाजासमोर प्रस्थापित केला. राजकारणापेक्षा बंधुप्रेम वरचढ आहे, हा संदेश त्यांनी समस्त महाराष्ट्राला दिला.
या बंधुभेटीने बाळासाहेब, उद्धव, राज आणि समस्त ठाकरे कुटुंबीय क्षणभर का होईना निश्चितच सुखावले असणार. भाऊ भावाच्या मदतीला धावून आला आणि जी सहृदयता दाखविली ती हिन्दू संस्कृती, हिन्दू संस्काराला साजेशीच होती. सहिष्णुता, सहृदयता, परस्पर प्रेमभाव ही हिन्दुत्वाची फार मोठी देणगी आहे, उपलब्धी आहे.
गेल्या ७ वर्षांपासून शिवसेनेशी फारकत घेतलेले राज आणि उद्धव यांच्यातील दुरावा हा सर्वश्रुतच आहे. या दोन्ही बंधूंनी एकत्र नेतृत्व करून शिवसेनेची पताका सर्वमहाराष्ट्रात पसरावी आणि सर्वत्र भगवा फडकावा, अशी महाराष्ट्रातील मराठी जनतेची आशा-आकांक्षा होती. दोघांच्या विभक्त होण्याने हे स्वप्न आज तरी साकार होऊ शकले नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो- मित्र नसतो, येथे तर रक्ताचं नातंच आहे. वैचारिक मतभेदामुळे ते एकमेकाला दुरावले आहेत. यानिमित्ताने ते एकत्र आलेत आणि राजकारणापेक्षा रक्ताचं नातं श्रेष्ठ असल्याचा साक्षात्कार समाजासमोर ठेवला. राज यांच्या कठोर नेतृत्वात सुप्तावस्थेत अंतर्भूत असलेल्या प्रेमळ भावाचे दर्शनही सर्व महाराष्ट्राला घडले. आजच्या या अनपेक्षित भेटीने दोन बंधूंचे मिलन सुदृढ होवो. नातं अतुट राहो आणि उभयतांकडून कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय ध्येयपूर्तीकरिता अथक प्रयत्न होऊन खर्या अर्थाने शिवशाही महाराष्ट्रात प्रस्थापित होवो, हीच समस्त मराठी माणसांची प्रामाणिक सदिच्छा.
दिगंबर शं. पांडे, प्रतापनगर, नागपूर
नीतीशतकम्
अम्भोजिनीवन विलास निवासमेव-
हंसस्थ हन्ति नितरां कुपितो विधाता
|न त्वस्य दुग्धजलभेदविधौ प्रसिद्धां
वैदग्ध्यकीर्तिमप हर्तुमसौ समर्थ:
|अर्थ :- श्रीब्रह्मदेव अत्यंत संतापले तरी (फारतर) हंसाचे निवासस्थान असणारे कमळांच्या कुंजाचे (त्याचे घर) उसकटून टाकू शकतील. मात्र, दूध आणि पाण्याला वेगळे करण्याच्या त्याच्या (नीरक्षीरविवेकरूपी) क्षमतेने लाभलेली त्याची सर्वत्र झालेली चातुर्यपूर्ण कीर्ती दूर करण्यास हे (ब्रह्मदेवही) समर्थ नाहीत.
विद्वान व्यक्तींच्या विरोधात समाजातील अनेक नतद्रष्ट लोक असतातच. मात्र, त्यांनी कितीही प्रयास केला, तरी ते विद्वानांच्या अलौकिक विश्वाचे कधीच नुकसान करू शकत नाहीत. हा फार तर त्यांच्या भौतिक संपदेचा ते विनाश करू शकतात. पण, विद्वानांच्या कीर्तीला कोणी दुष्टच काय अगदी भगवान ब्रह्मदेवही धक्का लावू शकत नाहीत, हाच सिद्धांत प्रस्तुत श्लोकात महाकवी भर्तृहरींनी सुरेखरीत्या प्रतिपादला आहे.
समजा हंसावर कधीतरी ब्रह्मदेव चिडले, तर त्याचेे जास्तीत जास्त काय नुकसान करतील? तर त्याचे निवासस्थान असा कमलकुंज ते नष्टभ्रष्ट करू शकतील. सोप्या शब्दात ‘बेघर’ करू शकतील. मात्र, तो बेघर झाला तरी त्याची कीर्ती कशी जाईल. असे म्हणतात की हंसाजवळ ‘नीरक्षीरविवेक’ असतो. म्हणजे त्याच्यासमोर दूध व पाणी एकत्र करून ठेवले, तर तो पाणी सोडून केवळ दूध पिऊ शकतो. त्या दोन्हींना वेगळे करण्याची ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्याची त्याची ही क्षमता त्याला वैश्विक प्रसिद्धी मिळवून देते. ही त्याची प्रसिद्धी कोणी कशी हिरावून घेणार. त्याला ‘बेघर’ करता येईल. पण, त्याने तो ‘बेकार’ थोडा होईल.
अशीच विवेकशीलता असणार्या पंडितांच्या बाबतीत त्यांचे फारतर भौतिक नुकसान करता येईल. पण, त्यांच्या कीर्तीला कोण हात लावणार? अगदी ब्रह्मदेवही नाही. ते ‘कमलकुंज’ नष्ट करू शकतात. कारण, ती त्यांची निर्मिती आहे. मात्र, कीर्ती हंसाची ‘स्वत:ची’ आहे. दुसरा घालवेल कसा?
प्रा. स्वानंद गजानन पुंड