Tarun Bharat   Like Minded

Updated at: 22/05/2013 08:16:26
     
तुमचे शहर निवडा

मनोरमा दाते शतकोत्तरी

तारीख: 8/2/2012 2:43:01 PM

 

 

मनोरमा दाते उर्फ आत्याबाई या उद्या ४ ऑगस्ट रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख.

 

इ. स. ४.८.१९१३ साली दीपपूजा अमावास्येच्या दिवशी समईच्या असंख्य अशा वातींच्या प्रकाशात ‘श्रीमती मनोरमा दाते’ म्हणजेच पूर्वाश्रमीच्या माई दाते यांचा जन्म झाला. आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगाला निर्भीडपणे सामोरे जाऊन आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी कसे वेचावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे टिळक पुतळा ‘शिशु विहारच्या’ संचालिका श्रीमती मनोरमाबाई दाते. (सर्वांच्या लाडक्या आत्याबाई). त्यांचे वडील कै. रामचंद्र परांजपे न्यायाधीश होते. वडिलांच्या पश्‍चात त्यांच्या विवाहाचे कर्तव्य त्यांचे काका डॉ. परांजपे यांनी पुढाकार घेऊन पूर्णत्वास नेले. मनोरमाबाईंचा (आत्याबाईचा) विवाह जबलपुरातील प्रसिद्ध दाते कुटुंबातील वसंतराव दाते यांच्याशी संपन्न झाला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले वसंतराव हे अतिशय कर्तृत्ववान, सुखरूप होते. वसंतराव व आत्याबाई म्हणजे जणू लक्ष्मी-नारायणाचा जोडाच. परंतु त्यांचे हे वैवाहिक जीवनाचे सौख्य अवघ्या पाच वर्षांतच संपुष्टात आले. परासिया येथे खाणीच्या कामावर असताना कॉलराच्या साथीत वसंतरावांचे निधन झाले व माईंच्या एकाकी जीवनाच्या प्रवासाचा आरंभ झाला. माईंचे माहेर पुढारलेले असल्यामुळे त्यांची पुनर्विवाहास मान्यता होती. परंतु माईंनी त्यास ठामपणे नकार दिला व आपले उर्वरित आयुष्य समाजास अर्पण करण्याचा निर्णय घेतला.

 

इ. स. १९४८ मध्ये बी. ए. पदवी प्राप्त करून त्यांनी ‘कै. ताराबाई मोडक’ (दादर) येथे बाल अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले. आपल्या शिक्षणाच्या बळावर तसेच घरच्यांची साथ घेऊन त्यांनी आपल्या वडिलांच्या घरीच बालक मंदिर सुरू केले. सुरुवातीला केवळ दहा मुलांची पटसंख्या घेऊन स्थापन झालेल्या या बालकमंदिरास आत्याबाईंनी स्वत:च्या हिमतीच्या व प्रयत्नांच्या बळावर नावलौकिक मिळवून दिला. शिक्षणाची आत्यंतिक ओढ असणार्‍या माईंनी इ. स. १९५४ साली बी. एड. ची पदवी प्राप्त केली. आपल्या अथक परिश्रमांनी तसेच अनेक मान्यवरांच्या मदतीने आपल्या बालक मंदिराचा विकास करून त्यांनी इ. स. १९६९ मध्ये प्राथमिक शाळेची स्थापना केली. टिळक पुतळा येथील शाळेबरोबरच त्यांनी देवी अहल्या मंदिर धंतोली येथे देखील एका शाखेची स्थापना केली. सद्य:स्थितीत या शाळेचा संपूर्ण कारभार राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या बघतात. इ. स. १९८५ साली माईंच्या भावानी आपल्या हक्काची सर्व जागा शाळेसाठी दान केली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्या जागी बांधण्यात आलेल्या इमारतीस ‘कै. माधव रामचंद्र स्मृती’ असे नाव देण्यात आले. इमारतीच्या परिसरात बांधण्यात आलेल्या सभागृहास श्रीमती मनोरमा दाते सभागृह असे नाव देण्यात आले व या सभागृहाचे उद्घाटन सुमतीबाई सुकळीकर यांच्या हस्ते झाले. शाळेच्या परिसरात ‘श्री. अण्णाजी मेंडजोगे’ यांच्या शिक्षक सहकारी बँकेची शाखा देखील आहे. शाळेचे भूमिपूजन ‘कै. श्रीकांतजी जिचकार’ यांच्या हस्ते झाले होते.

 

‘कर्मण्येेवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या गीतेतील श्‍लोकास प्रमाण मानून माईंनी आयुष्यभर समाजकार्य केले ते देखील कधीही कोणाकडून कोणत्याही कौतुकाची, प्रशंसेची, सन्मानाची अपेक्षा न करता आपल्या आयुष्यात काही नाती ही आपल्या जन्मानेच प्राप्त होतात, तर काही नाती आपण स्वत: निर्माण करतो जी जन्माने प्राप्त झालेल्या नात्यांपेक्षाही श्रेष्ठ ठरतात. आपल्या समाजकार्याने माईंनी असे अनेक भावनिक नाते मिळवले व त्यांजे जतन केले. आज आयुष्याच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केलेल्या माई तशाच हसतमुख व प्रेमळ आहेत. आजही त्या उत्तम विणकाम करून त्यांना भेटायला आलेल्या मंडळींना स्वत: विणकाम केलेले बटवे तसेच इतर विणकाम केलेले साहित्य प्रेमाची भेट म्हणून देतात.

 

अशा आमच्या आत्याबाईंना कोटी कोटी प्रणाम!

 

१९७६ साली त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला. दुसरा पुरस्कार मॅग्नम फाऊंडेशन गौरव पुरस्कार

 

इ. स. २००४ साली सावित्रीबाई फुले,

 

लेखिका संमेलन राजहंस संमेलन प्रकाशन (पुणे)

 

डॉ. पुंडलिक गेडाम स्वातंत्र्य सैनिक सन्मानपत्र

 

अशा आमच्या माननीय आत्याबाईंना शिक्षक, शिक्षकेतर आणि बाल शिक्षण प्रसारक मंडळातर्फे त्यांच्या शतकोत्तरीनिमित्त शतश: प्रणाम

 

अल्का जोशी, नागपूर