जहाल नक्षलवादी चकमकीत ठार
| तारीख: 8/3/2012 7:22:28 PM |
वृत्तसंस्था
रायपूर, ३ ऑगस्ट
सीमा सुरक्षा दल आणि छत्तीसगढ पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई करून एका जहाल नक्षलवाद्याला ठार केले तसेच माओवाद्यांची एक छावणीच उद्ध्वस्त करून टाकली. ही चकमक कांकेर जिल्ह्यातील जंगल भागात शुक्रवारी सकाळी घडली. एदनर येथील दाट जंगलात नक्षलवादी लपून बसले असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार ३ ऑगस्टला सकाळी सीमा सुरक्षा दल आणि छत्तीसगढ पोलिसांनी जोरदार शोध मोहीम राबविली.
अचानक सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू झाली. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. अखेर या चकमकीत एक जहाल माओवादी ठार झाल्याची माहिती कांकेरचे पोलिस अधीक्षक राहुल भगत यांनी दिली. मात्र, अन्य नक्षलवादी दाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले, असे ते म्हणाले. सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.