विजेंदरचे स्वप्न भंगले
| तारीख: 8/7/2012 2:52:15 AM |
उपान्त्यपूर्व फेरीत पराभूत
वृत्तसंस्था
लंडन, ६ ऑगस्ट
बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरचे यावेळी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले असून, उपान्त्यपूर्व फेरीच्या आज झालेल्या सामन्यात पराभूत झाल्यामुळे यावेळी विजेंदर पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने भारतीयांच्या पदरी निराशा पडली आहे.
यावेळी सुवर्णपदक जिंकूनच परत येणार या निर्धाराने लंडनमध्ये दाखल झालेल्या विजेंदरवर तमाम भारतीयांच्या नजरा खिळल्या होत्या. ७५ किलो वजन गटात आज रात्री उशिरा उजबेकिस्तानच्या अब्बोस अटोव्हसोबत झालेल्या लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात विजेंदरला अपयश आले. पहिल्या फेरीत त्याने अटोव्हला थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फेरीत दोघांनाही ३-३ असे समान गुण मिळाले. मात्र, त्यानंतरच्या दोन्ही फेर्यांमध्ये अटोव्हने विजेंदरला कोणतीही संधी दिली नाही आणि दुसरी व तिसरी फेरी ७-५, ७-५ अशा गुणांनी जिंकली आणि सरतेशेवटी लढत १७-१३ अशा फरकाने जिंकत थाटात उपान्त्य फेरीत प्रवेश केला.