तरुण भारत... एक मागोवा
आजच्या दै. ‘तरुण भारता’ची परंपरा, मधला 18 वर्षांचा खंडित काळ वगळता, 83 वर्षे जुनी आहे. लो. टिळकांनंतर म. गांधी यांचे युग सुरू होताच टिळकपक्षीय प्रतिसहकार पक्ष व म. गांधींच्या अनुयायांचा स्वराज्य पक्ष या कॉंग्रेसअंतर्गत दोन पक्षांच्या नीति-धोरणातील परस्परविरोधामुळे प्रतिसहकार पक्षाचा पुरस्कार करणार्या ‘महाराष्ट्र’ या पत्राकडून स्वराज्य पक्षीयांची कुचंबणा होऊ लागली, तेव्हा स्वराज पक्षाचे नरकेसरी बॅ. अभ्यंकर, श्री दादासाहेब उधोजी आणि डॉ. ना. भा. खरे यांनी पुढाकार घेऊन 20 जानेवारी 1926 रोजी डॉ. खरे यांच्या संपादकत्वाखाली ‘तरुण भारत’नावाचे साप्ताहिक राष्ट्रीय सभा आणि स्वराज्य पक्ष यांच्या ध्येयधोरणाच्या प्रचारासाठी सुरू केले. 1930 च्या असहकार आंदोलनात सरकारची वक्रदृष्टी आणि कर्त्या मंडळींचा कारावास यामुळे ते बंद पडले.
पुढे बॅ. अभ्यंकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायी मंडळींनी, अभ्यंकरांच्या 9 व्या स्मृतिदिनी 2.1.1944 रोजी ‘तरुण भारत’ साप्ताहिकाचे पुनरुज्जीवन केले. ‘महाराष्ट्र’ पत्राच्या संपादक मंडळातील ज्येष्ठ पत्रकार श्री. ग. त्र्यं. उपाख्य भाऊसाहेब माडखोलकर यांची या पुनरुज्जीवित ‘तरुण भारत’च्या संपादकपदी नेमणूक करण्यात आली.
तरुण भारत ‘दैनिक’ झाल्यावर ज्येष्ठ साहित्यिक ख्यातनाम विचारवंत पत्रपंडित गजानन त्र्यंबक उपाख्य भाऊसाहेब माडखोलकर या दैनिकाचे संस्थापक संपादक झाले. भाऊसाहेबांच्या काळात ‘तरुण भारत’ने नवनवीन उपक्रम राबवून मराठी वृत्तपत्रसृष्टीत ‘तरुण भारत’ ला सन्मानाचे स्थान मिळवून दिले. मध्य भारतातील एक महत्त्वाचे दैनिक म्हणून ‘तरुण भारत’चे नाव घेतले जाऊ लागले. पण गांधी-हत्येनंतर संकटांची मोठी मालिका तरुण भारतवर येऊन कोसळली. स्वत: भाऊसाहेबांना आपल्या पत्नी व मुलांसह राजे प्रतापिंसहराव भोसले यांच्या राजवाडयात आणि नंतर नागपूरबाहेरच्या चिचभवनला आश्रय घ्यावा लागला. त्या वातावरणाचा क्षोभ एवढा होता की, दैनिक तरुण भारत छापण्याचे जे मशीन होते, ती यंत्रसामग्री देखील संतप्त जमावाने त्या वेळच्या शुक्रवार तलावात फेकून दिली होती. या प्रसंगानंतरही भाऊसाहेब खचले नाहीत आणि अवघ्या 14 दिवसांनी पुन्हा ‘तरुण भारत’ प्रकाशित करण्याचा विक्रम या दैनिकाच्या मागे उभ्या असलेल्या मंडळीनी प्रस्थापित केला. तो संपूर्ण कालखंड संघबंदीचा होता. पुढ़े रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक झालेले श्री बाळासाहेब देवरस ‘तरुण भारत’ ची धावपळ बघत होते. त्यांनी मदतीचा हात पुढे केला आणि ‘तरुण भारत’चे प्रकाशन पूर्ववत सुरू झाले. नवीन संचालक मंडळ स्थापन झाले आणि श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेकडे या प्रकाशनाची जबाबदारी सोपविण्यात आली. या संचालक मंडळात रा. स्व. संघाच्या तत्त्वज्ञानावर आणि हिंदुत्वावर निष्ठा असणारे अनेकजण होते. त्यामुळे भाऊसाहेबांना असे वाटले की, या मंडळींकरवी आपल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर बंधनं येऊ शकतात. संघाचे तत्त्वज्ञान आपल्याला मांडावे लागेल. याच कारणामुळे त्यांनी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली होती. पण बाळासाहेब देवरस यांनी त्यांना ग्वाही दिली की, त्यांचे लेखनस्वातंत्र्य अबाधित राहील आणि तीच परंपरा आजही ‘तरुण भारत’ सांभाळत आहे.
श्री. भाऊसाहेब माडखोलकर हे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा विषय लावून धरणारे लिखाण करू लागल्यामुळे ‘तरुण भारता’चा चेहरा प्रथमपासूनच उद्दिष्टप्रधान ठरला. राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालानंतर जे बदल 1956 साली घडून आले, ते लक्षात घेऊन ‘तरुण भारता’ची एक आवृत्ती पुण्यातून प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा एक क्रांतिकारी निर्णय ठरला. ध्येय, उद्दिष्ट आणि विचार यांच्या प्रचारासाठी, प्रबोधनासाठी अशी अन्यत्र वेगळी आवृत्ती काढणारे ‘तरुण भारत’ हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे.
पुढे बाळासाहेब देवरस श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष झाले. भाऊसाहेबांच्या निवृत्तीनंतर ‘तरुण भारत’च्या संपादकपदाची जबाबदारी मा. गो. वैद्य यांनी सांभाळावी, असे सुचविण्यात आले. श्री. मा. गो. वैद्य यांनी स्पष्ट केले की, श्री. पां. चि. करकरे हे ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांनीच संपादक होणे उचित राहील. आणि त्याप्रमाणे करकरे हे संपादक झाले व मा. गो. वैद्य कार्यकारी संपादक म्हणून काम बघू लागले. करकरे यांच्या निवृत्तीनंतर मा. गो. वैद्य हे मुख्य संपादक व दि. भा. घुमरे हे कार्यकारी संपादक म्हणून काम करीत होते.
दैनिक ‘तरुण भारत’ हे असे वृत्तपत्र होते, ज्याने तांत्रिक बाबतीतही आपली आघाडी कायम ठेवली होती. सर्व जिल्हास्थानी अंक नेण्यासाठी टॅक्सी पद्धती सुरू करणारे ‘तरुण भारत’ हे पहिले दैनिक होते. प्रत्येक जिल्हास्थानी आपले कार्यालय असावे, असा निर्णय घेणारे वृत्तपत्रही ‘तरुण भारत’च होते. काळाची पावले ओळखून पावले उचलणार्या दैनिक तरुण भारतने आणि त्याचे प्रकाशन करणार्या श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेने छपाई तंत्रातील नवनवीन बदल जुन्या इष्ट परंपरांना धक्का न लावता अमलात आणले होते. तरुण भारत हे ब्लॉक डिपार्टमेंट असणारे त्या काळातील एकमेव दैनिक होते. शिवाय दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी तरुण भारतची स्वतंत्र कार्यालये स्थापन करण्यात आली होती. सरसंघचालकपदाची जबाबदारी आल्यानंतर श्री. बाळासाहेब देवरस यांनी श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्र. बा. उपाख्य बाबासाहेब टालाटुले यांच्यावर सोपविली. भैयासाहेब खांडवेकर, अनंतराव भिडे, भैयाजी दाणी या सर्वांनी ‘तरुण भारता’च्या अनेक जबाबदार्या अनेक वर्षे सांभाळल्या होत्या.
1975 साली आणिबाणी लागली, त्यावेळी संचालक मंडळ आणि संपादक विभागाने मिळून असा निर्णय घेतला, की काहीही होवो, ‘तरुण भारत’ बंद पडू द्यायचा नाही. त्यावेळी सर्वत्र ‘तरुण भारत’ विरोधी वातावरण निर्माण केले गेले होते. ठिकठिकाणी होणार्या फॅसिस्ट-विरोधी सभा, या ‘तरुण भारत’ बंद पडावा, यासाठीच घेतलेल्या सभा होत्या. याच काळात तरुण भारताचे अनेक दिग्गज स्थानबद्ध झाले होते. फक्त प्रबंध संचालक भैयासाहेब खांडवेकर आणि कार्यकारी संपादक मामासाहेब घुमरे हेच दोघेजण बाहेर राहिले होते. पण त्यांनी त्या झंझावातातही ‘तरुण भारत’चा दीप तेवत ठेवला.
‘तरुण भारत’ हे फक्त वृत्तपत्र नाही, तर आपली सामाजिक जबाबदारी ओळखून संकटसमयी देशाला मदतीचा हात देणारी एक संस्था आहे. देशावर संकट आले आणि ‘तरुण भारत’ने वाचकांना मदतीचे आवाहन केले, की भरपूर प्रमाणात निधी संकलित होत असतो. हा नेहमीचा अनुभव अगदी कोयना भूकंपापासून ते पुण्याच्या पानशेत संकटापर्यंत; किंवा लातूरचा भूकंप असो की मोवाडचे जलथैमान असो; आंध्रातील वादळ असो, की तामिळनाडूतील त्सुनामी असो, मोगा हत्याकांड असो, की कारगिलवरील पाकचे आक्रमण असो, प्रत्येक वेळी ‘तरुण भारत’ने मदतीचे आवाहन केले आणि वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
आणिबाणीनंतरच्या काळात या क्षेत्रातली स्पर्धा वाढली. व्यवस्थापनाची नवनवीन तंत्रे आली. वृत्तपत्राची संस्था म्हणजे एक परिवार आहे, या संकल्पनेला नाकारणारी धोरणे वृत्तपत्राच्या क्षेत्रात सर्वत्र राबविली जाऊ लागली. त्यावेळी आपल्या कोणत्याही कर्मचार्याला काढणार नाही, ही भूमिका घेऊन ‘तरुण भारत’ने आपली वाटचाल सुरूच ठेवली. प्रबंध संचालकांच्या गौरवशाली परंपरेत भैयासाहेब खांडवेकर यांच्यानंतर अनंतराव भिडे, मा. गो. वैद्य, गोपाळराव आठवले, डॉ. रा. ह. तुपकरी, प्रभाकरराव मुंडले, राम हरकरे, अनिल दांडेकर यांचा समावेश होता. सध्या ही जबाबदारी श्री. अनिल पत्की सांभाळीत आहेत; तर अध्यक्षपदाची जबाबदारी प्र. बा. टालाटुले यांच्या नंतर मा. गो. वैद्य, प्रभाकरराव मुंडले, प्राचार्य विनायकराव फाटक, उदयभास्कर नायर, अरुण लखानी आणि डॉ. विलास डांगरे यांनी सांभाळली आहे. डॉ. डांगरे हे नरकेसरी प्रकाशन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सर्वश्री मा. गो. वैद्य, लक्ष्मणराव जोशी, अनिल दांडेकर यांनी प्रबंध संपादकपदाची सूत्रे देखील सांभाळली होती. सध्या श्री. धनंजय बापट हे तरुण भारतचे प्रबंध संपादक आहेत.
‘तरुण भारत’च्या मुख्य संपादकपदाची जबाबदारी सांभाळण्याचा गौरव ज्यांना प्राप्त झाला आहे, त्या नक्षत्रमालेत सर्वश्री ग. त्र्यं. माडखोलकर, पां. चिं. करकरे, मा. गो. वैद्य, दि. भा. घुमरे, ल. त्र्यं. जोशी, वामनराव तेलंग, सुधीर पाठक, महेश म्हात्रे यांचा समावेश होता. सध्या सुधीर पाठक हे मुख्य संपादक आहेत. गांधीहत्येनंतर महालातील गाडीखान्यातील तरुण भारत 28 फार्म लॅण्ड रामदासपेठला आला. आता ‘तरुण भारत’ एमआयडीसीतील नवीन वास्तूत लौकरच स्थलांतरित होत आहे. श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे रजिस्टर्ड कार्यालय नागपूरच्या गोकुळपेठ भागात स्थलांतरित होणार आहे. त्या ठिकाणी सॅटेलाइट माध्यमातून अद्ययावत संपर्क यंत्रणाही प्रस्थापित करण्यात आली आहे.
‘तरुण भारत’च्या 4 पुरवण्या दर आठवड्याला निघतात. ‘मध्यमा’ युवकांसाठी आहे, तर ‘स्पंदन’ बालकांसाठी आहे. ‘आकांक्षा’ महिला वर्गासाठी आहे, तर ‘आसमंत’ ही गंभीर प्रवृत्तीची वैचारिक व साहित्यिक पुरवणी आहे. दरवर्षी निघणारा दिवाळी अंक हे ‘तरुण भारत’चे वैशिष्ट्य आहे. यापूर्वी ‘तरुण भारत’ वासंतिक अंकही काढीत असे. राष्ट्र आराधना, अटलबिहारी वाजपेयी गौरवांक यांनी तरुण भारतचा लौकिक वाढविला आहे. तरुण भारत ही आज विदर्भाची सांस्कृतिक गरज झालेली आहे.