भारत मोजणार अब्जावधी डॉलर्स

    16-Jan-2019
Total Views |
भारत अमेरिकेबरोबर असलेले व्यापारी संबंध बळकट करण्यावर भर देत आहे. दरवर्षी भारत अमेरिकेकडून पाच अब्ज डॉलर्सचे तेल, गॅस विकत घेण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच १८ अब्ज डॉलर्सची संरक्षण सामग्रीही विकत घेणार आहे. अमेरिकेतील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अमेरिकेकडून भारतात होणाऱ्या निर्यातीत ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, असे अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी अमेरिकेतील उद्योजकांसमोर बोलताना सांगितले. मागच्या दोन वर्षात भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारामध्ये ११९ अब्ज डॉलर्सवरुन १४० अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.

 
हर्षवर्धन श्रृंगला यांच्या सम्मानार्थ भारत-अमेरिका व्यावसायिक परिषदेने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आधीपेक्षा आता भारत मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडून खरेदी करत आहे, असे त्यांनी सांगितले. तेल आणि गॅस क्षेत्राचा विचार केल्यास भारत अमेरिकेकडून दरवर्षी पाच अब्ज डॉलर्सची खरेदी करण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतीय हवाई कंपन्यांनी ३०० विमानांसाठी ४० अब्ज डॉलर्सची ऑर्डर दिल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेत असलेले २ लाख २७ हजार विद्यार्थी अमेरिकेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये ६.५ अब्ज डॉलर्सचा हातभार लावत आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये व्यापारी तूट कमी करण्याविषयी चर्चा झाली होती.