भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा यशस्वी; वन-डे मालिकेतही ऐतिहासिक विजय

    18-Jan-2019
Total Views |
यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी व केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने  ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला. याचसोबत भारताने 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे, कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही बाजी मारत ऑस्ट्रेलियालाचा धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियातला भारताचा हा पहिलाच एकदिवसीय मालिका विजय ठरला आहे, त्यामुळे भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.
 
धोनी (87) आणि केदार जाधव (61) यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसन, सिडल आणि स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. सामन्यात 6 बळी घेणाऱ्या युझवेंद्र चहलला सामनावीर तर महेंद्रसिंह धोनीला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
 
याआधी  फिरकीपटू युझवेंद्र चहलने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने सामन्यात धडाकेबाज सुरुवात केली. ऑस्ट्रेलियालाला 230 धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आले. युझवेंद्र चहलने सामन्यात ६ बळी घेत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला.

भुवनेश्वर कुमारने दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. यानंतर शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा यांनी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव सावरला. मात्र शॉन मार्श माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. मधल्या फळीत पिटर हँडस्काँबने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत अर्धशतक झळकावले. मात्र, तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज फारसा तग धरु शकले नाहीत. भारताकडून चहलने सर्वाधिक 6 तर, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2-2 बळी घेतले.