युजवेंद्र चहलने मोडला 27 वर्षांपूर्वीचा विक्रम

    18-Jan-2019
Total Views |
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यात खेळण्याची संधी न मिळावलेल्या युजवेंद्र चहलने तिसर्‍या सामन्यात त्याची कसर भरुन काढली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना माघारी पाठवताना मेलबर्नच्या मैदानावर विक्रमांची रांग लावली. चहलने 10 षटकांत 42 धावा देत 6 विकेट घेतल्या आणि मेलबर्नवर भारतीय गोलंदाजाने नोंदवलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याशिवाय त्याने अजित आगरकरच्या (6/42) विक्रमाचीही बरोबरी केली. पण, त्याने प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावावर असलेला 27 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.

 
तीसर्‍या वन डे सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आल्यानंतर चहलने एकाच षटकात उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श या दोघांना माघारी पाठवले. त्यानंतर त्याने पीटर हँड्सकोम्ब, मार्कस स्टोइनिस, झाय रिचर्डसन आणि ॲडम झम्पा यांना बाद केले. या कामगिरीसह त्याने आगरकच्या विक्रमाची बरोबरी केली. आगरकरने 2004 मध्ये मेलबर्नवर 42 धावांत 6 फलंदाज बाद केले होते, तर चहलने 2019 मध्ये 42 धावांत 6 विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका वन डेत सहा विकेट घेणारा चहल हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. मुरली कार्तिकने 2007 मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 बाद 27 अशी कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलियात सहा विकेट घेणारा चहल हा पहिलाच भारतीय फिरकीपटू ठरला आहे. रिचर्डसनची विकेट घेत त्याने रवी शास्त्रींच्या विक्रमाची बरोबरी केली. 1991 मध्ये शास्त्रींनी पाच विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे सामन्यात पाच विकेट घेणारे ते पहिले भारतीय फिरकीपटू होते. त्यानंतर हा पराक्रम चहलने केला. मात्र, 27 वर्षांनंतर शास्त्रींचा हा विक्रम चहलने मोडला आहे.