‘पॉन्झी’ योजनेचे गौड बंगाल

    18-Feb-2019
Total Views |
सध्या पश्चिम बंगालमधील सीबीआय विरुद्ध मुख्यमंत्री वाद हा सर्व स्तरावर चर्चेचा विषय झालेला आहे. आपल्या राज्याच्या सर्वोच्च पोलिस अधिकार्‍याची सीबीआयने साधी चौकशी देखील करू नये, यासाठी खुद्द मुख्यमंत्री धरण्यावर बसण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. माध्यमांनी या सर्व विषयाला राजकीय रंग दिल्यामुळे हे प्रकरण मुळात काय आहे, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. या सर्व प्रकरणाच्या मुळात पश्चिम बंगालमधील १४७ चीट फंड कंपन्यांनी सर्व सामान्य जनतेची जवळपास अडीच लाख कोटी रुपयांची गडप केलेली रक्कम कारणीभूत आहे, याचा सर्वाना विसर पडलेला दिसतो. हे सर्व लोक २०१० पासून कोलकाता उच्च न्यायालयात आपल्या पैशांसाठी भांडत आहेत. अशा योजनांचा उल्लेख जगभरात ‘पॉन्झी’ योजना असा केला जातो.
 
‘पॉन्झी‘ या नावाचा उगम मोठा मजेशीर आहे. हे नाव ‘चार्ल्स पॉन्झी’ नावाच्या इटालियन ठकसेनाच्या नावावर पडले आहे. १९१९ साली या नटवरलालने उत्तर अमेरिकेत आर्थिक जगतात मोठा धुमाकूळ घातला होता. विदेशी पोस्टाच्या कुपनवर ४५ दिवसांत पन्नास टक्के तर नव्वद दिवसात शंभर टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून त्याने कोट्यावधी डॉलर गोळा केले.
 
खरे तर तो नवीन ग्राहकांकडून जमा झालेल्या रकमेतून जुन्या गुंतवणूकदारांना व्याज देत असे. त्याने आपल्या कंपनीचे नाव देखील Securities Exchange Company असे मोठे भारदस्त ठेवले होते, त्यामुळे त्याच्याकडे डॉलरचा ओघ सुरूच होता. त्याच्या विरुद्ध वर्तमानपत्रात बातम्या देणार्‍याच्या विरोधात तो लगेच मानहानीचा खटला दाखल करीत असे. या काळात सुद्धा त्याच्याकडे रोज सरासरी २५ लाख डॉलरची गुंतवणूक लोक करीत होते. त्याच्या विरुद्ध खटला चालव सरकारला फार कठीण गेले इतके की खालच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत इतकी त्याची सर्व क्षेत्रात पोहोच होती. परंतु, काही लोकांनी तक्रार केल्यावर ‘बोस्टन पोस्टल’ अधिकार्‍यांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली व हा फुगा १२ ऑगस्ट १९२० मध्ये फुटला व जवळपास दोन कोटी डॉलरचा (आजच्या भावात जवळपास १४२ कोटी रुपये) चुना लाऊन ही योजना बंद पडली. तेव्हापासून अशा अवास्तव व्याजाचे आश्वासन देणार्‍या योजनांना ‘पॉन्झी योजना’ हे नाव रूढ झाले. १८ जानेवारी १९४९ ला ‘पॉन्झी’ मेला. परंतु आपले नाव अमर करून गेला.

 
 
या पॉन्झी योजना कशा असतात ते पाहू या.सर्वप्रथम हे लोक कमी जोखमीत मोठ्या व्याजाचे आश्वासन देतात. आर्थिक क्षेत्रात काहीही चढ-उतार होवोत आम्ही तुम्हाला व्याज देऊच असे गुंतवणूकदाराला ठासून सांगितले जाते. हे आपल्या कंपन्यांचेे एक जाळे तयार करतात, ज्या कुठल्याही सरकारी नियामक यंत्रणेकडे नोंदणीकृत नसतात. आलेला पैसा कसा गुंतवतात, याबद्दल ते कमालीची गुप्तता बाळगतात. प्रसिद्ध कलाकार, समाजातील प्रतिष्ठीत लोक यांचा जाहिराती साठी वापर करतात. सरकारी यंत्रणा, वर्तमानपत्रे ,राजकारणी इत्यादी लोकांशी यांचा इतका घनिष्ट अर्थपूर्ण संबंध असतो की कुणी तक्रार करण्याचे साहस केले तरी त्याची दखल घेतल्या जात नाही. किंबहुनात तक्रारदारच अडचणीत येतो. सध्या ज्या सारदा घोटाळ्याची चर्चा सुरू आहे, त्यात सतरा लाख लोकांचे चार हजार कोटी रुपये अडकलेले आहेत तर दुसर्‍या रोज व्ह्याली घोटाळ्यात किती रुपये अडकले आहेत, याबद्दल अजून आकडेवारी गोळा करणे सुरू आहे. परंतु या घोटाळ्यात कमीतकमी पंधरा हजार ते चाळीस हजार कोटी रुपये अडकले असावेत असा जाणकारांचा अंदाज आहे. चार्ल्स पॉन्झीचा पुनर्जन्मावर विश्वास नसला तरी त्याने भारतात पुन्हा जन्म घेतला असावा, असे वाटते.
 
-सुधाकर अत्रे