जुनागढबद्दल बरेच काही...

    19-Feb-2019
Total Views |
गुजरात मधील सौराष्ट्र प्रांतातील जुनागढ गावाला खूप मोठा इतिहास आहे. या प्रांतावर अनेक राज्यकर्त्यांनी राज्य केले. त्यापैकी बाबी सुलतानांच्या अधिपत्याखाली या गावाला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली. या प्रांतावर बाबी सुलतानांचे आधिपत्य सुमारे २०० वर्षांपर्यंत राहिले. त्याच काळामध्ये येथे बनविला गेलेला महाबत मकबरा हा तत्कालीन भव्य वास्तूंपैकी एक होता. बाबी सुलतानांनी जुनागढवर आधिपत्य स्थापन केल्यानंतर जुनागढच्या किल्ल्‌यांतून सर्व राज्यकारभार चालविण्यास सुरुवात केली. उपरकोट नामक हा किल्ला बाबी सल्तनतीची राजधानी बनला. हा किल्ला वास्तविक चंद्रगुप्त मौर्याने तिसर्‍या आणि चौथ्या शतका दरम्यानच्या काळामध्ये बांधला होता. या किल्ल्‌याने सुमारे सोळा युद्धे पाहिली.
 
अठराव्या शतकामधे जुनागढ निरनिराळ्या साम्राज्यांच्या अधिपत्याखाली होते. १७४८ साली अफगाणिस्तान मधून येऊन जुनागढ येथे स्थायिक झालेल्या मोहम्मद शेर खान बाबी याने गुजरात सुभ्यातून जुनागढ स्वतंत्र असल्याची घोषणा करीत बाबी सल्तनतीची स्थापना केली. तेव्हापासून ते भारत स्वतंत्र होईपर्यंत, म्हणजेच १९४७ सालापर्यंत जुनागढ बाबी सल्तनतीच्या अधीन राहिले.
 
स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी जुनागढचे तत्कालीन नवाब तिसरे महाबत खान यांनी नव्याने प्रस्थापित झालेल्या पाकिस्तान देशामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. जुनागढ आणि पाकिस्तान एकमेकांना समुद्राने जोडले गेले असल्याने पाकिस्तानमध्ये विलीन होणे योग्य असल्याचे नवाबांचे मत होते. पण भारताने या गोष्टीला नकार दिल्यानंतर व त्यावर खूप चर्चा, बोलणी झाल्यानंतर अखेरीस जुनागढ भारतामध्येच राहू देण्याच्या निर्णयावर एकमत झाले.

 
 
बाबी राजवटीमध्ये उभारल्या गेलेल्या अनेक वास्तू जुनागढमध्ये आजही पहावयास मिळतात. यामध्ये जुनागढचे सहावे नवाब दुसरे महाबत खान यांच्या मकबर्‍याचाही समावेश आहे. १८५१ सालापासून १८८२ सालापर्यंत दुसरे महाबत खान जुनागढचे नवाब होते. यांचे समाधीस्थळ असलेला महाबत मकबरा इंडो-इस्लामिक आणि युरोपियन वास्तूशैलीच्या मिश्रणाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. या मकबर्‍याच्या निर्माणाला दहा वर्षांचा कालावधी लागला. मकबर्‍याच्या बाहेरील आणि आतील भिंतींवर केलेले अतिशय देखणे कोरीवकाम या वास्तूची खासियत आहे. भव्य कमानी, फ्रेंच स्टाईल खिडक्या, गोथिक पद्धतीचे स्तंभ, आणि चकाकणारे चंदेरी दरवाजे या मकबर्‍याची शोभा वाढवितात.
 
या मकबर्‍याच्या जवळच जुनागढचे वजीर बहार-उद-दिन-भार यांचे ही समाधीस्थळ आहे. विशाल गोल घुमट, चारी बाजूंना असलेले मिनार, आणि या मिनारांना विळखे घालणारे गोल जिने या समाधीस्थळाची खासियत आहेत. जुनागढ मधील या ऐतिहासिक वास्तू इतर राज्यातील लोकांच्या फारशा परिचयाच्या नाहीत. यांचा आजच्या काळात कुठे विशेष उल्लेखही सापडत नाही. त्यामुळेच कदाचित या वास्तू काहीशा दुर्लक्षितच राहिल्या आहेत. येथे पर्यटकांची गर्दीही पहावयास मिळत नाही. या वास्तू भारतीय पुरातात्खात्याच्या ताब्यात असल्या, तरी आता अनेक ठिकाणी पडझड झालेल्या या वास्तू सध्या दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत.