स्त्रीचे अर्थार्जन : कालचे व आजचे...

    08-Feb-2019
Total Views |
‘स्त्री पर्व’ या पुस्तकातून काही माहिती अशी विशद करण्यात आली आहे की, जेव्हा आदिमानवाला शिकारीसाठी फिरावे लागायचे, तेव्हा तो त्याच्या स्त्रीला तिच्या उत्पादनाशी संबधित कच्चा माल पुरवीत असायचा.
जसे मातीची भांडे बनविणार्‍या स्त्रियांना विशिष्ट माती पुरविणारा पुरुष असे, तर वस्त्रे विणणार्‍या स्त्रियांना कपाशीची माहिती असणारा पुरुष कच्चा माल पुरवीत असे. अलंकार बनविणार्‍या स्त्रियांना अरण्यातून लाख, रंगीत दगड, मणी, िंशपले पुरुष आणून देत असे.
 
प्रस्तुत संदर्भातून असे दिसते की, आदिमानवाच्या टोळ-टोळ्यांनी राहणारा हा काळ स्त्रियांना त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रात प्रतिष्ठा देणारा होता. िंकबहुना स्त्रीशिवाय पुरुष अपुरा आहे व तिच्याशिवाय त्याचा उदरनिर्वाह व इतर गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत, याची जाण त्याला होती. त्यामुळेच स्त्रीप्रधान संस्कृतीचा तो काळ होता. या काळानंतर येणारा काळ म्हणजे वैदिक काळ.
 
वैदिक काळ :
स्त्रियांना समाजामध्ये पंडिता वा ब्रह्मवादिनी म्हणून प्रतिष्ठा दिली जात होती. याशिवाय वेदातील काही सूक्ते स्त्रियांनी केली असल्याची नोंदही इतिहासात असून इंद्राणी, गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा अशी त्यांची नावे आहेत. ज्या अर्थी शिक्षणात त्यांची मोहर उमटली म्हणजेच आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम असणंसुद्धा गरजेचं आहे.
अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा ही त्यांना वैदिक कामात मदत करीत असून, अगस्त्यांनी जी डोंगर फोडून वाट काढली, त्या कामातही तिचा िंसहाचा वाटा होता. तिने स्वतः शारीरिक कष्ट करण्यार्‍यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला.
प्राचीन काळच्या शेतीप्रधान वसाहती स्त्रियांच्या आज्ञेनुसार नद्यांच्या सुपीक खोर्‍यात वसलेल्या होत्या. उदा. इजिप्तमध्ये नाईल नदी, तर भारतात िंसधू नदीचा काठ अशा जागी ही वस्ती होती.

 
 
गाळाची जमीन ही सुपीक असते आणि पिकांच्या वाढीसाठी ही उपयुक्त असते. तसेच नदीच्या काठी पिकांना पाणी देता येते. या सर्व गोष्टी फार पूर्वीच्या काळी स्त्रीने शोधल्या होत्या. तद्वतच त्या वसाहती भरभराटीसदेखील आल्या होत्या.
स्त्रीने याच वेळी विस्तव जपून ठेवण्याची कला हस्तगत केली. पिकांना पाणी देण्यासाठी मातीची भांडी बनविली आणि मातीची भांडी भाजून त्यांच्यात पुरुषाने आणलेली कंदमुळे, मांस शिजवून अन्नाची चव वाढविली. म्हणजेच मानवाला पहिले पक्वान्न तिने खायला दिले. हा तिचा अन्नपूर्णा असलेला वारसा इसवीसनापूर्वीचा आहे, यात संदेह नाही.
ग्रामीण भागातील अल्पभूधारकांच्या कुटुंबातील स्त्रिया संसाराचा गाडा रेटण्यासाठी शेळ्या पाळणे, कोंबड्या पाळणे, भाजीपाला विकणे, असे काही व्यवसाय करतात. त्या व्यवसायातून त्यांना मिळणारे उत्पन्न हे मजुरीइतकेच मिळते. वास्तविक पाहता, स्त्रियांना जास्त मजुरी द्यायला हवी. कारण, त्यांना घरचे सर्व व्यवहार बघावे लागतात. जास्त मजुरी द्यायचे तर लांबच राहिले, पण पुरुषाइतकीदेखील मजुरी दिली जात नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे.
काही स्त्रिया किराणा दुकान चालविणे, कटलरी दुकान चालविणे, पिठाची गिरणी चालविणे, असे विविध प्रकारचे व्यवसाय करण्याची क्षमता बाळगतात. परंतु, त्यातील त्यांचे अर्थार्जनही जेमतेम असते. स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात यावी तेव्हाच ती स्वयंपूर्ण, स्वावलंबी बनेल, म्हणजेच खर्‍या अर्थाने स्त्री सबलीकरण होईल.
 
आजच्या आधुनिक काळात स्त्रियांनी व्यापार, हॉटेल, दळणवळण अशा सर्व क्षेत्रात कामगिरी बजावली आहे. ब्युटीपार्लर चालविणे, स्त्री प्रसाधन साधनांची विक्री करणे, अशा व्यावसायिक क्षेत्रातही तिने आपली ओळख निर्माण केली आहे.
ग्रामीण भागातील स्त्रियांचे आधुनिकीकरणाच्या माध्यमातून सशक्तीकरण व्हायचे असेल, तर शिक्षणामुळेच अर्थार्जनाचे मार्ग खुले होतात, तद्वतच विविध प्रकारच्या नोकर्‍या व व्यवसाय करण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे, ही बाब रुजविणे महत्त्वाचे आहे.
वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, कलाविषयक शिक्षण... अशा विविध शिक्षणप्रकारामुळे स्त्री ही नोकरी व व्यवसाय करण्यास पात्र ठरते आणि मुख्य म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी ती सक्षम होऊन समाजाच्या प्रमुख प्रवाहात सहभागी होईल, यात मुळीच शंका राहणार नाही.
नाना विविध समस्या :
ज्यांचे पती बेरोजगार असतात अशा स्त्रियांवर घर सांभाळणे, नोकरीमुळे उत्पन्न होणारा ताण, त्यामुळे वैफल्याची भावना मनात घर करते. तरीसुद्धा विसकटलेली रांगोळी तिलाच पुन्हा नेटकेपणाने सजवावी लागते. कारण घर-अंगणाशी, अवघ्या मनोविश्वाशी नाते असते तिचे!
नोकरी, व्यवसाय यात गुरफटलेली स्त्री आपल्या घर-अंगणाशी बांधील असते. िंकबहुना आपल्या जबाबदार्‍या ती दहापटीने वाढवीत असते.
अर्थार्जन करणार्‍या सर्वच स्त्रिया स्वतंत्र असतात असे नाही, तर बहुतेक कुटुंबामधून पत्नीचा पगार हा पुरुषाच्या मिळकतीचाच एक भाग समजला जातो. महिन्याच्या महिन्याला पत्नीने आपला पगार नवर्‍याच्या हाती ठेवावा, असा दंडकही काही घरांत आढळतो.
 
काही ठिकाणी तिच्यावर आरोपही केला जातो की, अर्थार्जन करणारी स्त्री ही पुरुषी असते.
आधुनिक स्त्रीचा स्वतंत्रपणा, तिचा विकास, तिची प्रगतिपथावरील वाटचाल... यांसारखी अनेक वाक्ये कर्णमधुर जरी वाटली, तरी प्रत्यक्ष हे जीवन जगणारी स्त्री मात्र विलक्षण ताणतणावाखाली पिचते आहे. तरीसुद्धा स्वअस्तित्वाचा वेध घेत आजची स्त्री अंतरिक्षापर्यंत पोहोचली. एकही क्षेत्र तिने आपल्या परीसस्पर्शाने उणे ठेवले नाही. अर्थार्जनासारखा कार्यभार सांभाळीत असताना ती अहर्निश कुटुंबवत्सल राहिली...
- जयश्री हेमंत कविमंडन
...