नुकसान भरपाईसाठी 214.36 कोटीची मागणी

    21-Oct-2020
Total Views |

नुकसान_1  H x W
 
- अतिवृष्टी व पुरामुळे झाले नुकसान
 
तभा वृत्तसेवा
अमरावती,
 
जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपीक व फळपिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी 214 कोटी 36 लाख 92 हजार 250 रूपये अनुदान मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठविण्यात आला आहे. जून ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे फळपिकांसह विविध पिकांचे नुकसान झाले. याबाबत नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या शेती क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून नुकसानाबाबत अहवाल सादर करावे व शेतकरी बांधवांना भरपाई मिळवून द्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही याबाबत तालुकानिहाय आढावा घेतला. त्यानुसार या कालावधीतील नुकसानीचे महसूल, कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले.
 
त्यानुसार जिल्ह्यात या कालावधीतील अतिवृष्टी व पुरामुळे 2 लाख 91 हजार 584 हेक्टर 97 आर क्षेत्र बाधित झाले. त्यात जिरायत पिकाखालील क्षेत्र 2 लाख 77 हजार 170 हेक्टर, बागायतीखालील क्षेत्र 117.62 हेक्टर व फळपिकाखालील क्षेत्र 14 हजार 297 हेक्टर आहे. एकूण बाधित शेतकरी बांधवांची संख्या 3 लाख 22 हजार 596 आहे. भरपाईसाठी 214 कोटी 36 लाख रूपये निधीची मागणी प्रस्तावाद्वारे करण्यात आली आहे.
 
जिरायतीत सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान
 
जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्रात अमरावती तालुक्यात सोयाबीन 29 हजार 123 हेक्टर, उडीद 22 हेक्टर, मूग 11 हेक्टर असे एकूण 29 हजार 212 हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा अहवाल आहे. भातकुली तालुक्यात सोयाबीन 20 हजार 558 हे., तूर 20.66 हे., उडीद 584 हे., कपाशी 70.2 हे., मूग 400 हे., असे एकूण 21 हजार 633 हेक्टर, तिवसा तालुक्यात सोयाबीन 20 हजार 110 हे., उडीद 16 व मूग 11.80 हे. असे एकूण 20 हजार 137 हेक्टर, चांदूर रेल्वे तालुक्यात सोयाबीन 20 हजार 461 हे., उडीद 31.70 हे., मूग 186.40 असे एकूण 20 हजार 679 हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात सोयाबीन 25 हजार 825 हे., नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सोयाबीन 35 हजार 269 हे., कापूस 3 हजार 270 हे., उडीद 215 हे., मूग 288 हे., असे एकूण 39 हजार 492 हेक्टर, मोर्शीत सोयाबीन 17 हजार 862 हे., कापूस 12.99, मका 14.8, उडीद 52, मूग 23 असे एकूण 17 हजार 965 हेक्टर, वरूडमध्ये सोयाबीन 3 हजार 19 हे., कपाशी 5 हजार 152 हे., ज्वारी 1 हजार 753 हे., तूर 1 हजार 558 हेक्टर, मका 1 हजार 417 हे., उडीद 5.05 हे., मूग 1 हे., असे एकूण 12 हजार 907 हेक्टर, दर्यापूरमध्ये सोयाबीन 5 हजार 779, उडीद 2 हजार 231 हे., मूग 13 हजार 737, असे एकूण 21 हजार 747 हेक्टर., अंजनगाव सुर्जी तालुक्यात सोयाबीन 15 हजार 248 हे., कापूस 1 हजार 494 हे., उडीद 1 हजार 420 हे., मूग 1 हजार 42 हे., असे 19 हजार 206 हेक्टर, अचलपूर तालुक्यात सोयाबीन 10 हजार 949 हे., उडीद 92.88, मूग 17.97, असे एकूण 11 हजार 60 हेक्टर, चांदूर बाजारमध्ये सोयाबीन 16 हजार 101, उडीद 76, मूग 7, असे एकूण 16 हजार 184 हेक्टर, धारणीत सोयाबीन 6 हजार 611, कापूस 28.56, ज्वारी 873, मका 376, धान 3 हजार 818, उडीद 22.5 असे एकूण 11 हजार 729, चिखलदर्‍यात सोयाबीन 9 हजार 382, उडीद 3.57, मूग 2.72, असे एकूण 9 हजार 388 क्षेत्र बाधित आहे.
 
 
अंजनगावात केळीचे नुकसान
 
फळपीक सोडून 33 टक्क्यांहून अधिक हानी झालेल्या बागायती पिकाखालील क्षेत्रात अंजनगाव सुर्जी तालुक्यात 113 हेक्टर 62 हेक्टरवरील केळी, 1.45 हे.वरील भाजीपाला व 2.55 हे. वरील ऊसाचे असे एकूण 117. 62 हेक्टर क्षेत्र बाधित झाले.
 
 
संत्र्याचे नुकसान
 
बहुवार्षिक फळपिकांच्या बाधित क्षेत्रात वरूड तालुक्यात 14 हजार 62 हेक्टर संत्रा, मोर्शी तालुक्यात 199.50 हे. मोसंबी, नांदगाव खंडेश्वरमध्ये 35 हे. संत्रा क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.