राजकीय दबावापोटी दलित पीडितेवर अन्याय

    21-Oct-2020
Total Views |
राजकीय_1  H x W
 
 
 
- भाजपाची धारणी पोलिस ठाण्यावर धडक
- न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन
 
धारणी,
 
धारणी येथे एका दलित महिलेवर दोन नराधमांनी केलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी राजकीय दबावापोटी पोलिसांनी पीडितेवर अक्षम्य अन्याय केला असल्याने पीडिता या प्रकरणातील तक्रारकर्त्या महिलेची मुलगी बेपत्ता झाली आहे. त्यामुळे भाजपाच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात मंगळवारी धारणी पोलिस ठाण्यावर धडक देण्यात आली. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात महिला सुरक्षित नसल्याबद्दल भाजपाने राज्य सरकारचा निषेध केला आहे.
 
शुक्रवार, 16 ऑक्टोबर रोजी धारणीपासून जवळच असलेल्या टेंबली या गावी ही गंभीर घटना घडली. तासन्तास बस न मिळालेल्या महिलेला दोन युवकांनी थोड्याच अंतरावर बस उभी असल्याचे सांगून तिला मोटारसायकलवर बसवले. धारणीहून टेंबली जवळच्या एका शेताजवळ त्यांनी महिलेला मारहाण सुरू केली. दोघांनी धरून बळजबरी तिच्या तोंडात दारू ओतून नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दहा दिवसांपूर्वी या महिलेचा तरुण मुलगा वारला. त्या दुःखात असलेल्या या महिलेला नराधमांच्या अमानवी दुष्कृत्याला सामोरे जावे लागले.
 
भाजपाचा युवा कार्यकर्ता अनुज पांडे याच्या सतर्कतेमुळे त्या महिलेचे प्राण वाचले व आरोपी देखील पोलिसांच्या हाती लागले. मात्र, त्या घटनेपासून महिला व तिची सोळा वर्षांची मुलगी घरून बेपत्ता आहे. आपल्या सुनेसोबत असा काही प्रसंग घडला हे तिच्या कुटुंबियांना अजूनही माहीत नाही. शिवाय सताधार्‍यांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी देखील हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी निवेदिता चौधरी आणि शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात मेळघाटातील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी धारणी पोलिस ठाण्यावर धडकले.
 
सामूहिक बलात्कार असताना 376 - 2 ऐवजी केवळ 376 कलम लावण्यात आले होते. पोलिस कोठडीतील आरोपींना कुठलाच त्रास न होऊ देण्यासाठी राजकीय दबाव आणण्यात आला होता. पीडित महिला दलित असूनही अ‍ॅट्रॉसीटी अ‍ॅक्ट लावण्यात आलेला नव्हता. वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेला संरक्षण न देता मोकळे सोडून दिले. त्या महिलेच्या जीवाचे काही बरे - वाईट तर केले नाही ना, अशी तिच्या घरच्यांना भीती आहे. भाजपाने धारणी पोलिसांकडे तात्काळ या प्रकरणी पावले उचलण्याचा पोलिसांना अल्टीमेटम दिला आहे. दोन दिवसात पीडितेला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक एल.के. मोहंदुळे यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात पिडितेच्या वृद्ध सासूसह माजी आ. प्रभूदास भिलावेकर, जिल्हा सरचिटणीस प्रशांत शेगोकार, राजेश पाठक, रमेश मावस्कर, हिरालाल मावस्कर, अनुज पांडे, सुशील गुप्ता, सुधाकर पकडे, हरिसालचे उपसरपंच गणेश गायन, मुकुंदराव बडोदे, वालमवार, सुभाष गुप्ता, अंबर बनसोड यांचा प्रामुख्याने समावेश होता.