मानवी मनाला नेहमीच नावीन्याची ओढ लागलेली असते. नवा खाद्यपदार्थ बाजारात आला की, त्यावर त्याच्या उड्या पडतात. नवी शोभेची वस्तू बाजारात दिसली की, त्याला ती आपल्या दिवाणखान्यात विराजमान करावीशी वाटते. नवा चित्रपट प्रदर्शित झाला तर तो बघावासा वाटतो आणि नवे पुस्तक बाजारात आले तर त्या पुस्तकाचा वाचून फडशा पाडायचे त्याचे आडाखे सुरू होतात. नावीन्याच्या ओढीपायीच लोक नवे कपडे खरेदी करतात, नवनव्या गावांना भेटी देतात, नवनवे संशोधन करतात, विभिन्न लोकांच्या भेटीगाठी घेतात, नवे छंद जोपासतात, नवे सण-महोत्सव साजरे करतात, नवे मित्र-मैत्रिणी जोडतात, नव तंत्रज्ञानाचा स्वीकार करतात आणि जे काही म्हणून नवे आहे, त्याला स्वीकृती देतात. अशातच काही वर्षांपूर्वी स्मार्टफोनचा जन्म झाला.
प्रारंभीच्या काळात स्मार्टफोनपासून अंतर राखून असलेला मानव केव्हा त्याच्या आहारी गेला, हे त्याचे त्यालाच कळले नाही. सुरुवातीच्या काळातली स्मार्टफोनची महागडी यंत्रे आताशी त्याचा वापर वाढल्याने अगदी गरिबातल्या गरिबाच्याही हातात दिसू लागली आहेत. आज स्थिती अशी आहे की, स्मार्टफोन हाती नसला की लोकांचा जीव कासावीस होतो आणि तो हाती असला तर भल्या भल्या मोहिमा माणूस फत्ते करतो. टाळेबंदीच्या काळात तर स्मार्टफोनचे महत्त्व कितीतरी पटींनी वाढले. पूर्वी केवळ मोठ्या माणसांच्याच हाती दिसणारे हे फोन आधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हाती आले आणि आता तर शाळकरी मुलांनीही त्यावर आपला जम बसवला आहे.
स्मार्टफोनच्या जोडीला इंटरनेट आल्याने तर सार्यांना जगाला कवेत घेतल्याचा अनुभव येत आहे. तथापि, मानवाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जाणारे स्मार्टफोन आता मानवावरच हावी होत असल्याचे दिसू लागले आहे. मोठी माणसेही त्याच्या आहारी गेल्याचे बघायला मिळत असून, लहान आणि शाळकरी मुले जर त्याच्या आहारी गेली नसती तरच नवल! अशात एका संशोधनातून स्मार्टफोनमुळे 36 टक्के मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम झाल्याचा निष्कर्ष काढला गेला आणि समस्त पालकांची चिंता आधीपेक्षा दुपटीने वाढली.
पूर्वी व्यसन म्हटले की दारू, सिगारेट, गांजा, अमली पदार्थ याची धास्ती राहायची. पण कोरोना काळात सारे जग थांबले असताना इंटरनेटचा व्यावसायिक वापर कितीतरी पटींनी वाढला. इंटरनेट प्रोव्हायडर कंपन्या मालामाल होत असताना मुलांना स्मार्टफोनचे व्यसन जडले. शाळा बंदीने इंटरनेटचा अतिवापर होऊ लागला. मुलांना आभासी गेम्स खेळण्याची सवय जडली. पब जी आणि ब्यू व्हेल हे त्यातलेच गेम्स. या गेम्सनी तर मुलांमध्ये मुलखावेगळे धाडस करण्याची ऊर्मी दाटली. यातून अनेकांचे बळीदेखील गेले. हे गेम्स खेळल्याशिवाय झोप येत नाही, अशी अनेक मुलांची परिस्थिती झाली. मुलांना यातून बाहेर पडण्यासाठी अनेक पालकांना मानसोपचारतज्ज्ञांचे सल्ले घ्यावे लागले. तरीदेखील अनेक जण अजूनही त्याच्या कचाट्यातून बाहेर पडण्यास असमर्थ ठरत आहेत. मुलांच्या भंगलेल्या एकाग्रतेवर उपाययोजना करण्यासाठी आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून, त्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
आता आभासी खेळांसाठी नोंदणी करण्यापूर्वी आई-वडिलांची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मुलांना एकाग्र बनविण्यासाठी अशा प्रकारचे कठोर निर्णय घेण्याची अपेक्षा होतीच; ती सरकारने पूर्ण केल्याबद्दल सरकार अभिनंदनास पात्र आहे. आता यापुढे आभासी खेळांसाठी पालकांची, शिक्षकांची परवानगी अनिवार्य करण्यात आल्यामुळे मुले कोणता खेळ खेळताहेत, हे त्यांच्या नजरेत येणार आहे. त्याचा अतिवापर झाल्यास मुलांना फटकारण्याची संधीदेखील पालकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे लपून-छपून आभासी खेळ खेळण्यावर निर्बंध येणार आहेत. यामुळे मुलांचे विचलित झालेले लक्ष स्थिरस्थावर होण्यास मदत होणार आहे. मुलांचा घरघुसेपणा कमी होण्यासही मदत होणार आहे. यामुळे मैदाने, जी ओसाड पडलेली दिसतात, त्यावर खेळायला येणार्या मुलांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. समाजात निर्माण झालेल्या समस्यांवर अशा वेळोवेळी उपाययोजना केल्या गेल्या तर त्यातून समाजाचे भले होते आणि समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करीत नाहीत.
स्मार्टफोनचा अतिवापर हेच मुलांची एकाग्रता भंग करणारे ठरते, ही वस्तुस्थिती नाकारली जाऊच शकत नाही. ही बाब पालकांच्या ध्यानात आजवर आलेली नव्हती असे नाही, पण त्यांनाही यावर काही तोडगा दृष्टिपथात दिसत नव्हता. आभासी खेळासाठी नोंदणी करताना ओटीपी मागितला जाणार आहे. त्यामुळे कोणीही मुलगा असे खेळ खेळण्यास प्रारंभ करण्यापूर्वीच पालकांना त्याची कृत्ये अवगत होण्यास विलंब लागणार नाही. बालहक्क आयोगाने प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणानुसार शेकडा 24 मुले झोपण्यापूर्वी स्मार्टफोन्स वापरतात. वयानुसार हे प्रमाण वाढत जाते आणि त्याचा झोप, पचनशक्ती आणि एकूणच आरोग्यावर परिणाम झाल्याशिवाय राहात नाही. टाळेबंदीच्या काळात तर मुलांचे स्मार्टफोनचे व्यसन कसे सोडवायचे? किती मुले इंटरनेटचा वापर करतात? ती कितपत याच्या आहारी गेली आहेत? त्यांना या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जायला हव्यात? आणि अतिवापरामुळे आणखी कोणकोणते परिणाम होऊ शकतात, यावर संशोधने झाली आणि सर्वेक्षणे करून, त्याचे निष्कर्षदेखील काढले गेले. या सार्यांवर देशातील तज्ज्ञ मंडळी अभ्यास करीतच आहेत. पण म्हणावे तसे त्याचे परिणाम पुढे येऊ शकलेले नाहीत.
टाळेबंदीत मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे पालक सांगतच होते. पण आता बाल हक्क आयोगाच्या निष्कर्षामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भारतातील तब्बल 37.15 टक्के विद्यार्थ्यांमधील एकाग्रता ढळली आहे, असे हा निष्कर्ष सांगतो. मोबाईलमुळे मुले चिडचिडी झाल्याचीही उदाहरणे काही कमी नाहीत. मुलांना उमलत्या वयात नको त्या चित्रफिती बघायला मिळण्याचा परवाना मिळाल्यामुळे अथवा इंटरनेटमुळे त्यांना तशी संधी आयतीच मिळत असल्याने ती मुले अशा चित्रफिती पाहून वाममार्गाला वळण्याचा धोका वाढला आहे. इंटरनेटवरील भीतिदायक चित्रपट बघून त्यांच्यात अनिद्रेचा रोग बळावला आहे. रात्रीच्या वेळी दचकून जागे होण्याचे प्रकार किंवा झोपेत घाबरल्यामुळे अंथरूण ओले होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. एकलकोंडेपणा वाढण्यासही हेच स्मार्टफोन कारणीभूत ठरले असल्याचे पालक सांगतात. बाल हक्क आयोग म्हणतो, 23.80 टक्के मुले झोपण्यापूर्वी स्मार्टफोनचा वापर करतात.
डॉक्टरांच्या मते झोपण्याच्या किमान एक तासपूर्वी तुम्ही स्मार्टफोनपासून स्वतःला दूर केले तर तुमचा शांत झोपेचा मार्ग सुकर होतो. याच आयोगाच्या आकडेवारीनुसार अभ्यास करताना 13.90 टक्के विद्यार्थी नेहमी आणि 23.30 टक्के विद्यार्थी अधूनमधून स्मार्टफोन वापरतात. पण खरोखरीच अभ्यास करताना इतका वेळ स्मार्टफोन वापरण्याची गरज आहे का? यावर शिक्षणतज्ज्ञांनी मंथन करायला हवे. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांची एकाग्रता तर निश्चितच कमी झाली आहे. जेवताना त्यांचे लक्ष स्मार्टफोनमध्येच असल्याने कोणते पदार्थ खातोय, त्यांची चव कशी, ते कुणी केले, त्यासाठी किती मेहनत लागली, याचा विचार करण्याची शक्तीच ते गमावून बसले आहेत. घरी केलेल्या चांगल्या पदार्थांसाठी उत्स्फूर्तपणे उत्तम, लाजवाब, क्या बात है अशी लहानशीच प्रतिक्रिया करणार्याचा उत्साह वाढवते, याची जाणीवच त्यांना उरलेली नाही. बरे, इंटरनेटमुळे सृजनता वाढली म्हणावी तर तसेही होत नाही किंवा तसा कुठला निष्कर्षही काढला गेलेला नाही. मनोरंजनाचे हे एक उत्कृष्ट साधन आहे, असे बहुतांशी मुलांना वाटते, ही बाब खरीच आहे. पण, मनोरंजनासाठी किती वेळ त्याचा वापर करायचा, याची सद्सद्विवेकबुद्धीच विद्यार्थ्यांचा यशाचा सोपान पार करणारी ठरणार आहे. चला तर एकाग्रताभंगी स्मार्टफोनला शिक्षक आणि पालकांच्या मदतीने स्वतःपासून सुरक्षित अंतरावर ठेवण्याची शपथ घेऊया!