१९८० च्या प्रारंभी कॅलिफोर्निया (california) युनिव्हर्सिटीतल्या मेरियन डायमंड (marian dimaond) या मज्जातंतू तज्ज्ञाने (neuro specialist) अतिशय आश्चर्यकारक प्रयोग केला. त्याचे निष्कर्ष जगभरच्या बुद्धी आणि सर्जनशीलतेच्या समजांना कलाटणी देणारे ठरले. डायमंडने ब-याच उंदरांवर प्रयोग केले. निम्म्या उंदरांना झोके, शिट्ट्या, जिममध्ये चालण्याचे ट्रेडमिल (trademill) इत्यादी डोके वापरावे लागेल, अशी अनेकविध खेळणी असलेल्या कल्पक वातावरणात ठेवले. निम्म्या उंदरांना रिकाम्या, भकास पिंजऱ्यांमध्ये ठेवले. बुद्धीला चालना देणा-या वातावरणातले उंदीर आश्चर्यकारकरीत्या तीन वर्षे एवढे, म्हणजे माणसाच्या ९० वर्षांइतके दीर्घायुष्य जगले. महत्त्वाचे म्हणजे या सर्व उंदरांच्या मेंदूचे आकारमान वाढले; मज्जातंतूंचे जाळे अधिक विकसित झाले. पेशीपेशींमधील संदेशवहन करण्याची क्षमता वाढली. याउलट रिकाम्या पिंजऱ्यांमधले उंदीर अल्पायुष्य जगले. नीरस, घुसमटलेल्या वातावरणातल्या या उंदरांचे मेंदू अविकसित राहिले.
बुद्धीचे प्रचंड वरदान लाभलेल्या मनुष्यप्राण्याला हा प्रयोग खूप काही शिकवून गेला. स्वत:च्या सर्वांगीण विकासासाठी, हव्या त्या क्षेत्रात अधिक यश मिळविण्यासाठी स्वत:च्या मेंदूचे व्यवस्थापन व विकास ही बाब आपल्या हातात असू शकते हा शोध, ही मोठीच आनंददायी वार्ता होय. याचबरोबर वयोमानानुसार मेंदूची क्षमता, स्मरणशक्ती कमी होते, हा समजही शास्त्रज्ञांनी खोटा ठरविला आहे. मेंदूचा सतत कार्यक्षम वापर करत शेवटच्या श्वासापर्यंत मेंदू तल्लख ठेवला जाऊ शकतो. सर्जनशीलता, कल्पकता सतत जागृत ठेवून तीत वाढ करता येते. अन्यथा इंग्रजीतल्या म्हणीनुसार, If you do not use it, you lose it. न वापराल तर गमवाल - यानुसार मेंदूच्या क्षमता कालांतराने क्षीण होण्याचा, गंजण्याचा धोका असतो. हे सर्व निष्कर्ष शास्त्रज्ञ डायमंड सारख्यांच्या प्रयोगामुळे अधोरेखित झाले.
सर्जनशीलतेत मेंदूच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही भागांचा वाटा आहे. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीने मेंदूच्या दोन्ही भागांचे अस्तित्व मान्य केलेले दिसते. गेल्या दोन दशकांमध्ये या भागाच्या विशिष्ट कार्यांबाबत अनेक नवे निष्कर्ष जगापुढे आले आहेत. तर्क, सुसंगती, पृथक्करण, नवीन भाषा शिकण्याची क्षमता, गणिती आकडेमोड इत्यादी कामे आपला डावा मेंदू करतो. चित्र, काव्य, रंग, आकार, संगीत, ताल यांची विशेष जाण असलेले लोक मेंदूच्या उजव्या भागाचा अधिक वापर करतात. संकल्पना, अमूर्त विचार, प्रेम, सौंदर्य, निष्ठा हाताळण्यात त्यांना अधिक पारंगतता असते. असे असले, तरी प्रत्येकात दोन्हीचे मिश्रण असतेच. ३०० दशलक्ष सूक्ष्म न्युरोन्सनी मेंदूचे दोन्ही भाग एकमेकांना जोडलेले असतात. त्यांच्याद्वारे या माहितीची प्रचंड देवाणघेवाण सतत चालू असते.
एखाद्याशी संभाषण करीत असताना समोरच्याच्या चेह-यावरचे भाव निरखणे; त्यामागच्या भावना जाणून घेणे, हे कार्य मेंदूचा उजवा भाग करीत असतो. मेंदूचा डावा भाग, त्या व्यक्तीचे शब्द ऐकून त्याचा अर्थ तर्काने जाणून घेण्याचे काम करू लागतो. तेव्हाच उजवा भाग आवाजाची पट्टी, भावनांमुळे येणारा कातरपणा वा कणखरपणा यांची नोंद घेत असतो. मेंदूच्या क्षमतेची आणि कल्पकतेची कार्यक्षमता वाढविणे हे प्रत्येकाचे जीवनातले महत्त्वाचे आव्हान होय. तज्ज्ञ सुचवतात त्यानुसार मेंदूच्या उजव्या भागाची क्षमता वाढविण्यासाठी विविध कला, वाद्ये, संगीत, आवडीच्या विषयांच्या पुस्तकांचे वाचन, लेखनाचा सराव या बाबी उपयुक्त ठरतात.
डावा भाग विकसित करण्यासाठी बुद्धिबळ, शब्दसंग्रह वाढविणे, स्क्रबलसारखे खेळ, शब्दकोडी, अनेक मैदानी खेळ हे उपाय जरूर करावेत. बुद्धीला चालना मिळेल, ज्यांच्या सहवासात नवे शिकायला मिळेल, माहितीत भर पडेल अशा मित्रमंडळींच्या सहवासात राहण्यासाठी स्वत:चाच ग्रुप तयार करा. तंतुवाद्य वाजविणे, कोरीव काम, शिल्प, भरतकाम इत्यादीसारख्या छंद किंवा कलांमध्ये जिथे बोटांचा वापर अधिक होतो, अशावेळी मेंदूचे दोन्ही भाग काम कार्यशील असतात. बौद्धिक अस्वस्थता हा सर्जनशीलतेचा आत्मा होय. ती सहजी न आल्यास मुद्दाम निर्माण करावी. आयक्यू म्हणजे बद्धिगुणांक माणसांच्या क्षमतांविषयी फक्त आंशिक चित्र उभे करतो. बुद्धिगुणांकाला माणसाच्या सर्जनशीलतेच्या गुणसंख्येची जोड दिल्याखेरीज व्यक्तीचे मूल्यमापन अपूर्ण राहील. सर्जनशीलता ही बुद्धिमत्तेपेक्षा वेगळी अशी शक्ती आहे. व्यवहारात सर्जनशीलतेचे स्वतंत्र स्थान आहे.
दैनंदिन जीवनाचा दर्जा वाढविणे, समस्या, आव्हानांनाच आपल्या विकासाचे साधन बनविणे, त्यातून मार्ग काढण्यासाठी एकापेक्षा अधिक पर्याय निर्माण करणे, शास्त्रीय ज्ञान आणि संशोधन यांचा वापर दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी करणे यातही सर्जनशीलता असते. अतक्र्य गोष्टींच्या संमिश्रणातून तिसरंच नवं काही जन्माला घालणं म्हणजे सर्जनशीलता! अडचणींचा बाऊ न करता नवी संजीवनी देणारी ही सर्जनशीलता म्हणजे (crativity) हा जीवनाचा अविभाज्य भाग होय. अन्न, हवा, पाण्याइतकीच माणसाची कलेची गरजदेखील मूलभूत असते. आपल्या आनंदाचा शोध लागला की ते क्षेत्र आपली स्फूर्र्तिदेवता बनते. Muse lingers near the home of our joy. म्युझ म्हणजे आपली स्फूर्तिदेवता. ती आपल्या आनंदाजवळच रेंगाळत असते, असे म्हटले जाते. आयुष्यातला तोच-तोपणा, औदासीन्य घालविण्यासाठी छंद जोपासणे हे सर्जनशीलता वाढविण्याचे एक महत्त्वाचे साधन होय.
‘कलाकार' ही या जगातली सर्वात मौल्यवान माणसे होत. आपली मानसिकता बदलण्याचे काम त्यांच्यातील सर्जन करीत असतो. प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. आमच्यात कुठली आलीय् सर्जनशीलता? मी आपला एक सामान्य माणूस आहे. अशा वाक्यांऐवजी माझ्या अंत:प्रेरणांवर माझा विश्वास आहे; एकाच समस्येला हाताळण्यासाठी मी नवे पर्याय शोधू शकतो, अशा विधायक स्वसंवादात्मक वाक्यांनी, स्वत:तील सर्जनशीलतेला आपण जागृत करू शकतो, हे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स Shad Helmstetter तसेच What to say when you talk to yourself या पुस्तकाद्वारे अनुभवांनी सिद्ध केले आहे.
संस्कृतीच्या घडणीबाबत एक सुंदर म्हण आहे, Where hunger ends culture begins म्हणजेच पोटापाण्याची चिंता ज्या रेषेवर मिटते, तिथून संस्कृती, कला, प्रतिभा यांचा प्रांत सुरू होतो. उपाशीपोटी कलेचे उन्मेष कसे स्फुरणार? धकाधकीच्या जीवनापासून दूर, निसर्ग, डोंगरद-या, निर्झर क्षण मनावरचे ताण दूर करतात. प्रत्यक्ष दुथडी भरून वाहणा-या नद्या, झरे, दूधसागरसारखे धबधबे प्रफुल्लित करतात. समर्थ रामदासांनी शिवथर घळ येथील धबधब्याला उद्देशून लिहिलेले काव्य हे निसर्गाच्या सान्निध्यात प्रतिभा आणि सर्जनशीलता कशी प्रेरणा देते, याचे ज्वलंत उदाहरण होय.
गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे, धबाबा लोटती धारा धबाबा तोय (दूध) आदळे...!
मुलांच्या घडणीत सर्जनशीलतेचे महत्त्व जाणणा-या पालकांनी पुढील मार्गांचा जरूर अवलंब करावा. मुलांनी गायीला जांभळा रंग दिलेला पाहूनही ‘अरे वा, तुझी गाय जांभळी आहे का बरं..' असं म्हणणारे पालक, कलेच्या प्रांगणात काहीही शक्य असते, हा संदेश मुलांपर्यंत पोहोचवतात. अन्यथा, चौकटीत बसेल असे बंदिस्त विचार करण्याची मुलाला सवय लागेल. ‘थांब हं, मी दाखवते तुला बरोबर काय ते. हे असं करायचं,' असं म्हणण्याऐवजी ‘तू प्रयत्न कर, मला खात्री आहे, तू करशील' असं म्हणण्यामुळे तीच गोष्ट काही वेगळ्या मार्गाने मूल करू शकते. ‘अरे वा, तू उशीला शिडी केलंस की!'किंवा ‘तुझं उशीचं घर छान ऊबदार झालंय' असं म्हणून प्रोत्साहन द्यावे. पिसांचा वापर विविध रंगांची तरलता उमटविण्यासाठी करू द्यावा.
घरातल्या एखाद्या भिंतीवर मोठा कागद लावून ती भिंत त्याच्यासाठी ठेवावी. मुलांना त्यावर मनाप्रमाणे चित्र, रंगकाम, कविता लिहिण्याचे स्वातंत्र्य द्यावे. काही दिवसांनी नवा कागद लावावा. पहिला तारीखवार जपून ठेवण्याने त्याच्या सर्जनशीलतेची आई दखल घेते आहे, हे पाहून नवे व्यक्त करण्यास मुलाला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल. मोठ्या ठोकळ्यांचा पिरॅमिड पाचव्यांदा पडला तेव्हा रडकुंडीला आलेल्या मुलीला तिच्या शिक्षिकेने छोट्या ठोकळ्यांचा आधार देण्यास सांगितले. यामुळे आयुष्यातल्या मोठ्या अडथळ्यांनाही काही वेगळ्या वा नव्या कौशल्याने पार करता येते, हे अगदी सहज शिकविले गेले. धार्मिक, सामाजिक बंधने, दडपणे यामुळे अनेक स्त्रियांना आपल्या अंगच्या कलांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळत नाही. तिच्यातील कलाकारी न ओळखल्यामुळे आलेली घुसमट ही अनेक जणींना मनोरुग्ण बनवते, असे निदान झाले आहे. प्रत्येकच व्यक्तीच्या सर्जनशीलतेला वाट मिळू देणे, त्यांना समाजमान्यता देणे ही समाजाची जबाबदारी होय. परिपूर्ण व्यक्तिमत्त्वासाठी सृजनशीलता, कल्पकता जपण्यामुळे मिळत असलेल्या शब्दातीत आनंदाचे स्थान अमूल्य आहे. ती जाणीवपूर्वक वाढविल्यामुळे जीवनाला आपण एक वेगळाच अर्थ देऊ शकतो.