जगभरात हवामान बदलाचे climate change संकट अधिकच गंभीर होत असून ३.६ अब्ज लोकांना याचा थेट फटका बसणार असल्याचा अहवाल सोमवारी संयुक्त राष्ट्रसंघाला सादर करण्यात आला. तातडीने पावले उचलली नाहीत, तर विकसनशील तसेच भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशांना याचा जोरदार फटका बसू शकतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सध्या युक्रेन-रशिया Ukraine-Russia War युद्धाच्या थरारक बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे सातत्याने आदळत आहेत. त्या बातम्यांच्या प्रचंड भडिमारात हवामान बदलाच्या climate change गंभीर परिणामांबाबतच्या बातमीकडे वाचकांचे/प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता फारशी नाही. मुख्य म्हणजे युद्धाच्या बातम्याही विनाश व मानवी संहाराशी संबंधित आहेत, तर काल आलेली हवामान बदलाच्या climate change तीव्र परिणामाची बातमीही तेवढीच भयंकर आणि सजीव सृष्टीच्या विनाशाविषयी आहे. युद्धाचे परिणाम जेवढे भीषण तेवढेच हवामान बदलाचे climate change परिणामही भयानक आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
हा अहवाल इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज अर्थात आयपीसीसीने IPCC प्रकाशित केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची United Nations पर्यावरणविषयक समिती याचा बारकाईने अभ्यास करीत आहे. भारताचाही या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाचा सहभाग आहे. मुख्य म्हणजे जगातील ३६० कोटी लोकसंख्येला हवामान बदलाचाclimate change थेट फटका बसणार असल्याचे या अहवालात स्पष्टपणे नोंदविण्यात आले आहे. भारताची १३५ कोटींच्या वर असलेली लोकसंख्या लक्षात घेता हा अहवाल म्हणजे भयसूचक घंटानादच म्हणावा लागेल. हवामान बदल climate change म्हणजे नेमके काय आणि त्याचे माणसावर व पृथ्वीवर काय परिणाम होतात, हे देखील समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण हा विषय संपूर्ण पृथ्वी व मानवजातीच्या अस्तित्वाशीच निगडित आहे. एखाद्या ठरावीक ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच ‘क्लायमेट चेंज' अर्थात हवामान बदलclimate change माणसाच्या वेगवेगळ्या कृत्यांमुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि यामुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. जर यावर तातडीने पावले उचलली नाहीत तर माणूस आणि निसर्ग या दोन्हींना धोका निर्माण होईल. भयानक दुष्काळ होतील, समुद्राची पातळी वाढेल आणि पक्षी-प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होतील.
वाढत्या मानवी घडामोडींमुळे कार्बन डाय ऑक्साईड (सीओ२) उत्सर्जनाचे प्रमाण वाढले असून त्यामुळेच तापमानातही वाढ झाली आहे. माणसांद्वारे घरी, कारखान्यात आणि वाहतुकीसाठी केला जाणा-या तेल, गॅस आणि कोळशाच्या वापरामुळे हवामानात झपाट्याने बदल होत आहेत. जैवइंधन ज्यावेळी जाळले जाते, त्यावेळी त्यातून ग्रीन हाऊस गॅसेसचं Green House Gas उत्सर्जन होतं. यात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण जास्त आहे. या वायूंमुळे सूर्याकडून आलेली उष्णता अडकून राहते आणि त्यामुळे पृथ्वीवरचे तापमान वाढते. हवामान बदलांमुळे निसर्गचक्रात टोकाचे बदल होतील, असा इशारा तज्ज्ञांनी वारंवार दिला आहे. १९ व्या शतकाच्या तुलनेत आता जगभरातले तापमान १.२ सेल्सिअसने वाढलेले आहे. तर वातावरणातल्या कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे. हवामान बदलाचे climate change विपरीत परिणाम होणे टाळायचे असेल तर जगाचे तापमान वाढण्यापासून रोखणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे २१०० पर्यंत म्हणजे आगामी ७८ वर्षांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगचे Global Warming प्रमाण १.५ सेल्सिअसपर्यंत रोखणे सर्व देशांपुढे मोठेच आव्हान आहे. पण जर वेळीच पावले उचलली नाहीत तर या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीचे तापमान २ अंशांनी वाढण्याची भीती आहे. मात्र जर कुठलीच पावले उचलली नाहीत तर पृथ्वीचे तापमान ४ अंश सेल्सिअसने वाढेल आणि परिणामी विनाशकारी उष्णतेची लाट येईल; समुद्राची पातळी वाढल्याने लाखो लोकांची घरे पाण्याखाली जातील आणि या पृथ्वीचे आणि यावरील जैवसृष्टीचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल.
खरे तर हवामानात होणा-या टोकाच्या बदलांचे climate change परिणाम आपण आता पाहातच आहोत. यामुळे अनेकांचे आयुष्य आणि रोजीरोटी धोक्यात आली आहे. हवामान बदलामुळे आपली म्हणजेच मानवाची जीवनशैली बदलू शकते. सुपीक जमिनीचे रेताड जमिनीत रूपांतर होईल. पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांचे, अन्नधान्याचे उत्पादन करणेदेखील कठीण होईल. जागतिक तापमान वाढीमुळे अंटाक्र्टिकावरील बर्फ वेगाने वितळत आहे. अंटाक्र्टिकाचे निरीक्षण करणा-या उपग्रहांनी दरवर्षी समुद्रात वितळून मिसळणा-या बर्फाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. दीर्घकाळासाठी पृथ्वीसाठी ही मोठी समस्या ठरणार आहे. ताज्या आकडेवारीनुसार, संपूर्ण अंटाक्र्टिकावर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास २०० अब्ज टन बर्फ विरघळत आहे. २४ स्वतंत्र उपग्रहांनी नोंदविलेल्या माहितीनुसार, २०१२ नंतर अंटाक्र्टिकावरील बर्फ कमी होण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे. यावरील संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. यानुसार दरवर्षी समुद्राची पाणी पातळी ०.६ मिलीमीटरने वाढत आहे. जगभरातील समुद्राची पातळी वाढत असल्याचे आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा अंटाक्र्टिकामधील वितळलेल्या बर्फाचे त्यात फार मोठे योगदान असते.
हवामान बदलामुळे climate change समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे आताच जगातील काही भागातील उष्णता प्रचंड वाढली आहे आणि ती ठिकाणे भविष्यात निवास करण्यास योग्य राहणार नाहीत. काही महिन्यांपूर्वी चीन, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्समध्ये आलेले भीषण पूर व कॅनडातील काही भागात वाढलेले प्रचंड उष्णतामान ही हवामान बदलाच्या climate change भयंकर परिणामांची ठळक उदाहरणे आहेत. यात भारताचा क्रमांक लागणार नाही, याची खात्री आपण देऊ शकतो काय? हवामान बदलावर climate change नियंत्रण आणणारी व्यापक अशी यंत्रणा तातडीने उभारण्यात आली नाही तर उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, वादळे हे सर्व वारंवार होईल व त्याचे प्रमाणही वाढत जाऊन मानवी जीवनासाठी ते अतिधोकादायक ठरेल, असेही युनोला सादर करण्यात आलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब, विकसनशील देशांना बसणार असून संबंधित देशांतील लोकांना याच्याशी जुळवून घेणे सर्वाधिक कठीण व त्रासदायक ठरणार आहे. शास्त्रज्ञांनी हवामान बदलासाठी १.५ सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ ही मर्यादा ठरवली आहे. एवढी वाढ सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दिलासादायक बाब म्हणजे नोव्हेंबर २०२१ मध्ये इंग्लंडमध्ये जगभरातील देशाच्या नेत्यांची ‘ग्लासगो क्लायमेट कॉन्फरन्स' झाली होती. यात २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी कसे करायचे, याची आखणी या परिषदेत सहभागी देशांनी केली होती. तसेच या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे २०५० पर्यंत हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी करून ते शून्यावर आणण्याचे लक्ष्य विविध देशांनी ठेवले आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारच्या वायू उत्सर्जनाच्या प्रमाणात ते वायू शोषले जातील, असा समतोल राखला जाईल, अशाप्रकारे उपाययोजना केल्या जातील. मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून कार्बन वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यात येईल. या माध्यमातून तापमानात झपाट्याने होणारी वाढ थांबवून, हवामान बदलाचे climate change गंभीर दुष्परिणाम टाळता येऊ शकतील. या झाल्या तांत्रिक आणि व्यावहारिक उपाययोजना. मात्र, जागतिक तापमान वाढ रोखण्यास एवढ्याच उपाययोजना पुरेशा नाहीत, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. कारण या सगळ्याच्या मुळाशी आहे तो प्रचंड चंगळवाद, वाढता उपभोगवाद आणि खा, प्या, मजा करा ही वृत्ती.
या चंगळवादामुळेच पर्यावरण, जंगलांचा प्रचंड विनाश climate change झाला. ‘संयमित उपभोग' हा वैदिक ऋषींनी दिलेला जीवनमार्ग आम्ही विसरलो. प्रकृतीचे, निसर्गाचे दोहन, संवर्धन करण्याऐवजी आम्ही तिचे प्रचंड शोषण केले. निसर्गात नको तेवढी ढवळाढवळ केली, प्रत्येक टप्प्यावर निसर्गाशी संघर्ष केला. याचे भीषण दुष्परिणाम आम्हाला आता भोगावे लागत आहेत. त्यामुळे वाढत्या उपभोगावर आवर घालून या सृष्टीचे सुयोग्य नियमन आम्हाला करावे लागणार आहे. भारतीय जीवनदर्शनात अष्टांग योगा अंतर्गत यम-नियम सांगितले आहेत. त्या यम-नियमांचे पालन झाले; निदान त्याचे वैचारिक अंगाने जरी चिंतन केले तरी या समस्येची तीव्रता कमी होण्यास निश्चितच मदत होईल. कारण यात मानवाच्या शाश्वत कल्याणाची तत्त्वे अंतर्भूत आहेत. पाश्चात्त्य विचारविश्व आज भारतीय तत्त्वज्ञानाचा सांगोपांग अभ्यास करीत आहे. तेव्हा ही शाश्वत व चिरंतन अशी मूल्ये आचरणात आणली तर अवघ्या जगाचे कल्याण होऊन शांती व समाधानाचा मार्ग निश्चितच गवसेल. जागतिक तापमान वाढीच्या climate change संकटाचा हाच अन्वयार्थ आहे.