गड्डाटोलीतून 11 लाखांचा गांजा जप्त

- तीन तस्करांना अटक

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
Ganja Seized : शहरातील गड्डाटोली परिसरातील झोपडी मोहल्ल्यात एका घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 75 किलो गांजा जप्त केला आहे. याची किंमत 11 लाख 32 हजार 245 रुपये आहे. ही कारवाई 30 जानेवारी रोजी सायंकाळी करण्यात आली. या प्रकरणी तीन गांजा तस्करांना अटक करण्यता आली आहे.
 
Ganja Seized
 
गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस गांजा व्यवसाय फोफावत चालला आहे. शहरातील अनेक भागात गांजा खुलेआम विक्री करण्यात येत आहे. या गांजाच्या आहारी अल्पवयीन मुले जात आहेत. त्यामुळे शहरात चोरी, भांडण, खून अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. ओरिसा व आंध्रप्रदेशातून गोंदिया जिल्ह्यात गांजाची तस्करी करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. शहरातील गड्डटोली परिसरातील झोपडी मोहल्ल्यातील एका घरात गांजा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
 
 
त्याआधारे पोलिसांनी 30 जानेवारी रोजी सायंकाळी धाड टाकली. यावेळी 75 किलो गांजा त्यांना आढळून आला. पोलिसांनी 75 किलो 483 ग्राम गांजा किंमत 11 लाख 32 हजार 245 व इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत 3 हजार रुपये असा एकूण 11 लाख 35 हजार 245 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपी शुभम (20, रा. पुनाटोली), मनिष (25, रा. गांधी वॉर्ड) व आकाश उर्फ टेंपो उर्फ छोटू (रा. कन्हारटोली) यांना अटक केली. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध भादंवि कलम 8 (क) 20, 29 एनडीपीएस अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.