खरिपातील तुरीचे झाले खराटे!

- बदलत्या वातावरणाने हाताशी आलेले पीक हिरावले
- शेकडो हेक्टरवरील पिकाचे नुकसान

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
सिंदी (रेल्वे), 
Kharip Season : मागील महिन्यात ढगाळी वातावरणाने तूर पिकाला जबर फटका बसला. धुक्यामुळे तुरीच्या फुलांची आणि कोवळ्या शेंगाची गळती झाली. आता तर उभ्या तुरीचे खराटे होताना दिसत आहे. त्यामुळे हाताशी आलेल्या तुरीचे पीक पूर्णपणे वाळलेल्या अवस्थेत पोहोचले आहे. ऐन फुलांनी व कोवळ्या शेगांनी बहरलेली झाडे करपलेली पाहून शेतकर्‍यांच्या डोळ्यात अश्रु आल्याचे पहायला मिळत आहे.
  
Kharip Season
 
यंदाच्या अतिवृष्टीने कपाशी, सोयाबीन व इतर पिकांचे उत्पादन घटले. अतिवृष्टीने बहुतांश शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातच आता बहरलेल्या तुरीवर कोणता रोग आला कळायला मार्ग नाही. ढगाळी वातावरण, पहाटे पडणारे धुके तसेच ऐन हिवाळ्यात थंडी गायब झाली असल्याने शेतातील उभ्या तुरीला फटका बसला आहे. तालुक्यातील उभ्या तुरीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. ऐन शेंगा लागलेल्या पिकाची झाडे दररोज करपताना बघून शेतकरी हैरान झाले आहे. काही शेतातील तुरीची कापणी करण्याची गरजच पडणार नाही एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अचानक वातावरणात बदल होत असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली असून यावर उपाययोजना तरी कोणत्या कराव्यात, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.
 
 
शेतकरी सोयाबीन आणि कपाशी पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर तुरीचे आंतरपीक घेतात. शेंगा पोखरणार्‍या अळीच्या बंदोबस्तासाठी योग्यवेळी महागड्या किटकनाशकांचा वापर करतात. परंतु, एवढे सारे करूनही अचानक तुरीचे पीक करपले आहे. त्यामुळे हाताशी आलेली पिके नष्ट होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. परिसरातील पळसगाव (बाई), आलगाव, शिवणगाव, पहलानपूर, दिग्रज, पिपरा, हिवरा, हेलोडी, बोरगाव, बेलोडी, डोरली, सेलडोह आदी मौजातील तुरीचे पीक करपले. पिपरा शिवारातील सुभाष पाटील यांच्या 3 एकरातील तर हिवरा शिवारातील संदीप कलोडे यांच्या 6 एकरातील तूर गेल्या दोन-तीन दिवसात पूर्णपणे करपली आहे. अजूनही बदलत्या वातावरणात तुरीची झाडे करपण्याचे प्रमाण वाढत आहे. हिरवीगार दिसणार्‍या शेंगा, फुलांसहीत झाडे करपली जात असल्याने उत्पादन होणारच नसल्याचे सांगितले जात आहे. आता शेतकर्‍यांना पीकविमा कंपनीने सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे.