पुस्तकातूनच करा ग्रंथ दालनात प्रवेश !

- अ. भा. साहित्य संमेलन

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
अखिल भारतीय साहित्य संमेलनाची (Sahitya Sammelan) लगीन घाई आता सुरू झाली आहे. आयोजकांतील ‘मोजक्यां’ना 24 तास कमी पडू लागले आहेत. साहित्य संमेलनात अभिनव देण्यावर भर आहे. इतर साहित्य संमेलनापेक्षा येथील ग्रंथ दालन वैविध्यपूर्ण ठरणार आहे. यात आकर्षण ठरत आहे ती ग्रंथ दालनात प्रवेश करणारे प्रवेशद्वार. पुस्तकाचे मुखपृष्ठ, उलटणारे पानं दिसणार्‍या प्रवेशद्वारावर आज मुळाक्षरं उमटली आहेत.
 
Sahitya Sammelan 
 
तब्बल 291 दालने राहतील अशी ग्रंथ दालन परिसराची व्याप्ती आहे. प्रवेशद्वाराला पुस्तकाचे रूप देण्यात येत असून प्रवेश द्वार हे जणू पुस्तकाची प्रतिकृती भासत आहे. या प्रवेशद्वाराचा आकार साधारण 65 बाय 22 असा आहे. महात्मा गांधी साहित्य नगरीत प्रवेश करताना महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग आणि साने गुरुजींचे विनोबा भावे पुस्तक दाखवण्यात आले आहे. तुकाराम, बहिणाबाई यांच्या फोटोने साहित्याचा सुगंध दरवळतो आहे. महात्मा गांधी साहित्य नगरीला असणारे म्हणा किंवा ग्रंथ दालनाचे आकर्षक प्रवेशद्वार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश मोकलकर यांच्या कल्पनेतून साकारले केले. मुख्य प्रवेशद्वार हे बांबू आणि लाकडी बल्लीचा वापर करून उभारले गेले. त्यासाठी विशिष्ट बांबू मागविण्यात आले आहेत. 80 बाय 30 आकाराचे हे प्रवेश द्वार आकर्षण ठरणार आहे.
 
 
मावशी केळकर वाचन मंच
राष्ट्र सेविका समितीची स्थापना करणार्‍या वंदनीय मावशी केळकर वर्धेच्या. त्यांनी केलेल्या कामाची दखल म्हणून अ. भा. साहित्य संमेलनात वं. मावशी केळकर यांच्या नावाने काही तरी असावे अशी मागणी करण्यात आली. त्या मागणीला अनुसरून वं. मावशी केळकर वाचन मंच्याची निर्मिती करण्याचे धाडस आयोजकांनी केले, हे उल्लेखनिय! याशिवाय वर्धेतील प्रसिद्ध वर्‍हाडी कवी प्रा. देविदास सोटे यांच्या स्मृतीत कविकट्टा, कविवर्य सुरेश भट गझल कट्टा, बा. रा. मोडक बालसाहित्य मंच तर ग. त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचाची निर्मितीही करण्यात आली आहे. साहित्यासोबत संबंध नसला तरी वर्धेतील क्रांतिकारक म्हणून ओळख असलेले शास्त्रज्ञ पांडुरंग सदाशिव खानखोजे यांच्याही नावाला स्थान मिळणे अपेक्षित होते, अशी चर्चा शहरात आहे.
 
 
कचरा कुंडीही आकर्षक
खरेतर कचरा कुंडी हा दखल घेणारा विषयच होऊ शकत नाही. परंतु, त्यात नावीन्यता असल्याने तोही एक ठरला आहे. येथील मगन संग्रहालयात तेलाच्या पिप्यांवर चित्र काढून ते आकर्षक करून त्याचा वापर कचराकुंडी म्हणून करण्यात येतो. त्याच तेलाच्या पिप्यांचा कचरा कुंडी म्हणून वापर साहित्य संमेलनस्थळी (Sahitya Sammelan) करण्यात येणार आहे. जवळपास तेलाच्या 30 पिप्यांवर चारही बाजूने सेवाग्राम येथील बुनियादी शाळेतील विद्यार्थ्यांनी कलाकुसर केली आहे. ती कचरा कुंडी असली तरी त्यातही वर्धेकरांनी जीव ओतला, हे उल्लेखनिय!