संगीत शिक्षकाला 11 वर्षाचा समश्र कारावास

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
Music Teacher : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आज, 31 जानेवारी रोजी आरोपीला 11 वर्ष सश्रम कारावास व 17 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नईम खान पठाण (40, रा.तिरोडा) असे आरोपीचे नाव आहे.
Music Teacher 
 
आरोपी हा संगीत शिक्षक (Music Teacher) असून तो तिरोडा येथे मुलांना संगीताचे धडे द्यायचा. पीडित 14 वर्षीय मुलगी देखील त्याच्याकडे 2017 ते 2020 या कालावधीत संगीत शिकायला जायची. या दरम्यान आरोपीने तिला विविध प्रलोभने देत व प्रेमाचे आमिष दाखवून लैंगिक छळ केला. तसेच सप्टेंबर 2020 मध्ये पीडितेला पळून तिचे शोषण केले. याप्रकरणी 9 सप्टेंबर 2020 रोजी पीडितेच्या वडीलांनी तिरोडा पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केल्यावर अटक केली. दरम्यान तत्कालीन तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राहूल साबळे यांनी तपासाअंती न्यायालयात आरोपीविरुद्ध रोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात पीडित पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी 7 साक्षदारांची साक्ष व कागदोपत्री दस्ताऐवज न्यायालयात सादर केले.
 
 
पीडित व आरोपीच्या वकीलांचा युक्तीवादाअंती आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने न्या. ए. टी. वानखेडे यांनी आरोपी नईम खान पठाण याला भादंविच्या कलम 363 अंतर्गत 3 वर्षांचा सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 4 महिन्याचा अतिरिक्त कारावास, भादंवि 366 अंतर्गत 5 वर्षाचा सश्रम कारावास व 7 हजार दंड तसेच दंड न भरल्यास 4 महिन्याचा अतिरिक्त कारावास आणि लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 अन्वये 3 वर्षाचा सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 4 महिन्याच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंडाची रक्कम पीडितेला देऊन सानुग्रह अनुदानाकरिता कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयीन कामकाजात पैरवी कर्मचारी सहायक पोलिस निरीक्षक शंकर साठवणे यांनी काम पाहिले.