प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाला सुरवात

- 14 पंचायत समित्यांमधील खेळाडूंचा सहभाग

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
Sports Festival : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे येथील विभागीय क्रीडा संकुलात मंगळवार, 31 जानेवारीला जिल्हास्तरीय प्राथमिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. यात जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील 1 हजार 736 विद्यार्थी व 342 खेळ प्रभारी शिक्षक सहभागी झाले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच अमरावती शहरात या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागातील खेळाडू विद्यार्थी उपस्थित झाले आहे.
 
Sports Festival
 
या क्रीडा महोत्सवाचे (Sports Festival) उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी. आर. खरात यांनी भूषाविले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा व सेवा विभाग अमरावतीचे उपसंचालक विजय संतान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, बुद्धभूषण सोनोने, महानगर पालिकेचे शिक्षणाधिकारी राजीक आदी उपस्थित होते. मंचावर जिल्हा प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवाचे क्रीडा संयोजक डॉ. नितीन उंडे, गटशिक्षणाधिकारी डॉ. शीला लोखंडे, प्रज्ञा भवरे, रजनी शिरभाते, शरद कान्हेरकर, वीरेंद्र तराळ, अरुण शेगोकर, धनंजय वानखडे, वकार खान, राजेश घवळे, मुरलीधर राजनेकर, दीपक कोकतरे, कल्पना ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी क्रीडाज्योत प्रज्वलन व ध्वजारोहण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
यावेळी चौदा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पथसंचालन सादर केले. उद्घाटन सोहळ्यात मोर्शी, चिखलदरा, अमरावती, धारणी येथील विद्यार्थ्यांनी निदर्शने सादर करून आपल्या कलेचा आविष्कार सादर केला. दरम्यान धाऱणी तालुक्यातील उकुपाटी शाळेतील विद्यार्थिनी बबिता प्रेमलाल कासदेकर हिचे 600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राज्यस्तरासाठी नामांकन झाल्याबद्दल तिचा व प्रशिक्षक शिक्षक महादेव राठोड यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी सत्कार केला. अविश्यांत पंडा यांनी क्रीडा महोत्सवाच्या शुभारंभाचे फुगे उडवून या स्पर्धांची सुरवात केली. प्रास्ताविक डॉ. नितीन उंडे यांनी केले. संचालन वनिता बोरोडे यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी मानले.