साहित्यीकांनो, नाकाला रूमाल अन् डोळ्यावर झापड लावून या!

- अ. भा. साहित्य संमेलन

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
वर्धा, 
Literary Conference : वर्धा शहर सध्या बकाल झाले आहे. रस्ते खोदलेले, गल्लो गल्ली कचर्‍याचे ढिगारे नजरेत खुपत आहेत. अगदी साहित्य संमेलनाच्या बाजूलाच असलेल्या महावीर उद्यानापुढे आणि वर्धेत प्रवेश करणार्‍या दत्तपूर बायपास, सिंदी मेघे या भागातील पसरलेला कचरा बघितल्यानंतर बस एवढेच म्हणावे वाटते, साहित्यीकांनो वर्धेत येताय नाकाला रूमाल आणि डोळ्याला झापड लावून या म्हणजे रस्त्याच्या बाजूचा कचरा तुमच्या नजरेत खटकणार नाही.
 
Literary Conference
 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Literary Conference) संस्मरणीय करण्यासाठी प्रशासन, आयोजक व वर्धेकर एकवटले आहेत. तीन दिवसाच्या या साहित्य संमेलनाला जवणपास 1 लाख साहित्य, रसिक संमेलनात येणार आहेत. त्यामुळे शहर सुंदर, स्वच्छ दिसावे, यासाठी शहर सुशोभिकरण समिती स्थापन करण्यात आली आहे. गेल्या रविवारी जिल्हाधिकार्‍यांसह विविध संघटनांनी संमेलन स्थळाची स्वच्छता केली. त्यापूर्वीही जिल्हाधिकारी, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसह विविध संघटनांनी गावाबाहेरही स्वच्छता केली. मात्र, घाण होऊच नये याचा बंदोबस्त झाला नाही. शहरात प्रवेश करताच दत्तपूर बायबास आणि सिंदी (मेघे) परिसरालगत महामार्गाच्या रस्त्याच्या कडेला असलेले कचर्‍याचे ढिगारे आणि मंगल कार्यालयातील उरलेल्या शिळ्या अन्नाने दुर्गंधी पसरली आहे.
 
 
शहर सुशोभिकरण समिती माध्यमातुन सम्मेलन स्थळ आणि आजुबाजूचा परिसर स्वच्छ केल्या गेला असला तरी शहरालगतच्या बायबास मार्गावर चौकाचौकात कचर्‍यातील शिळ्या अन्नावर मोकाट जनावरं नजरेत पडतात. दत्तपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालयं आणि हॉटेल उभे झाले आहेत. मंगल कार्यालय आणि हॉटेलमधील शिळे अन्न या भागात आणून टाकले जाते. वर्ध्याला मराठी साहित्य संमेलनाचा (Literary Conference) मान मिळणे ही आपल्या सर्व वर्धेकरांसाठी गौरवाची बाब असली तरी या संमेलनानिमित्त बाहेरून येणार्‍या साहित्य रसिक, मान्यवरांना शहरालगत पसरलेल्या या विदृपतेचेही दर्शन लाजीरवानं ठरू नये याकडे जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, नगर पालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष्य देण्याची गरज आहे.