जिल्हा परिषदेची शाळा भरते खाजगी खोलीत

- मूळ इमारतीचे चक्रीवादळात नुकसान

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
पथ्रोट, 
Z P School : मेळघाटातील शिक्षण प्रणालीबाबत प्रशासन किती बेजबाबदार आहे, याबाबत वृत्तपत्रातून नेहमी वाचण्यात येते. चिखलदरा तालुक्यातील कालापांढरी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत चक्रीवादळात मोडकळीस आल्याने वर्षभरापासून सोई सुविधा नसलेल्या खाजगी खोलीत शाळा सुरू आहे.
 
Z P School
 
शिक्षणापासून कुठलाही बालक वंचित राहू नये यासाठी शासनाने प्रत्येक खेड्यासह गावात जिल्हा परिषद शाळा (Z P School) चालू केल्या आहेत. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण सक्तीने देण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये करण्यात आली आहे. मात्र शिक्षण विभाग मेळघाटातील शिक्षणप्रणाली बाबत किती प्रमाणात संवेदनशील आहे, याचे अनेक किस्से असताना कालापांढरी शाळेचे छत एक वर्षापूर्वी उडून गेले असता वर्षभरापासून शाळेचे वर्ग चक्क घरात भरत असल्याचे उघडकीस आले. घटनेला एक वर्ष उलटूनही आजपर्यंत शाळेची दुरुस्ती झाली नाही. कालापांढरी येथील पालक वर्गाने प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, आम्ही मागील एका वर्षापूर्वी शासनाला मागणी केली होती. शाळेची इमारत लवकरात लवकर बांधून पूर्ण करावी जेणेकरून आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. परंतु आजपर्यंत शाळेची इमारत दुरुस्त झाली नाही. आजही आमची मुले दुसर्‍याचा घरात शिक्षण घेत आहेत. या घरात कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. परंतु अधिकारी वर्गाचा हलगर्जीपणा व उदासीनतेने आमच्या मुलांना त्रास सहन करून शिक्षण घ्यावे लागत आहे.
 
 
कालापांढरी गावात 1 ते 8 वी पर्यंत शाळा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी (Z P School) दोन शिक्षकांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही महिला शिक्षक असून माधुरी चौधरी या शिक्षिका व्याधीने त्रस्त असल्याने नियमित सेवा देऊ शकत नाही. प्रत्यक्षात कालापांढरी शाळेत एकच शिक्षिका मुख्याध्यापक शीतल भगत पहिली ते आठवीपर्यंतच्या 47 मुलांना शिक्षण देत आहे. एक वर्षापासून फुलवा भुसुम, कुसुम भुसुम यांच्या मालकीच्या जागेत वर्ग भरत असून त्यांनाही अद्यापपावतो प्रतिमाह 3 हजार रुपये ठरलेले भाडे मिळाले नाही. अनेक गंभीर समस्या मेळघाटातील आदिवासी मुलांच्या नशिबी आल्या आहे. याकडे जि.प. शिक्षण विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने आदिवासी मुलांचे भविष्य अंधाकारमय झाले आहे. याबाबत लेखी तक्रार केल्याचे पोलिस पाटील राजाराम भुसूम यांनी सांगितले. शाळेची इमारत मंजूर झाली आहे. परंतु सध्या आचारसंहिता असल्याने काम चालू करता येत नाही. या वर्षी 100 टक्के बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वास चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी तभाशी बोलताना व्यक्त केला.