अग्रलेख...
नेपाळमधील Earthquake भूकंपाचा एका महिन्यातील तिसरा धक्का अलिकडेच अनुभवायला मिळाला. दिल्ली, उत्तरप्रदेश आणि बिहारसह उत्तर भारतात त्याचे जोरदार हादरे जाणवले. त्यामुळेच भूकंपतज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि तो गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. भूकंप ही नैसर्गिक आपत्ती असल्याने कधी फटका देईल, याचा तंतोतंत अंदाज वर्तविणे शक्य नसले, तरी प्राप्त स्थितीत संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवे. दिवाळीच्या दोन दिवस आधी राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरालाही भूकंपाचे धक्के बसले होते. इतक्यात धक्के बसण्याचे प्रमाण वाढल्याने चिंताही वाटायला लागली आहे. जगभरात नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढत असून नेपाळमधील ताज्या विनाशकारी भूकंपामुळे त्या देशाबरोबरच भारताची धास्ती वाढणे अगदी स्वाभाविक आहे. अभ्यासकांनी लोकांना सावध राहण्याचे सूचित करून नेपाळमधील नवीनतम भूकंपाचा केंद्रबिंदू सक्रियपणे ऊर्जा सोडणारे क्षेत्र म्हणून ओळखल्या गेलेल्या प्रदेशात असल्याचे सांगितल्यामुळे आपणही काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.
थोडक्यात नेपाळमधील 6.4 रिश्टर स्केलचा Earthquake भूकंप तेथे जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी करून गेलाच; खेरीज त्या धक्क्याने नवी दिल्लीपर्यंतच्या इमारती हादरल्यामुळे आपण सध्या सुपात असलो, तरी कधीही जात्यात जाण्याची शक्यता बळावली आहे, यात शंका नाही. नेपाळमधील भूकंपाचा ताजा धक्का हा एका महिन्यातील तिसरा असून दिल्लीप्रमाणेच उत्तरप्रदेश आणि बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात त्याचे जोरदार हादरे जाणवले. भूकंपतज्ज्ञांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिला असून तो गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. ताज्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या डोटी जिल्ह्याजवळ होता. नोव्हेंबर 2022 मध्ये याच जिल्ह्यात 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला होता आणि त्यात सहा जणांनी जीव गमावला होता. 3 ऑक्टोबर रोजी नेपाळमध्ये एकापाठोपाठ आलेल्या भूकंपांची मालिकाही याच भागाच्या आसपास आहेे. त्यामुळेच हिमालयाच्या प्रदेशात केव्हाही मोठा भूकंप येण्याची शक्यता संशोधकांनी वर्तविली असून भारतीय टेक्टोनिक प्लेट उत्तरेकडे सरकत असताना युरेशियन प्लेटशी संघर्ष करीत असल्याचा त्यांचा अभ्यासही काळजी वाढवणारा आहे. अंदाजे 40-50 दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय प्लेट हिंद महासागरातून उत्तरेकडे सरकली तेव्हा युरेशियन प्लेटशी आदळून हिमालयाची निर्मिती झाली. शास्त्रज्ञांच्या मते, आता भारतीय प्लेट उत्तरेकडे कूच करीत असल्याने हिमालयाच्या खाली दबाव वाढत आहे. परिणामी युरेशियन प्लेटशी संघर्ष निर्माण होत आहे. हिमालयावरील हा वाढता दाब एका किंवा मोठ्या भूकंपांच्या मालिकेद्वारे कमी होण्याची शक्यता संशोधक व्यक्त करतात. त्यांच्या अभ्यासानुसार, असे सलग काही धक्के बसले तर त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 8 पेक्षा जास्तही असू शकते. महत्त्वाचे म्हणजे एवढा मोठा भूकंप नेमका कधी येईल, हे अचूकपणे सांगता येत नाही. त्यामुळेच संभाव्य शक्यता गृहीत धरूनच आपण संकटाशी दोन हात करण्यास सज्ज राहणे गरजेचे आहे.
Earthquake भूकंपाच्या मुख्य धक्क्याप्रमाणेच आधीचे धक्के आणि आफ्टरशॉकही मोठे नुकसान घडवून आणू शकतात. नियमित अंतराने जोरदार आफ्टरशॉक आले तर नागरिकांमध्ये घबराट पसरते. नेपाळमध्ये हीच परिस्थिती अनुभवायला मिळाली. यावेळी भूकंपाच्या मुख्य केंद्रालगतच्या शेजारच्या सहा जिल्ह्यांमध्ये म्हणजेच बाजुरा, अछाम, डोटी, बैताडी, दारचुला आणि डडेलधुरा इथे भूकंपानंतरचे धक्के जाणवले. या सततच्या धक्क्यांनी लोकांना घरे सोडून मोकळ्या जागेत राहायला भाग पाडले. आधी 7 ऑक्टोबर रोजी 5.3 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला होता. तेव्हापासूनच प्रभावित लोकांमध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 8 ऑक्टोबरपर्यंत 7,250 कुटुंबातील 36,250 लोक बाधित झाले असून 1,567 घरे पूर्णपणे तर 5,601 घरे अंशत: नष्ट झाली असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. मात्र, बाधित क्षेत्र अत्यंत दुर्गम भागात असल्यामुळे तेथील गरजूंपर्यंत अद्यापही हव्या त्या प्रमाणात मदत पोहोचू शकलेली नाही. खेरीज सदर भूभागांमध्ये भूकंपाचा प्रभाव नेमका किती जाणवला हेदेखील अद्याप पूर्णपणे समजू शकलेले नाही. अद्यापही आधीच्या भूकंप धक्क्यांमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भातील माहितीच्या संकलनाचे काम सुरू असून येत्या काही दिवसात ही माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकंदर दुर्गमतेमुळे अशी स्थिती असताना एखाद्या मोठ्या धक्क्यामुळे त्या त्या भागांना किती मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागू शकतो आणि त्याद्वारे होणारे नुकसान किती भयावह असू शकते, याची कल्पना आपण करू शकतो. अशा प्रकारचे विनाशकारी भूकंप आणि आफ्टरशॉक येतात तेव्हा होणारे नुकसान विविध प्रकारचे आणि विविध पातळ्यांवरील असते. वैयक्तिक घरांची पडझड वा त्यांचे मोठे नुकसान होण्याबरोबरच शाळा, संस्थात्मक इमारतींचेही मोठे नुकसान होते.
यात अनेक जण जखमी तर काही मृत होण्याची मोठी शक्यता असते. इतक्या वर्षांनंतरही गुजरातमधील भयावह Earthquake भूकंपामुळे झालेले भूज आणि लातूर जिल्ह्यात किल्लारीमधील दाहक कथा आपल्या डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळेच हा धोका दुर्लक्षित करणे अयोग्य ठरेल. आता हिवाळा सुरू होत आहे. साहजिकच वारंवार भूकंपाचे छोटे-मोठे धक्के जाणवत राहिल्यास भयभीत होऊन लोक घराबाहेर राहणेच पसंत करतील. अशा असुरक्षित कुटुंबांसाठी धोकादायक काळातील निवार्यासाठी उपायांची योजना आखावी लागेल. थंडीच्या कडाक्यात लोक उघड्यावर आसरा घेऊ शकणार नाहीत. खेरीज खाद्यपदार्थ, अन्य आवश्यक वस्तू, घरगुती सामान या गरजा भागवणेही त्यांना शक्य होणार नाही. त्यामुळेच तज्ज्ञांनी दिलेला संभाव्य मोठ्या भूकंपाचा धोका लक्षात घेऊन सरकार तसेच स्वयंसेवी संस्थांनी या सेवा देण्यासाठी सज्ज राहणे गरजेचे वाटते. त्याचबरोबर मुले आणि किशोरवयीनांना मानसिक आधार देणे, तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये त्यांच्या संरक्षणाच्या गरजांची काळजी घेणे, त्यांच्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घेणे हे आणि यासारखे अन्य अनेक मुद्देही लक्षात घ्यावे लागतील.
भारतातील हिमालयीन राज्यांमध्ये कधीही येऊ शकणारा विनाशकारी Earthquake भूकंप 1505 आणि 1803 मध्ये आलेल्या भूकंपांसारखा असू शकतो, हा तज्ज्ञांचा इशारा लक्षात घेतला तर ही सगळी सज्जता करण्याखेरीज अन्य पर्याय असू शकत नाही. यापूर्वी 2015 मध्येही नेपाळमध्ये 7.8 ते 8.1 तीव्रतेचे भूकंप झाले होते. त्यात 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, तर 20 हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. त्यावेळी भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नेपाळ होता. मात्र, तेव्हा भारतावर कोणताही परिणाम झाला नव्हता. आता हिमालय पर्वतरांगांतील टेक्टोनिक प्लेट अस्थिर बनली आहे. त्यामुळे असे Earthquake भूकंप दीर्घकाळ आणि वारंवार होत राहतील. नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के उत्तराखंडला लागून असणार्या हिमालयीन रांगेत बसतात. त्यामुळेच त्याचा परिणाम आता थेट दिल्ली एनसीआरपर्यंत दिसून येत आहे. थोडक्यात सांगायचे तर आता भारताने भूकंप चक्र क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळेच हिमालय सध्या पूर्णपणे शांत वाटत असला, तरी ही वादळापूर्वीची शांतता तर नाही ना, याचा विचार करावा लागणार आहे. काळजीचे कारण म्हणजे हिमालयातील भूकंपाचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतात दिसून येईल. म्हणजेच उत्तराखंड किंवा हिमाचलमध्ये भूकंपाचे धक्के बसतील तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतात दिसून येईल. सपाट जागा, डोंगराळ भाग अशा सर्व प्रकारच्या भूभागावर त्याचा परिणाम तीव्रतेने जाणवेल आणि त्याचे गंभीर परिणामही भोगावे लागतील.