अग्रलेख...
होळी, दिवाळी यांसारख्या हिंदूंच्या अतिशय महत्त्वाच्या सणांच्या वेळी Pollution प्रदूषणाचे मुद्दे उपस्थित करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र हिंदू बांधवांनी वेळीच ओळखणे गरजेचे आहे. इतर धर्मीयांचे सण, उत्सव असतात त्यावेळी कुणीही कसलाही मुद्दा उपस्थित करीत नाही. पर्यावरणवादी, स्वयंघोषित पुरोगामी त्यावेळी वाळूत चोच खुपसून बसलेले असतात. दिवाळीत हिंदूंनी फटाके फोडताच यांना प्रदूषण दिसायला लागते आणि होळीला रंग उधळले जाताच यांना वातावरणात बदल जाणवायला लागतात. हे ढोंग आहे. हिंदू प्रथा आणि परंपरांचे पालन तर हे लोक करीतच नाहीत; हिंदूंनीही आपल्या परंपरांचा त्याग करावा, यादृष्टीने वातावरण तयार करण्याचे पाप हे लोक करीत आहेत. त्यांच्या पापाची शिक्षा देण्यास आता तमाम हिंदू बांधवांनी सज्ज झाले पाहिजे. या कालावधीत हिंदू धर्मीयांशिवाय अनेक जणांनी समाज माध्यमांद्वारे केलेले वक्तव्य वाचण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असतानाही हिंदूंनी फटाके फोडले, न्यायालयाचा अवमान केला वगैरे मुक्ताफळे उधळली गेली.
बोकडांची आणि जनावरांची कुर्बानी दिली जाते, त्यावेळी ही मंडळी कुठे लपून बसलेली असतात, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हिंदू ही सर्वात प्राचीन संस्कृती आहे आणि अनेक आक्रमणं होऊनही ती टिकून राहिली आहे, हे वास्तव असले, तरी आताची परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आज वेगळ्या पद्धतीने होत असलेली आक्रमणं आपण ताकदीने परतवून लावली नाहीत तर येणारा काळ कठीण असेल, हे लक्षात घेतले पाहिजे. प्रदूषण हे मानवी आरोग्यास घातक आहे हे खरे असले, तरी हिंदूंच्या सणाच्या वेळीच ते का जाणवते, या प्रश्नामागे दडलेले मोठे षडयंत्र ओळखून हिंदू बांधवांनी आपली अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी सारी शक्ती पणाला लावणे गरजेचे आहे. वास्तविक, वाढत्या Pollution प्रदूषणाला अनेक घटक कारक असले, तरी चारचाकींची प्रचंड संख्या हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र, विविध विषयांचा ऊहापोह करणारी मंडळी खाजगी वाहनांच्या बेसुमार वापराकडे बोट दाखवण्याचे नाव घेत नाहीत. यामध्ये केवळ राजकारण्यांना दोष देऊन उपयोग नाही, तर सर्वसामान्य जनताही दोषी आहे. दुसरीकडे बांधकामांची प्रचंड संख्या हवेत धुळीचे कण पसरवत आहे. याचे अत्यंत गंभीर परिणाम होत आहेत. वाढत्या प्रदूषणाची समस्या वेळोवेळी डोके वर काढते, विविध माध्यमांमधून त्याविषयीच्या बातम्या वाचायला मिळतात. विशेषत: दिवाळीनंतर आणि थंडीच्या पूर्ण काळात ही समस्या गंभीर रूप धारण करताना दिसते. मात्र, फुकाच्या चर्चेखेरीज यासंबंधी फार काही होताना दिसत नाही. खरे पाहता ही केवळ भारताची समस्या नाही. देशातील अनेक मोठ्या आणि विकसित शहरांना या समस्येचा सामना करावाच लागतो.
मात्र अनेक विकसित देशांनी वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी अभ्यासांती समोर आलेल्या उपायांचा अवलंब केल्यामुळे या समस्येचे गांभीर्य कमी झाल्याचे दिसून येत आहे. आपल्याकडे मात्र नेमकी याचीच वानवा असल्यामुळे चर्चेपलीकडे फारसे काहीच हाती न लागणे ही वस्तुस्थिती आहे. इथे लक्षात घ्यायला हवे की, जर्मनीसारखा बडा, चारचाकींच्या निर्मितीत अग्रणी असणारा देशही आता कारविरोधी झाला आहे. या देशात नागरिकांना बसद्वारे विनाशुल्क प्रवास करता येतो. त्याचबरोबर शांघाय, लॉस एंजेलिस, पॅरिस आदी उत्कृष्ट व्यवस्थापन आणि प्रदूषणरहित चांगल्या हवेसाठी प्रसिद्ध असणार्या सगळ्या शहरांमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अत्यंत मजबूत असून तिथे मोठ्या प्रमाणात बसेसचा वापर होतो. आपल्याकडे मात्र ही व्यवस्था अत्यंत ढिसाळ आहे. दुसरे म्हणजे उपभोगवादी मानसिकतेमुळे आपल्याकडे कार असण्यास वेगळे सामाजिक परिमाण लाभले असल्यामुळे घरात एकापेक्षा अधिक गाड्या सर्रास बघायला मिळत आहेत. 1995 पासून देशातील परिस्थिती झपाट्याने बदलली आणि कारला आळा घालण्याचा, कारविरोधी उपाययोजना करण्याचा विचार मागे टाकला गेला. एमएमआरडीएच्या 1994 च्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातही कारविरोधी धोरण नमूद करण्यात आले आहे.
आता भारतातील अनेक शहरांमध्ये माणसांना श्वास घेणे कठीण झाले आहे. दिल्लीच नव्हे, तर अनेक शहरांमध्ये स्थिती अत्यंत दाहक आहे. त्यावर तोडगा म्हणून दिल्लीत सम-विषम क्रमांकाच्या कार रस्त्यावर आणण्याचा उपाय राबवून झाला. सध्याही त्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळे काहीही साधणार नाही. कारण कुटुंबात माणसा-माणसाकडे गाड्या असताना सम-विषम नंबरच्या कार नसतील असे आपण समजू शकत नाही. त्यामुळेच ही केवळ दिशाभूल सुरू आहे, असे म्हणता येईल. सोन्या-चांदीचे दागिने वितळवणार्या भट्ट्यांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याची हास्यास्पद बातमीही मध्यंतरी वाचनात आली. अशा चुकीच्या बातम्यांमुळे मूळ विषय मागे पडण्याखेरीज काहीही होणार नाही. कारची वाढती संख्या रोखणे गरजेचे आहेच. आज कुठल्याही महामार्गावर होणारे बहुसंख्य अपघात कारचे असून त्यात दगावणार्यांची संख्या मोठी आहे. मात्र, याकडे लक्ष दिले जात नाही. प्रदूषणाला कारणीभूत असणारी दुसरी बाब म्हणजे वाढते बांधकाम. अफाट बांधकाम हीदेखील भोगवादी अर्थव्यवस्थेने समोर आणलेली बाब आहे. अनेक शहरांमध्ये प्रत्येक भूखंड बांधकामाखाली जाताना बघायला मिळतो आहे. खेरीज तीन वा चार मजल्यांच्या इमारतींनाच परवानगी असणार्या ठिकाणी आता 50 ते 100 मजली टॉवर्स उभे राहत आहेत. 1998 च्या एका रिपोर्टनुसार एक हजार माणसांमागे चार एकर ओपन स्पेसचे प्रमाण असावे, असे सांगितले गेले होते. प्रत्यक्षात हे प्रमाण 0.03 इतके असल्यामुळे नसल्यातच जमा आहे. वस्तुत: पालिकेकडील भूखंड क्रीडांगणे, उद्याने, हॉस्पिटल आदींसाठी राखीव असतात. पण बघता बघता तिथे टॉवर्स उभे राहिलेले दिसतात, तेव्हा काय बोलायचे तेदेखील समजत नाही. पुनर्विकासाच्या नावाखाली अगदी मजबूत इमारतीदेखील तोडल्या जातात. लोक अगदी 50-100 फूट जास्तीची जागा मिळण्यासाठी पुढील 100 वर्षे सुस्थितीत राहणारी इमारत विकासकांच्या ताब्यात देऊन टाकतात. यामुळे धुळीचे कण प्रचंड प्रमाणात वातावरणात मिसळतात. बांधकामाची ही धूळ वेगळी असते आणि कारमधील गॅसमुळे होणारे Pollution प्रदूषण वेगळे असते.
हे दोन्ही एकत्र झाल्यानंतर समस्या अधिक गंभीर रूप धारण करते. त्यात थंडीच्या दिवसात धुक्याचा प्रादुर्भाव वाढतो, कार्बनडाय ऑक्साईड खालच्या पातळीला राहतो. तो नाकाच्या पातळीला येतो आणि Pollution प्रदूषणाचे धोके स्वास्थ्यावर घाला घालू लागतात. युरोप-अमेरिकेमध्ये साधारणपणे 50 वर्षांपूर्वी अशी स्थिती होती. मात्र, अभ्यास करून कारणे समोर आल्यानंतर त्यांनी याविरुद्ध धोरणे राबवली. आपण मात्र अभ्यासातून समोर आलेले निष्कर्ष तसेच विकसित देशांनी त्यावर शोधलेल्या उपायांकडे दुर्लक्ष करत पुन्हा त्याच चुका करत आहोत. याला दुर्दैव, अनास्था, निष्काळजीपणा, हव्यास, भोगवादाचे परिणाम अशी कोणतीही नावे दिली तरी परिस्थिती तशीच राहणार. सध्या विकासाची अनेक कामे सुरू आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या कोणतेही काम डोंगर तोडल्याशिवाय होत नाही. साहजिकच त्यामुळे जैवविविधता, पाण्याची व्यवस्था, नद्यांचे प्रवाह या सगळ्यावर दुष्परिणाम होत आहे. मात्र माणसे या कशाचाही विचार करत नाहीत. प्रत्येक जण जास्तीत जास्त पैसे मिळवून चांगले आयुष्य जगण्याच्या विचारात आहे. कार घेणे, मोठा टीव्ही घेणे, मोबाईल घेणे, रोज नवी वस्तू खरेदी करणे याला चांगले जगणे म्हणत नाही. चांगले जगता येण्यासाठी आधी निसर्गाची साथ हवी, प्रदूषणमुक्त वातावरण हवे. तरच आपण आणि पुढील पिढी श्वास घेऊ शकेल. अजूनही आपण हे समजून घेतले नाही तर भविष्य धूसर आहे, हे वेगळे सांगायला नको. पण, या सगळ्या कारणांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत केवळ हिंदूंच्या सणांवेळीच प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जात असेल तर त्याला कृतीने तीव्र विरोध करणे ही काळाची गरज आहे.