जयशंकर यांचा खमकेपणा

    दिनांक :18-Nov-2023
Total Views |
अग्रलेख
S. Jaishankar : आपल्या हाताने आपल्या पायावर दगड पाडून घेणार्‍यांची संख्या जगात वाढते आहे. असे लोक आपल्या कृतीने आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचेही नुकसान करून घेतात; पण त्याचे त्यांना काही सोयरसुतक नसते. मुळात आपण काही चूक केली वा आपल्या हातून काही चूक झाली, याची जाणीवही त्यांना नसते. सर्वसामान्य माणसाने अशी चूक केली तर त्याच्या परिणामाची व्याप्ती फार मोठी नसते. पण मोठ्या पदावरील माणसाने अशी चूक केली तर त्याचे परिणाम त्याच्यासोबत त्याच्या देशालाही भोगावे लागतात. त्यामुळेच सामान्य माणूस करतो ती चूक असते, तर मोठ्या पदावरील कोणताही माणूस करतो ती घोडचूक असते. अशा मालिकेत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा समावेश झाला आहे वा असा समावेश त्यांनी जाणीवपूर्वक करून घेतला आहे. असे करून ट्रुडो यांनी भारतासोबतचे आपले अतिशय जुने संबंध कारण नसताना खराब करून घेतले आहेत.
 
S. Jaishankar
 
विशेष म्हणजे याची किंमत भारतापेक्षा कॅनडालाच जास्त चुकवावी लागत आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची अज्ञात लोकांनी कॅनडात हत्या केली. या हत्येचे खापर ट्रुडो यांनी कारण नसताना भारतावर फोडले. घटनात्मक पदांवर असणार्‍या व्यक्तीने संयमाने आणि मुत्सद्देगिरीने त्याचप्रमाणे परिणामांची जाणीव ठेवून बोलणे अपेक्षित असते. पण असा संयम ट्रुडो यांना दाखवता आलेला नाही. निज्जर हत्या प्रकरणाशी भारताचा संबंध जोडण्याचे त्यांचे विधान म्हणजे ‘उचलली जीभ लावली टाळूला’ या प्रकारातील आहे. निज्जर याची हत्या अज्ञात लोकांनी केली, असे म्हणतात. मग याचा S. Jaishankar भारताशी कसा संबंध आहे, हे ट्रुडो यांनी स्पष्ट करायला हवे होते. ट्रुडो यांनी भारतावर आरोप करताच ब्रिटन आणि अमेरिका यांनी आपल्या परराष्ट्र धोरणाला अनुसरून आणि स्वत:च्या सोयीसाठी त्यांची पाठराखण केली, भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याच्या ट्रुडो यांच्या प्रयत्नाचा कोणताही विचार न करता पाठिंबा दिला.
 
 
निज्जर यांच्या हत्येत भारताचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे असल्यास ते ट्रुडो यांनी सादर करायला हवे होते. पण भारत चौकशीत सहकार्य करत नसल्याचे रडगाणे ट्रुडो यांनी गायला सुरुवात केली आहे. हा प्रकार चोराच्या उलट्या बोंबा म्हणण्यासारखे आहे. निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे काही पुरावे तुम्ही द्या, आम्ही चौकशीत सहकार्य करायला तयार असल्याचे भारताने याआधीही अनेक वेळा म्हटले, पण ट्रुडो यांच्याजवळ निज्जर याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे कोणतेच पुरावे नाहीत, तर ते देणार तरी काय? त्यामुळे या मुद्यावरून परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी कॅनडाला चांगलेच फटकारले आहे. निज्जर याच्या हत्येत भारताच्या सहभागाचे ठोस पुरावे तुम्ही द्या, चौकशीत तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करण्याची आमची तयारी असल्याचे जयशंकर यांनी भारतात नाही तर लंडनमध्ये घेतलेल्या पत्रपरिषदेत ठणकावून सांगितले. मोदी यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री S. Jaishankar म्हणून नियुक्ती करण्याच्या आधी जयशंकर यांनी परराष्ट्र सचिव म्हणून काम केले आहे. त्यामुळे जयशंकर यांच्या विधानाची ट्रुडो यांच्या विधानाशी तुलना करता येणार नाही. जयशंकर यांचे विधान उचलली जीभ आणि लावली टाळूला यासारखे नाही, यात शंका नाही. तर पूर्ण विचारांती आणि परिणामांची जाणीव ठेवत जयशंकर यांनी आपले विधान केले आहे. भारताचाच नाही तर जगातील कोणत्याही देशाचा परराष्ट्र व्यवहार मंत्री कसा असावा, याचा आदर्श त्यांनी आपल्या जबाबदारीच्या आचरणातून जगासमोर ठेवला आहे.
 
 
भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य एका निश्चित जबाबदारीने प्राप्त होत असते, राजकीय कारणासाठी या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करणे योग्य नसल्याचा टोलाही जयशंकर S. Jaishankar यांनी ट्रुडो यांना लगावला. एकप्रकारे जयशंकर यांनी शालजोडीतून ट्रुडो यांना शाब्दिक मार दिला आहे. हरदीपसिंग निज्जर हा कोणी प्रतिष्ठित व्यक्ती नव्हता तर खलिस्तान समर्थक कुख्यात दहशतवादी होता. या निज्जरची हत्या कोणी ज्ञात माणसाने करो की अज्ञात माणसाने, त्याची कॅनडाने दखल घेण्याचे कारण नाही. पण निज्जरच्या हत्येने आपला कोणी बाप मेल्यासारखा आक्रस्ताळेपणा कॅनडाने सुरू केला आहे. याचा अर्थ निज्जर आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा जवळचा संबंध असला पाहिजे. पाकिस्तान हे जगातील सगळ्या दहशतवाद्यांचे नंदनवन आहे. दहशतवाद्यांना जन्म देत आणि त्यांची पाठराखण करत पाकिस्तानने आपले अपरिमित नुकसान करून घेतले आहे. अतिरेकी वा दहशतवादी हा शब्द आला तर सगळ्यांना सर्वात प्रथम पाकिस्तानचीच आठवण येते. पाकिस्तान दहशतवाद्यांची पाठराखण का करतो, याचे उत्तर अजूनपर्यंत जगातील कोणत्याच देशाला मिळाले नाही. यातून पाकिस्तान आपला काही स्वार्थ साधून घेत आहे. असे झाले असते तरी एकवेळ समजून घेता आले असते. पाकिस्तानची कृती ही दुसर्‍यांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून स्वत:चे हातपाय मोडून घेतलेल्या व्यक्तीसारखी झाली आहे.
 
 
पाकिस्तानकडे आणि पाकिस्तानी माणसाकडे संपूर्ण जग आज संशयाच्या नजरेने पाहात आहे. पाकिस्तानी नागरिक म्हटला की अंगावर झुरळ बसल्यासारखे त्याला झटकून टाकले जात आहे. जगातील कोणत्याही देशाच्या विमानतळावर पाकिस्तानी माणसाकडे संशयित अतिरेकी म्हणून पाहिले जात आहे. यासाठी पाकिस्तानचे आतापर्यंतचे राज्यकर्ते जबाबदार असले, तरी पाकिस्तानी जनताही याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. ‘यथा राजा तथा प्रजा’ असे म्हटले जाते, म्हणजे जसा राजा असेल तशीच त्या देशातील प्रजा असते, असे S. Jaishankar म्हणतात. पाकिस्तानचे राज्यकर्ते दहशतवाद्यांची पाठराखण करणारे असल्यामुळे पाकिस्तानी जनताही दहशतवाद्यांबद्दल सहानुभुती बाळगून असते. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भ‘ष्टाचाराच्या माध्यमातून स्वत:च्या तिजोर्‍या भरल्या असल्या, तरी पाकिस्तानला मात्र दिवाळखोर करून टाकले आहे. पाकिस्तानच्या जनतेची अन्नानदशा करून टाकली आहे. तरीसुद्धा पाकिस्तानचे डोळे उघडत नाही, याचे आश्चर्य वाटते. पाकिस्तान हा भारतद्वेषाने आंधळा झाला आहे. आपला फायदा झाला नाही तर चालेल, पण भारताचे नुकसान करून घेण्याच्या मागे तो लागला आहे. यात आतापर्यंत भारताचे काहीच नुकसान झाले नाही; मात्र पाकिस्तानचे अपरिमित नुकसान झाले आहे. दुसर्‍यासाठी खोदलेल्या खड्ड्यात माणूस स्वत: पडतो, तशी पाकिस्तानची स्थिती झाली आहे.
 
 
भारताने नेहमीच पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात केला आहे, पण पाकिस्तानने प्रत्येक वेळी भारताचा मैत्रीचा हात झिडकारून लावला आहे. पाकिस्तानची स्थिती कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे अशी झाली आहे. S. Jaishankar भारताचे नुकसान करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान अधिकाधिक गर्तेत जात आहे. आपण एकवेळ पाकिस्तानचे समजू शकतो, पण कॅनडासारख्या देशाकडून अशी अपेक्षा कोणी केली नव्हती. पण कॅनडाची स्थितीही पाकिस्तानसोबत वाण नाही पण गुण लागला सारखी झाली आहे. खलिस्तानसमर्थक दहशतवादी निज्जर याच्या हत्येबद्दल खरं म्हणजे कॅनडाने आनंद व्यक्त करायला पाहिजे होता. मग त्याची हत्या कोणी का केली असेना. पण कॅनडा निज्जरच्या हत्येचे भांडवल करीत आहे. कॅनडासाठी आपला मित्र देश म्हणून भारत अधिक महत्त्वाचा असायला हवा होता, पण कॅनडाने आपले वजन दहशतवादी कारवायात गुंतलेल्या निज्जरच्या पारड्यात टाकले आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून टेंभा मिरवणार्‍या अमेरिकेने या वादात जगातील सगळ्यात जुनी लोकशाही असलेल्या भारताच्या विरोधात भूमिका घेतलेल्या कॅनडाला पाठिंबा दिला, याचे आश्चर्य वाटते. भारताला यापुढे अधिक सावध राहावे लागणार आहे. कारण रात्र वैर्‍याची आहे. पण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्कम आणि सक्षम नेतृत्व असल्यामुळे असे कितीही ट्रुडो आले तरी ते भारताचे काही वाकडे करू शकणार नाही, हे निश्चित.