क्षात्रतेजाची उपासना

    दिनांक :09-Nov-2023
Total Views |
इतस्तत:
- डॉ. विवेक राजे
भारतीय क्रिकेट विश्वातील ‘लिजेंडरी पर्सनालिटी’ आणि भारतीय फिरकी त्रिकुटातील एक, Bishan Singh Bedi बिशनसिंग बेदी यांचे नुकतेच निधन झाले. एक क्रिकेट खेळाडू म्हणून किंवा डावखोरा फिरकी गोलंदाज म्हणून बेदी त्यांच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होते, हे निश्चित. एक कर्णधार म्हणूनदेखील त्यांनी त्या काळातील भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. तो काळ, त्या काळातील मूल्य म्हणून अग्रस्थानी ठेवली गेलेली तत्त्वं आजच्या काळात काहीशी मागे पडली आहेत. काळाच्या ओघात या देशातील प्रत्येक संस्थात्मक अस्तित्वाचे गुणदोष आणि शक्तिस्थाने वा कच्चे दुवे यातही जमीन-आसमानचे फेरबदल झालेले आहेत. बिशनसिंग बेदींचे एक कर्णधार म्हणून घेतलेले दोन-तीन निर्णय त्याही काळात काहीसे वादग्रस्त ठरले होते. पण भारतीय समाजमनावर पगडा असलेल्या हास्यास्पद विचारसरणीचा परिणाम असा की, अनेक लोक तेव्हा आणि आजही ते निर्णय योग्य ठरवताना दिसतात.
 
 
Bishan Singh Bedi
 
मुळात आंतरराष्ट्रीय पातळीवर आजच्या काळात खेळांची खरी उद्दिष्ट्ये (अ‍ॅक्चयुअल गोल्स) आणि दाखविण्याची उद्दिष्ट्य (प्रिटेंडेड गोल्स) वेगवेगळी असतात हे सांगते. बेदींच्या काळातही ही उद्दिष्टे वेगवेगळी होती. नेतृत्वाने हे पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे. कारण खेळ, खेळाडू, लोकप्रिय खेळांचे कर्णधार हे नेहमीच सामान्य लोकांसाठी आदर्श असतात, लहानांसाठी मार्गदर्शक असतात, समाजावर आपल्या वागणुकीने, निर्णयांनी, त्यांनी साध्य केलेल्या यशामुळे, प्रभाव टाकणारे असतात. खेळ आज आपल्या देशाची, वंशाची सरसता, कौशल्य आणि ताकद इतर समाजांना दाखवून देण्याचे साधन आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपली पदकतालिका जगाला दाखवून आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, हे जगाला सुहास्य मुद्रेने सांगण्याचे एक साधन आहे. कसोटी, एकदिवसीय वा टी-ट्वेंटी क्रिकेट याला अपवाद नाहीत आणि नव्हते. याच श्रेष्ठत्वाच्या अभिमानातून ‘लगान’ चित्रपटातील तो एक ब्रिटिश अधिकारी क्रिकेट सामना खेळण्याचे आणि जर जिंकलात तर लगान माफी, नाही तर दुप्पट लगान द्यावा लागेल, असे आव्हान देताना दाखविला आहे. तर, याच चित्रपटातील नायक आम्ही तुमच्यापेक्षा कमी नाही, या भावनेतूनच ते आव्हान स्वीकारताना दाखविला आहे. यात आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सामाजिक स्वाभिमान, समाजाची मानसिक ठेवण इत्यादी अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो आणि अती क्लिष्ट अशा आंतरराष्ट्रीय राजकारणात या सगळ्या बाबींचा विचार करूनच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन अगदी ऑलिम्पिक स्पर्धा अस्तित्वात आल्यापासूनच केले जाते. उदाहरणार्थ हिटलरने जर्मनीत ऑलिम्पिक खेळांचे केलेले आयोजन, 1980 आणि 1984 ऑलिम्पिक स्पर्धांवर अनेक देशांनी टाकलेला बहिष्कार किंवा 1992 पर्यंत दक्षिण आफ्रिकेला ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून रोखणे, भारत-पाकिस्तान क्रिकेट डिप्लोमसी ही सगळी उदाहरणे खेळ हे जगाला आपल्या भावना, श्रेष्ठत्व दाखवण्याचे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर काही साध्य करण्याचे महत्त्वपूर्ण साधन आहे, हेच सांगते. सामान्य माणसाची त्यात होणारी भावनिक गुंतवणूक व त्याबरोबरच त्याची होणारी करमणूक हा भाग वेगळा असतो.
 
 
Bishan Singh Bedi बिशनसिंग बेदी यांनी कर्णधार असताना एकदा नव्हे, तर दोन वेळा वेगवेगळ्या प्रतिस्पर्धी देशांशी खेळताना मैदानातून आपल्या फलंदाजांना परत बोलावून घेत सामने सोडून दिले होते. पाकिस्तानात वन-डे मध्ये जिंकायला 14 चेंडूंत 23 धावा भारताला हव्या होत्या. 8 बळी हातात होते. सर्फराज नवाज नावाच्या गोलंदाजाने तीन बंपर टाकले आणि बेदीने मॅच सोडून दिली, निषेध म्हणून. एकदा विंडीजमध्ये शरीरवेधी गोलंदाजीने दोन भारतीय फलंदाज जायबंदी झाल्यावर त्याने कसोटीत फलंदाजांना परत बोलावून डाव घोषित केला. खरं म्हणजे बेदी स्वतः एक आक्रमक गोलंदाज होते. त्या काळात भारतीय क्रिकेट संघाची फिरकी गोलंदाजीवरच सगळी मदार होती. चंद्रशेखर, बेदी, प्रसन्ना आणि व्यंकटराघवन हेच चार फिरकी गोलंदाज देशाचे आधारस्तंभ होते. जलदगती गोलंदाज म्हणजे अबिद अली, सोलकर इत्यादी. एकदा तर चेंडू जुना करण्यासाठी गावस्करनेदेखील नव्या चेंडूने दोन षटकं टाकली होती, अशी परिस्थिती. खेळाचे मैदान मारायचे असेल तर सर्वप्रथम खेळाडूंच्या मनात ईर्षा निर्माण व्हावी लागते. या ईर्षेतून तो मेहनत करतो. आपल्या विरुद्ध खेळणार्‍या टीमचा, त्या टीममधील प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करतो. स्पर्धकांची बलस्थाने आणि कमजोर बाजू यांचा अभ्यास करतो. स्पर्धेत आपल्या बलस्थानांवर खेळताना स्पर्धकांच्या दुबळ्या बाजूवर प्रहार करीत असतो. खेळाची अथवा लढाईची हीच नीती असते. जलदगती गोलंदाजी खेळणे जर भारताची कमजोरी असेल तर त्यावर विरुद्ध संघ हल्ला करणारच आहे. सामना सोडून देणे हे त्याला उत्तर नव्हते. जलदगती गोलंदाज आपल्या देशात तयार करणे, जलदगती गोलंदाजी खेळण्याचा फलंदाजांनी सराव करणे हेच त्याला उत्तर होते.
 
 
खेळाडू वृत्ती ही नेहमीच मैदानाबाहेर जपण्याची गोष्ट आहे. मैदानावर आखून दिलेल्या नियमांमध्ये बसत फक्त आणि फक्त, विजयाचाच ध्यास घ्यायचा असतो. अनेकदा विजय मिळविण्यासाठी सापेक्ष नीती वापरावी लागते आणि जगात फक्त पहिल्या स्थानालाच महत्त्व असते. सगळे फायदे, सगळे मानसन्मान पहिल्या स्थानी असलेल्याला मिळत असतात. म्हणून विजयी होणे महत्त्वाचे असते. भगवान श्रीकृष्ण आपल्या चरित्रातून, गीतेतून, महाभारत युद्धातून हीच शिकवण देतात. विजय मिळवल्यावर हरलेल्याचे कौतुक ही करण्याची गोष्ट असते. दुसर्‍या अर्थाने हरलेल्यांची शक्तिस्थाने लक्षात घेणे असते. हे आमचा समाज लक्षात घेत नाही. याला कारण इंग्रजांनी देश ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक लोकांचा विरोध कमी करण्यासाठी वापरलेले तथाकथित ‘नॅरेटिव्हज’ होत. आम्ही तुमच्या कल्याणासाठी इथे आलो आहोत. तुम्हाला सन्मार्गाने मोक्ष देण्यासाठी इथे आलो आहोत, हेच ते नॅरेटिव्ह होय. दुर्दैवाने आमच्या देशातील मवाळ नेतृत्व तेच खरं मानीत होते. 1920 नंतरच्या नेतृत्वाने तर वास्तवात इंग्रजांनाच डोक्यावर घेतले होते, असेच म्हणावे लागते. राष्ट्र या संकल्पनेकरिता झगडताना आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्र उभारणीसाठी, जीवनाचे प्रत्येक क्षेत्र उत्क्रांत करावे लागते आणि त्यासाठी क्षात्रतेजाची पेरणी करून त्याची जोपासना करावी लागते. याचाच आमच्या नेतृत्वाला विसर पडला होता, हे स्पष्टपणे जाणवते. क्षात्रतेज लढण्याची दीक्षा देत असते. शत्रू, तो कोणत्याही रूपात असेल त्याच्यावर मात करण्याची ऊर्मी निर्माण करीत असते. हे क्षात्रतेज समाजामध्ये रुजवण्यासाठी, त्याची जोपासना करण्यासाठी खेळ हे एक महत्त्वाचे साधन असते.
 
भारतीय खेळ जसे कबड्डी, गडगा फळी किंवा वेत्रचर्म, आट्यापाट्या, खो-खो, कुस्ती हे सगळे युद्ध तंत्रावर आधारित खेळ आहेत. अगदी आजच्या काळातील फुटबॉल, हॉकी या खेळांमध्येदेखील खेळाडूला व्यूहरचना करावी लागते. या व्यूहरचनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी प्राणपणाने घाम गाळावा लागतो. हे करताना अनेकदा दुखापत होते, मार लागतो, तो सहन करावा लागतो. खेळाडू अनेकदा पडतात, पाडले जातात; पण पुन्हा उठून बसत नव्याने प्रयत्न करू लागतात. अपेक्षित-अनपेक्षित चाली केल्या जातात. त्या समजून घेऊन निष्प्रभ केल्या जातात, कराव्या लागतात. ऐनवेळी डावपेच बदलले जातात, तेव्हा नेतृत्वाला पूर्ण सहकार्य करावे लागते. पराभव पचवून पुन्हा नव्याने लढायला, प्रयत्न करायला सिद्ध होणे शिकावे लागते. हे सगळं स्वाभिमानाने जीवनाला सामोरे जाण्याचे प्रात्यक्षिक असते. अशा खेळांनी प्रेक्षक आणि खेळाडू दोघंही जीवनाला सामोरे जाणे शिकत असतात. क्रिकेट हा एक ‘हार्ड बॉल गेम’ आहे. याला लागणारा कालावधी थोडा जास्त असल्याने व्यूहरचना, डावपेच, संयम, आक्रमकता, संरक्षण, मार लागण्याची जोखीम, बदलत जाणारी परिस्थिती, पराभवाचा स्वीकार आणि पुन्हा उठून नव्याने विजयासाठी प्रयत्न करणे, असे विविधांगी अनुभव हा खेळ पाहणार्‍याला आणि खेळणार्‍याला निश्चितपणाने देतो. या खेळाच्या बदललेल्या स्वरूपातही हे सगळं आहेच आहे. पण कोणीतरी बाऊन्सर टाकले म्हणून किंवा काही खेळाडू जायबंदी झाले म्हणून सामना सोडून देणं, म्हणजे न लढताच शरणागती पत्करणे होय. Bishan Singh Bedi बिशनसिंग बेदींसारख्या गुणवंत आणि जन्मजात आक्रमक खेळाडूने कर्णधार म्हणून सामने सोडून देत प्रतिस्पर्ध्याला न लढताच विजयी करणे, हे क्षात्रतेजाची आराधना करणार्‍या प्रत्येक भारतीयाला खटकणारेच ठरते. 
 
- 9881242224