वाशीम,
MP Bhavna Gawli : लोकांना विकास हवाय. या देशाचा विकास फक्त मोदीच करु शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी यवतमाळ - वाशीम मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना विजयी करा, असे आवाहन माजी खा. भावना गवळी यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केले.
पुढे बोलतांना खा. गवळी म्हणाल्या की, मी यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदार संघाचे २५ वर्षे नेतृत्व केले. या काळात मी मतदार संघाच्या विकासाला प्राधान्य दिले. विकास हाच ध्यास ठेऊन आपण तळागाळातील लोकांना न्याय दिला. त्याच विकासकामाचा फायदा विद्यमान उमेदवार राजश्री पाटील यांना होईलच. मला उमेदवारी मिळाली नाही, म्हणून मी नाराज आहे, असे वावड्या उठत आहेत. परंतु, माझ्या मनात कुठेही नाराजी नाही. परंतु, माझी चुक कुठे झाली याची खंत आहे. ही खंत महायुतीच्या उमेदवारापच्या आड न येऊ देता आम्ही सर्व मिळुन महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार असल्याची ग्वाही भावना गवळ यांनी दिली.
मा. नरेंद्र मोदी यांच्य रुपाने देशाला एक सक्षम नेतृत्व लाभले आहे. मागील दहा वर्षात देशाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. गोरगरीबांना न्याय मिळाला. शेतकरी हिताच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. कष्टकरी, शेतकरी हाच केंद्रबिंदू समजून नरेंद्रजी मोदी यांनी काम केले आहे. देशाला सर्व बाबतीत सक्षम करण्यासाठी नरेंद्र मोदी हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे मतदारांनी मनात कुठेही खंत न ठेवता महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन भावना गवळी यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख विजय खानझोडे, महादेव ठाकरे, यवतमाळ जिल्हा प्रमुख उमाकांत पापीनवार आदी उपस्थित होते.