अकोला,
Unseasonal rains - loss of crops : जिल्ह्यात गेल्या वर्षी प्रमाणेच भर उन्हाळ्यात आताही अवकाळी पावसाने पिकांना तडाखा दिला आहे. एकाच आठवड्यात जिल्ह्यात दुसर्यांदा गारपीट व वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाल्याने त्याचा पिकांना फटका बसला असून, 6,838 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अहवाल शुक्रवार 12 एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने (एसएओ) विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाला पाठविला आहे. तर शासनाने तातडीने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

यंदा मंगळवार 9 एप्रिल नंतर 10 व 11 एप्रिल रोजीही काही भागात गारपीट व अवकाळी पावसाचा उभ्या पिकांना फटका बसला आहे. शासनातर्फे पिकांचे संयुक्त पंचनामे केल्यावर त्यातून येणार्या अहवालात प्रत्यक्ष किती हानी झाली हे स्पष्ट होणार आहे. अकोला तालुक्यातील बाधित क्षेत्र 100 हेक्टर असून अकोट तालुक्यात 0.50,बाळापूर तालुक्यात 1345, तर पातूर तालुक्यात 5312 हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. यातही अकोला तालुक्यातील 8 गावांधील गहू, कांदा व फळबागांना फटका बसला. तर अकोट तालुक्यात अवकाळी पावसामुळे एका गावातील लिंबू पिकाची हानी झाली. बाळापूर तालुक्यातील 33 गावातील कांदा, ज्वारी, तीळ, फळबागांचे गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आणि पातूर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा 27 गावातील शेतीलाबसला.यापूर्वी 4 हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. जिल्ह्यात 9 एप्रिल रोजी वादळाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर 10 ते 11 एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने आणखी नुकसान झाले. 9 ते 11 एप्रिल दरम्यान एकूण 8,178 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली आहे.