भाजपाच्या संकल्पपत्रात दहा ‘गॅरंटी’

    दिनांक :14-Apr-2024
Total Views |
- गरीब, युवा, महिला, शेतकर्‍यांना आणखी सशक्त करणार

नवी दिल्ली, 
BJP sankalp patra : येत्या पाच वर्षांत विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ असलेले युवा, महिला, गरीब आणि शेतकरी या चार वर्गांना आणखी मजबूत करण्याचा संकल्प सोडत, ज्यांना देशात कोणी विचारत नव्हते, त्यांना मोदी पूजत आहेत, सबका साथ सबका विकासाचा हाच भाव आहे आणि याच आधारावर भाजपा विकसित भारत निर्माण करण्यासाठी कृतसंकल्प असल्याचा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला. या संकल्पपत्रात मोदी यांनी दहा ‘गॅरंटी’ दिल्या आहेत.
 
 
BJP sankalp patra
 
BJP sankalp patra : भाजपाचे संकल्पपत्र जारी केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, येत्या पाच वर्षांत सुधार, प्रदर्शन आणि परिवर्तन या मंत्रासह वाटचाल करीत आम्ही आणखी वेगाने देशाला प्रगतिपथावर घेऊन जाऊ. भाजपाच्या यावेळच्या संकल्पपत्राकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते; कारण मागील दहा वर्षांतील आपल्या संकल्पपत्रातील सर्व वचनांची भाजपाने पूर्तता केली आहे.
 
 
BJP sankalp patra : याआधीच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जारी केलेल्या संकल्पपत्रातील प्रत्येक मुद्याची पूर्तता आम्ही गॅरंटीच्या रूपात केली आहे, यातून संकल्पपत्राचे पावित्र्य आम्ही कायम ठेवले आहे. भाजपाचे हे संकल्पपत्र विकसित भारताचे चार स्तंभ युवाशक्ती, नारीशक्ती, गरीब आणि शेतकरी यांना सशक्त करीत आहे. मागील दहा वर्षे नारीशक्तीला प्रतिष्ठा तसेच अनेक नव्या संधी उपलब्ध करून देण्याची होती. आगामी पाच वर्षे नारीशक्तीच्या भागिदारीची आहेत. गरिबांसाठी असलेली मोफत धान्य योजना आणखी पाच वर्षे राबवण्याची घोषणा करताना, गरीब पुन्हा एकदा गरिबीच्या जाळ्यात अडकणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहेत, असे ते म्हणाले.
मुद्रा कर्जाची मर्यादा 20 लाख
स्वयंरोजगारासाठी मिळणार्‍या मुद्रा कर्जाची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाखापर्यंत वाढवण्याची तसेच जनऔषधी केंद्रातून 80 टक्के सवलतीच्या दरात यापुढेही देशातील जनतेला औषधे मिळत राहतील, अशी घोषणा मोदी यांनी केली. आयुष्मान भारत योजनेंतर्गत 5 लाखापर्यंत असलेली मोफत उपचाराची योजना आणखी सुलभ करण्याची घोषणा मोदी यांनी केली. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांचा आयुष्मान योजनेत समावेश केला जाईल. यात समाजातील गरीब, मध्यम उच्चमध्यम वर्गातील सर्व लोकांचा समावेश राहील.
लखपती दीदींची संख्या 3 कोटी करणार
लखपती दीदींची संख्या 1 कोटीवरून 3 कोटींपर्यंत वाढवण्याचा संकल्प जाहीर करीत मोदी म्हणाले की, ड्रोन दीदी योजनाही सरकार राबवेल, या योजनेंतर्गत महिलांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.