आठव्या दिवशी मतदान; कुठे जाऊ, कुणाला भेटू

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Wardha polling news : लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढत असताना तापमानातही वाढ होत आहे. मतदारसंघात भेटीगाठी, सभा घेताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. प्रचारासाठी 8 दिवस उरले असल्याने कुणाला भेटू, कुठे जाऊ, विरोधकांना कसा शह देऊ या विवंचनेत उमेदवार असुन आता कार्यकर्त्यांवरच भिस्त आहे.
 
 
dsakld
 
 
वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व धामणगाव (रेल्वे) अशा 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत 3 राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवारांसह 24 उमेदवार रिंगणात आहेत.आता प्रचाराकरिता कालावधी कमी असल्याने उमेदवारांना मतदारसंघ पालथा घालण्याचे कठीण काम करायचे आहे. केवळ 8 दिवस प्रचाराचा कालावधी उरल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची चांगलीच दमछाक होत आहे. कार्यकर्ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. तंत्रज्ञानाच्या युगात प्रचारसुद्धा हायटेक झाल्याचे दिसून येत आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाज माध्यमांचा प्रचारासाठी वापर वाढला आहे. प्रचार म्हटला की, पूर्वीसारखे हातात झेंडे, पत्रके किंवा वाहनांवर भोंगे लावणे आलेच; पण सध्या जमाना हायटेक झाला असून, जुन्या पद्धतींसोबत सोशल मीडियाचाही कार्यकर्ते स्मार्ट फोनद्वारे अवलंब करू लागले आहे.
 
 
 
वर्धा लोकसभा निवडणुकीत एकूण 24 उमेदवार रिंगणात आहे. मात्र, खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांत होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून जाहीर सभेवर भर दिला जात आहे. त्यात जिल्ह्याचा विकास, महागाई, तसेच शेतमालाला भाव नसल्यामुळे मतदार तीव्र रोष व्यक्त करीत आहे. या निवडणुकीत छोट्या पक्षांना किती मते मिळतील, कोणकोणत्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल, हेही पाहणे रंजक ठरणार आहे.
 
 
 
उमेदवारांचा जाहीर सभेवर भर
 
वर्धा जिल्ह्यात 1 हजार 387 गावे असून, अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत 104 गावे, तर धामणगावात 84 गावांचा समावेश आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्वाधिक वर्धा जिल्ह्यातील गावे असल्यामुळे राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार त्यांच्या मोठ्या जाहीर सभा वर्धा जिल्ह्यातील मतदारसंघात घेण्यावर भर देत आहेत.