जिल्ह्यातील मतदार ठरविणार आज 18 उमेदवारांचे भाग्य

    दिनांक :18-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
loksabah election 2024 : अठराव्या लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, गोंदिया व तिरोडा विधानसभा क्षेत्रातील 8 लाख 30 हजार 265 मतदार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 18 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. तर आमगाव विधानसभा मतदार संघातील 2 लाख 62 हजार 281 मतदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.
 
 
 
dfjsakd
 
 
मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात 5716 अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सर्वच मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा क्षेत्रात मतदानाची वेळ दुपारी 3 वाजतापर्यंत असून तिरोडा व गोंदिया विधानसभा क्षेत्रात सायंकाळी 6 वाजतापर्यंत मतदानाची वेळ आहे. जिल्ह्यात एकूण 1288 मतदान केंद्र आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदार व 85 वर्षावरील मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून 723 व्हीलचेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 644 मतदान केंद्रावर वेब-कास्टींग संच लावण्यात आले असून विधानसभा मतदारसंघ स्तरावर व जिल्हास्तरावर कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे. उन्हाचे वाढते प्रमाण पाहता सर्व मतदान केंद्रावर आरोग्य विभागामार्फत प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल व कॅमेरा डिव्हाईस नेण्यास प्रतिबंध घातला आहे.
 
 
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे. मतदानातूनच आपण आपले व देशाचे उज्ज्वल भविष्य निश्‍चित करू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे लोकशाही प्रक्रियेत सामील होऊन उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.