नागपूर,
Union Minister Nitin Gadkari : केंद्रात मागील दहा वर्षे तसेच त्यापूर्वी महाराष्ट्रात मंत्री असताना नागपूरची प्रामाणिक सेवा करण्याचा प्रयत्न केला. जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनता पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केला.
बांगलादेश नाईक तलाव तसेच लाकडी पूल महाल या मध्य नागपुरात दोन ठिकाणी जाहीर सभा झाल्या. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. विकास कुंभारे, आ. प्रवीण दटके, संजय भेंडे, भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, श्रीकांत आगलावे, भोला बैसवारे, गिरीश देशमुख, अनिल अहीरकर यांची या सभांना उपस्थिती होती.
खासदार म्हणून दहा वर्षे सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल नितीन गडकरींनी जनतेचे आभार मानले. आतापर्यंत केलेल्या विकासाची जंत्रीच त्यांनी दोन्ही सभांमध्ये सादर केली. तरुणांना केजी टू पीजी शिक्षण घेण्यासाठी शहराच्या बाहेर जावे लागू नये, असा प्रयत्न आहे. तरुणांना रोजगार कसा मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत मिहानमध्ये ६८ हजार तरुणांना रोजगार मिळाला. वर्ष पूर्ण होण्याच्या आत आणखी १ लाख तरुणांना रोजगार मिळेल व पुढील पाच वर्षांत आणखी १ लाख तरुणांसाठी रोजगार निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी महालच्या सभेत व्यक्त केला.
बांगलादेश-नाईक तलाव
बांगलादेश-नाईक तलाव परिसरात झालेल्या सभेत नितीन गडकरी म्हणाले की, बांगलादेश-नाईक तलावच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. कुणाचे नाव घेत नाही व कुणावर टीका करत नाही. कारण ‘ये पब्लिक है, सब जानती हैङ्क यावर माझा विश्वास आहे. आपले शहर सुंदर असले, स्वच्छ, प्रदूषणमुक्तव्हावे, शहराची चौफेर प्रगती व्हावी, असा प्रयत्न आहे.
नागपूरने माझा लौकिक वाढवला. हा सन्मान मला तुमच्यामुळे मिळाला. आता मला निवडणुकीतील विजयाचा विक्रमही तुमच्या मदतीने करायचा आहे. त्यासाठी ७५ टक्के मतदान होईल, असा प्रयत्न करा. असे झाले तर ५ लाखांपेक्षा मोठ्या फरकाने मी निवडून येईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्तकेला.