उत्तम आरोग्य सुखी जीवनाची गुरुकिल्ली

    दिनांक :07-Apr-2024
Total Views |
- जागतिक आरोग्य दिन
- शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती आनंदी जीवनाचे रहस्य
 
नागपूर, 
world health day : सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळेला देवासमोर ‘शुंभकरोति कल्याणम्, आरोग्यम् धनसंपदा’ अशी प्रार्थना केली जाते. भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून आरोग्याला धनसंपदा म्हटले आहे. म्हणजेच, शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणे जास्त योग्य असल्याची शिकवण आपल्या पूर्वजांनी दिली. आपले जीवन सुखी, समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजेच उत्तम आरोग्य होय. निरोगी शरीर व आनंदी मन असणारी व्यक्ती समाजाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतो, हा त्यामागील उद्देश होता.
 
 
world health day
 
world health day : मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जीवनशैली पूर्णत: बदलून गेली असून, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आरोग्याबाबत जागृकता निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली. हाच उद्देश समोर ठेवून जागतिक आरोग्य संघटनेने 1948 मध्ये पहिली जागतिक आरोग्य सभा बोलावली.ज्यात जगभरातील लोकांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्याची मागणी करण्यात आली. याची दखल घेत पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी सर्व देशांमध्ये आयोजित करण्यात आला होता.
आरोग्य जपा, आयुर्मान वाढेल
शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने दक्ष राहावे यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम करून या दिवशी आरोग्याचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचविले जाते. आरोग्यदिनाच्या पृष्ठभूमीवर वैद्यकीय तज्ज्ञांनी एक अहवाल जारी केला. यात शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत अधिक जागृत असणार्‍या व्यक्तीचे आयुर्मान सरासरी 7-10 वर्षांनी अधिक असल्याचे म्हटले आहे. जनजागृती वाढल्याने जगभरातील लोकांचे आयुर्मान 1990 च्या तुलनेत 2021-22 मध्ये सरासरी 6.2 वर्षांनी वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.
यावर्षीची संकल्पना ‘माझे आरोग्य, माझा हक्क’
जगभर 7 एप्रिल रोजी 76 वा world health day जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षीची संकल्पना ‘माझे आरोग्य, माझा हक्क’ ही निश्चित केली आहे, जी मूलभूत मानवी हक्कांवर केंद्रित आहे. जागतिक आरोग्य दिनाचे उद्दिष्ट संपूर्ण जगभरात समान आरोग्य सेवा सुविधांबद्दल जागरुकता पसरवणे व आरोग्याशी संबंधित गैरसमज दूर करणे आहे.