यंगिस्तान
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
पुणे कल्याणीनगर Porsche accident पोर्शे अपघातामुळे पुन्हा एकदा कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेता सलमान खान अशा प्रकरणात सापडला होता. सुरुवातीला सलमान गाडी चालवत होता, हे स्पष्ट झाले होते. हे प्रकरण खूप वर्षे चालले आणि अखेर सलमान गाडीच चालवत नव्हता, असे सिद्ध झाले. आता पुणे पोर्शे अपघातातही असंच काहीसं घडेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला घडलेल्या घटनेवर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर 15 तासांत जामीन मान्य करण्यात आला. यावरून प्रचंड गदारोळ माजला. कायदा सर्वांसाठी समान आहे, हा भ्रम दूर झाला. श्रीमंत लोक आणि स्थानिक राजकारणी कायद्याला वाकवू शकतात, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. एका बातमीनुसार पोलिसांनी अग्रवाल कुटुंबाच्या चालकाचा जबाब नोंदविला आहे. त्यामध्ये चालक म्हणाला की, अग्रवाल यांनी स्वतः अशी सूचना दिली होती की, जर मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस.
Porsche accident : बारावीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला मित्रांसोबत पार्टी करायची आहे, असे अल्पवयीन आरोपीने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी आपल्या मुलाशी म्हणजेच आरोपीच्या वडिलांशी (विशाल अग्रवाल) चर्चा करून नातवाला महागड्या पोर्शे कारची चावी दिली तसेच पार्टीसाठी क्रेडिट कार्डही दिले. चालकाने दिलेल्या जबानीनुसार मद्यपान केलेले असूनही आरोपीने गाडी चालविण्याचा हट्ट केला आणि पुढील भयानक प्रकार घडला. या श्रीमंतांच्या मुलाच्या हट्टापायी दोन तरुणांचा नाहक बळी गेला. काय वाटलं असेल त्यांच्या पालकांना? आता त्या माजोरड्या मुलाला वाचवण्यासाठी मेलेल्या तरुणांच्या चारित्र्यावर संशय घेतला जात आहे. हे म्हणजे ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येला मणिहार’ असे झाले आहे. या प्रकरणामध्ये मुलाला सोडविण्यासाठी स्थानिक आमदाराचाही हात असल्याचे समोर येत आहे. अग्रवालने आमदाराला फोन करून आपल्या मुलाला सोडविण्याचा आदेश दिल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. विशेष म्हणजे सरकार महायुतीचे असूनही महायुतीच्या समर्थकांनी याविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त झाला. पुढे देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे म्हटले. आता या मृत तरुणांना न्याय मिळेल, अशी आशा आपण करूया...
पण विचार करा, हे प्रकरण बाहेर आलेच नसते तर? अशी कितीतरी प्रकरणे आहेत, जी स्थानिक पातळीवर मिटवली जातात. तुमच्याकडे पैसे असतील, तुम्ही राजकारण्यांचे नातेवाईक असाल किंवा स्थानिक गुंड असाल आणि तुम्ही गुन्हा केला असेल तर स्थानिक पातळीवर सहज सेटलमेंट केली जाते. आज सोशल मीडिया असल्यामुळे सत्य परिस्थिती समोर येते. पण पूर्वी अशी प्रकरणे सहज हाताळली जायची. रमेश किणी प्रकरण, दिव्या भारती प्रकरण, हल्लीच घडलेलं सुशांत सिंग आणि दिशा सालियान हे तर ताजं प्रकरण आहे. या प्रकरणातही पोलिसांनी संशयास्पद हालचाली करून पुरावे मिटविण्याचा आरोप झाला. उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आले. यातून सिद्ध काही झाले नाही. पण ज्याप्रकारे संशयित गोष्टी घडल्या, त्या भयानक होत्या. जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना काळात अनंत करमुसे या सामान्य नागरिकाचं अपहरण करून त्यांना मारहाण केली. विचार करा, करमुसे यांच्या कुटुंबावर किती दबाव होता? किती घाबरले असतील ते? अशा अनेक प्रकरणांवरून हे स्पष्ट होते की, श्रीमंत आणि राजकारणी लोक स्थानिक पातळीवर बर्याच गोष्टी मॅनेज करत असतात.
Porsche accident : राजकीय नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरीदेखील नवीन नाही. एखाद्या साहेबावर टीका केली तर त्यांचे गुंड सर्वसामान्य माणसाला मारहाण करतात. इतकेच काय, तर वयोवृद्ध माणसांना आणि लहान मुलांनाही मारहाण करायला हे लोक मागे-पुढे बघत नाहीत आणि हेच लोक संविधान बचाव असे गळा काढून बोंबलत असतात. या गुंडगिरीवर जालीम उपाय शोधून काढण्याची नितांत आवश्यकता आहे. पोर्शे कारबाबत आणखी एक बातमी आली की, 2009 मध्ये एका गोळीबार प्रकरणात छोटा राजनशी संबंध असल्यावरून पोलिस आयुक्तांनी आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. तेव्हा त्यांच्यासोबत आलेला एक नातेवाईक आपण वकील असल्याचे सांगत पत्रकारांना उलटसुलट बोलू लागला. तो म्हणाला, हे गरीब लोक कोण आहेत? यांना अग्रवाल कोण आहे, याची कल्पना आहे का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला की, सगळे प्रकरण मिटेल. त्यांच्या नादी का लागत आहात? हा पैशांचा माज आहे. तुमच्याकडे पैसे आहेत, याचा अर्थ तुम्ही कोणताही गुन्हा करू शकता, कोणतेही प्रकरण दाबू शकता, न्याय विकत घेऊ शकता आणि सामान्य माणसाला चिरडू शकता, असा मस्तवालपणा यांच्या अंगात आहे. या गोष्टी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात घडत आहेत, यासारखे दुर्दैव नाही.
म्हणूनच आता सामान्य माणसाने जागरूक राहण्याची गरज आहे. Porsche accident या श्रीमंतांच्या आणि राजकीय गुंडांच्या गुंडगिरीला घाबरून दबून न राहता, त्यांच्या आरे ला कारे करण्याची वेळ आलेली आहे. या स्थानिक धनाढ्य आणि राजकीय गुंडांचा बंदोबस्त लोकशाही पद्धतीने करता येईल. जे जे राजकारणी अशा गुन्ह्यात सापडतील त्यांना कोणीही उमेदवारी देऊ नये आणि दिली तर त्याचा दारुण पराभव व्हावा, त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात यावी, याची काळजी जनतेने घ्यायला हवी. जी श्रीमंत मंडळी मोठ्या गुन्ह्यांसाठी सेटलमेंट करतात आणि जे सरकारी अधिकारी पैसे घेऊन सेटलमेंट करतात अशांवर कठोर कारवाई व्हावी. यासाठी एक मानवाधिकाराची संस्था निर्माण व्हायला हवी; जी अशा प्रकरणांसाठी काम करेल. वाचकांनी कृपया एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मी श्रीमंतांच्या विरोधात बोलत नाही. केवळ श्रीमंतांच्या विरोधात बोलणे ही लेफ्टिस्ट रणनीती आहे. श्रीमंत व उद्योजकांमुळे आपला देश चालतो आहे, ते आपल्याला रोजगार उपलब्ध करून देतात, यावर माझा विश्वास आहे. पण अग्रवालसारख्या माजोरड्या धनाढ्य लोकांना शासन झालेच पाहिजे, यात कोणताच वाद नसावा. हा छत्रपती, सावरकर आणि आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथे न्याय होणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राने नेहमीच अन्यायाचा प्रतिकार केलेला आहे आणि यापुढेही करेल.