अजितदादा नाराज...आमच्याही कार्यकर्त्यांना रोखणं कठीण!

Shinde-Pawar-Fadnavis महायुतीच्या नेत्यांसाठी गाईडलाईन

    दिनांक :01-Sep-2024
Total Views |
नागपूर,
 
 
Shinde-Pawar-Fadnavis विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर आलेल्या असताना, पक्ष आणि आघाड्यांतर्गत सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. एकीकडे राजकीय वातावरण तापत असताना, वाद-प्रतिवाद आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठकांमध्ये चर्चा सुरू असल्या तरी, बैठकीबाहेर लहानमोठे नेते आपापल्या कुवतीनुसार विधानं करीत असतात. यामुळे, आघाड्यांमध्ये परस्पर गैरसमज निर्माण होत आहेत.
 
 

Shinde-Pawar-Fadanvis 
 
 
Shinde-Pawar-Fadnavis नागपूरच्या रामगिरी येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत मित्रपक्षाच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त आहे. शनिवारी सायंकाळपासून साधारण साडेचार तास चाललेल्या बैठकीत तानाजी सावंत आणि गणेश हाके यांच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
 
 
Shinde-Pawar-Fadnavis वादग्रस्त वक्तव्यं थांबली नाहीत तर आमच्याही कार्यकत्र्यांना आवरायला अडचणीचं जाईल, असे म्हणत अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे, महायुतीला तडे जातील, अशी वादग्रस्त वक्तव्यं होणार नाहीत, याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीद्वयांनी घेतल्याचं वृत्त आहे. महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नये, यासाठी एक गाईडलाईन ठरवली जाणार आहे. दरम्यान, आगामी विधानसभा जिंकून आम्ही सरकार स्थापन करू, असा दावा महाविकास आघाडीने केला आहे. तर, केलेल्या कामांचा आढावा देऊन आम्हीच निवडणूक जिंकणार, असा आत्मविश्वास महायुतीने व्यक्त केला आहे.
 
 
Shinde-Pawar-Fadnavis या विशेष बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. या बैठकीत विदर्भासह संपूर्ण राज्याच्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात सखोल चर्चा झाली असून, अनेक जागांबद्दल तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झाल्याचं संबंधित वृत्तात म्हटलं आहे.