भिवंडी
abu azmi marathi controversy भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी बुधवारी भिवंडीत दाखल झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हिंदीत प्रतिक्रिया दिली. मात्र, मराठी पत्रकारांनी त्यांच्याकडे मराठीत बोलण्याची विनंती केली असता, त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे वाद निर्माण झाला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आझमी यांनी म्हटले की, "मराठी आणि हिंदीत काय फरक आहे? मी मराठी बोलू शकतो, पण मराठी भाषेची इथं गरज काय आहे? ही प्रतिक्रिया फक्त भिवंडीपुरती मर्यादित आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी जर ही मराठी बाइट दिली गेली तर ती कोणाला समजणार आहे?" या विधानानंतर मराठीप्रेमी आणि राजकीय पक्षांकडून आझमींवर टीकेचा भडीमार सुरू झाला आहे.
या वक्तव्यानंतर मनसेने abu azmi marathi controversy आक्रमक भूमिका घेतली असून, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांनी आझमींना खरमरीत उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं, "अबू आझमी, तुम्ही राजकारण महाराष्ट्रात करत आहात. महाराष्ट्राच्या राजकारणात असताना तुम्हाला उत्तर प्रदेशातील भैय्यांची परवा कशासाठी? भिवंडी ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात फक्त मराठीतच चालेल. मराठीची जर लाज वाटत असेल, तर आम्ही मनसे स्टाईलनं तुम्हाला उत्तर देऊ." या प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चांगलाच गाजणार, असे संकेत मिळत आहेत.दरम्यान, कल्याण रोड व्यापारी रहिवासी संघर्ष समितीचे प्रतिनिधी महापालिकेकडे रुंदीकरणाविरोधात निवेदन देण्यासाठी पोहोचले असता त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरच थांबवण्यात आले. शादाब उस्मानी, राम लहारे आणि दीन मोहम्मद या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षकांकडून झालेल्या अडवणुकीनंतर मुख्य दरवाज्याबाहेरच ठिय्या मांडत पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.
या प्रकाराबाबत अबू आझमी यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की, "आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी आलो होतो. कोणतेही आंदोलन करण्याचा आमचा इरादा नव्हता," असं सांगून त्यांनी पोलीस बंदोबस्त का लावण्यात आला, असा सवाल उपस्थित केला. मात्र, त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना पालिका मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे काही कार्यकर्ते प्रवेशद्वारावरच बसले आणि घोषणाबाजी केली.मराठी भाषेच्या वापराबाबत झालेला वाद, आझमींची भूमिका, मनसेची तीव्र प्रतिक्रिया आणि व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे भिवंडीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, याचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.