नवी दिल्ली,
asia-cup-trophy-controversy भारतीय क्रिकेट संघाने टी-२० आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. आशिया कपमध्ये पाकिस्तानी संघ भारताविरुद्ध स्वतःचे स्थान राखू शकला नाही. आशिया कप २०२५ चे विजेतेपद जिंकल्यानंतर, भारतीय संघाच्या खेळाडूंनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी बराच वेळ व्यासपीठावर उभे राहिले. आशिया कप ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) मंगळवारी महत्त्वाची बैठक घेतली. यात बीसीसीआयने एसीसी प्रमुख आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना कठोर फटकारले.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नक्वींना माफी मागून ट्रॉफी परत करण्यास भाग पाडले. बैठकीदरम्यान नक्वी म्हणाले, “तुमच्या खेळाडूंनी माझ्याशी अतिशय वाईट वागणूक दिली. मी ट्रॉफी घेऊन उभा होतो, पण कोणी ती स्वीकारायला आलं नाही. खेळाडू मोबाईल आणि गेममध्ये व्यस्त होते. मी अशा पद्धतीने ट्रॉफी देणार नाही. तुमचा कर्णधार दुबईला आला तरच माझ्याकडून ट्रॉफी स्वीकारू शकेल.” यावर राजीव शुक्ला यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सांगितलं, “तुम्ही कसा विचार करू शकता की आमचे खेळाडू तुमच्याकडून ट्रॉफी घेतील? तुम्ही एसीसी आणि पीसीबीचे प्रमुख असलात तरी, क्रिकेटला राजकारणात ओढण्याची ही पद्धत चुकीची आहे. तुम्ही आधी बीसीसीआयशी बोलायला हवे होते. आमच्या खेळाडूंनी तुमच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही हे स्पष्ट होतं. आता आमचा कर्णधार मुंबईत आहे, तो दुबईला का येईल? तुम्ही ट्रॉफी आयसीसी किंवा एसीसीकडे द्यावी, आम्ही तेथून घेऊ.”
इतक सगळ ऐकल्यानंतर नक्वी म्हणाले, “राजीवजी, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. घडलेलं प्रकार घडायला नको होता. मी त्याबद्दल माफी मागतो. ट्रॉफी मी आयसीसीकडे सुपूर्द करतो, तुम्ही तेथून मिळवू शकता.” रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ५ विकेट्सने विजय मिळवत आशिया कप पटकावला होता. मात्र भारतीय संघाने नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला. सध्या ट्रॉफी एसीसी कार्यालयात ठेवण्यात आली असून, नक्वींच्या आत्मसमर्पणानंतर ती लवकरच भारतात येणार आहे.